हायड्रोजनवर चालणाऱ्या मोटारी तुमच्या नजीकच्या विक्रेत्याकडे उपलब्ध होण्याचा काळ आता जवळ आला आहे. विजेवर चालणाऱ्या मोटारींना स्पर्धा करण्यासाठी या मोटारी तयार करण्यात आल्या आहेत व तेच उद्याचे भविष्य आहे. दोन खंडांतील वाहन मेळय़ात काही कंपन्यांनी हायड्रोजन इंधन घटावर चालणाऱ्या मोटारी तयार केल्या सादर केल्या असून पुढील उन्हाळय़ात त्या बाजारपेठेत येणार आहे. हय़ुंदाई मोटार कंपनी अमेरिकेत प्रथम हायड्रोजन घटावर चालणारी मोटार आणीत असून त्यांनी लॉस एंजल्स मोटार मेळय़ात हायड्रोजनवर चालणारी टस्कन ही छोटी एसयूव्ही (स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल) सादर केली आहे. २०१५ मध्ये ती बाजारात विक्रीस येईल. टोकियो मोटार मेळय़ात टोयोटाने इंधन घटावर चालणारी मोटार जपानमध्ये २०१५ व अमेरिकेत २०१६ पर्यंत उपलब्ध करून देण्याचा वादा केला आहे. हायड्रोजन मोटारी या विद्युत वाहनांप्रमाणे नसतात. हायड्रोजन मोटारीत इंधन भरणे सोपे असते. सुरक्षा व विश्वासार्हता हे मुद्देही आता निकालात निघाले असून त्याबाबत शंका बाळगण्याचे कारण नाही. टोयोटाची अशी गाडी ५०००० ते १००००० डॉलपर्यंत उपलब्ध होईल. टस्कन ही गाडी महिन्याला ४९९ डॉलर भाडे देऊन घेता येईल, त्यासाठी ३००० डॉलर आगाऊ भरावे लागणार आहेत. हायड्रोजन व निगादुरुस्ती फुकट देण्याचे हय़ुंदाई कंपनीने कबूल केले आहे.
इलेक्ट्रिक कारला पर्याय?
चीनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ऑटो शोमध्ये इलेक्ट्रिक विरुद्ध हायड्रोजन सेल कार्स असे द्वंद्व पाहायला मिळाले. या ऑटो शोमध्ये सहभागी झालेल्या फोक्सवॅगन, बीएमडब्ल्यू आणि डेल्मर या ऑटो कंपन्यांना चीनमध्ये नजीकच्या भविष्यात इलेक्ट्रिक कार्सना जास्त मागणी असल्याचे आढळून आले. मात्र, याच शोमध्ये टोयोटा आणि होंडा या जपानी मोटार कंपन्यांनी हायड्रोजन सेलवर चालणा-या गाड्यांचे प्रदर्शन मांडले. या प्रदर्शनाला अनेकांनी भेट देऊन त्यात रुची दर्शवली. २०१५ पर्यंत या हायड्रोजन कार चीनमध्ये लाँच करण्याचा या दोन्ही कंपन्यांचा विचार आहे. फोक्सवॅगनने मात्र यात आघाडी घेतली आहे. फोक्सवॅगनने पुढील वर्षीच इलेक्ट्रिक कार चीनमध्ये लाँच करण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे एकूणच ग्वांगझू येथे भरलेल्या ऑटो शोला भेट देणा-या कारप्रेमींमध्ये इलेक्ट्रिक की हायड्रोजन कार याबाबत द्विधा मनस्थिती निर्माण झाली असेल तर त्यात काही गर नाही.