मी बाइकवेडा..
तुमच्या बाइकविषयीच्या आठवणी आम्हाला कळवायच्या. त्या आम्ही शब्दबद्ध करून दर गुरुवारी ‘ड्राइव्ह इट’ पानावर प्रसिद्ध करू. सोबत तुमचा व बाइकचा फोटो असणे अत्यावश्यक. ‘मी बाइकवेडा’ या सदरासाठी असा उल्लेख जरूर करा. मग, चला उचला लेखणी आणि मारा किक.. आठवणींना..! शब्दमर्यादा : २०० शब्द.
ई-पत्ता : vinay.upasani @expressindia.com

मै और मेरी डिस्कव्हर
मला घरचे बाइक वेडाच म्हणतात. मला वेगवेगळ्या प्रकारच्या बाइक वापरायला जास्त आवडतात. माझे बाइक वेड पाहून मला घरच्यांनी ऑटोमोबाइल इंजिनीअरिंगच करायला  सांगितले. मी त्यात डिप्लोमा केला आणि ऑटो कॅडही शिकलो. माझ्या अठराव्या वाढदिवशी आईने मला बजाजची डिस्कव्हर भेट दिली. या सरप्राइज गिफ्टमुळे माझे जीवनच बदलून गेले. डिस्कव्हरच्या प्रेमातच होतो मी. माझ्या बाइकने मला खूप आनंद दिला आहे. माझी बाइक शक्यतो मीच दुरुस्त करतो. तिची खूप काळजी घेतो. गेल्या वर्षी पावसाळ्याच्या पहिल्याच दिवसाची आठवण अजूनही ताजी आहे. हायवेवर तेल सांडले होते. त्यात पाऊस पडत होता. त्यावरून बाइक नेली आणि पहिल्यांदाच माझी गाडी स्लिप झाली. मी सावध होतो शिवाय बाबांचे हेल्मेटही होते दिमतीला त्यामुळे  वाचलो. मात्र, माझ्या बाइकचे नुकसान झाले.  मला खूप वाईट वाटले. ती नंतर दुरूस्त झाली पण तिला झालेल्या वेदना मी विसरू नाही शकत. माझे तिच्यावर जिवापाड प्रेम आहे.
सुयश प्रभुदेसाई,  
गोरेगाव

माझी पँथर
१९५८ मध्ये श्रीगोंदा तालुक्यातील चिंबळे येथे डेप्युटी इंजिनीअर म्हणून नोकरीत असताना मी एक जुनी पँथर बाइक फक्त ६०० रुपयांना विकत घेतली. बाइक दोन्ही िस्प्रग सस्पेन्शन आणि सात हॉर्सपॉवरची होती. त्यावेळी अशा फक्त तीनच पँथर्स होत्या आणि जास्त करून लष्करी अधिकारीच तिचा अधिक वापर करायचे. त्यामुळे साहजिकच माझ्याकडे ही बाइक असणे मला अभिमानास्पद वाटायचे. मला साइटवर जाण्यासाठी दररोज २५ ते ३० किमीचा प्रवास करावा लागायचा. अत्यंत खडबडीत रस्ता होता तो. मात्र, माझी पँथर रोज अगदी न कुरकुरता जायची अगदी राजासारखी. माझ्या सहकाऱ्यांकडे एजेएस, मॅचलेस या गाडय़ा होत्या (आता या गाडय़ा व त्या कंपन्या केव्हाच इतिहासजमा झाल्या आहेत). मात्र माझी पँथर त्यांच्यापेक्षा सरस होती. मी या गाडीवरून एकदा चिंबळेहून खडकवासला, पानशेत असा प्रवास केला तर एकदा पुणे-शिर्डी-मालेगाव आणि पुणे-सांगली-जामखंडी असा ३५० किमीचा जंक्शन प्रवास केला, संपूर्ण प्रवासात मला माझ्या गाडीने एकदाही त्रास दिला नाही. नंतर खोपोलीतील साइटवर माझी बदली झाली. त्यामुळे रोज खंडाळा घाटातून प्रवास होई. एकदा भर पावसात घाटात गाडी बंद पडली. इंजिनचे पिस्टन खराब झाले होते. डॉज ट्रकचा पिस्टन बसवून गाडी चालू केली. आणखी एकदा रात्रीच्या वेळी पेणहून परतत असताना गाडी पंक्चर झाली. पाऊस पडत होता, त्यातून जंगलातला रस्ता, एकही वाहन किंवा माणूस दिसेना. बऱ्याच वेळाने एक ट्रक आला. तोही खोपोलीपर्यंत होता. बाइक ट्रकमध्ये चढवली. १८० किलो वजनाची पँथर उचलून ट्रकमध्ये ठेवणे एक दिव्यच होते. अखेरीस खोपोलीत पोहोचलो, तिथे पंक्चर काढले. खंडाळा घाटात मागून येणा-या एका कारने लाइट दाखवल्याने सुखरूप पुन्हा घरी परतू शकलो. अखेरीस १९६२ मध्ये मी माझी पँथर पुण्यातल्याच एका मेकॅनिकला विकून टाकली. आज माझे वय ८९ वष्रे आहे. मात्र, अजूनही मला माझ्या पँथरची आठवण येते, आता तिच्या आठवणी मी माझ्या नातवंडांना सांगत असतो.
मारुतीराव यादव,
लोणावळा

Story img Loader