बाइक हा तसा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय..
पहिल्यांदा बाइक घेतली तेव्हा होणारा आनंद..
बाइकवर केलेली मुक्तछंद
भटकंती ..
बाइकने कधीकधी रस्त्यावर दिलेला धोका..
अशा कित्येक आठवणी असतात आपल्या पहिल्यावहिल्या बाइकविषयीच्या..
या आठवणींना उजाळा देऊ या ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून..
तुम्ही फक्त एवढंच करायचं..
तुमच्या बाइकविषयीच्या आठवणी आम्हाला कळवायच्या. त्या आम्ही शब्दबद्ध करून दर गुरुवारी ‘ड्राइव्ह इट’ पानावर प्रसिद्ध करू. सोबत तुमचा व बाइकचा फोटो असणे अत्यावश्यक. ‘मी बाइकवेडा’ या सदरासाठी असा उल्लेख जरूर करा. मग, चला उचला लेखणी आणि मारा किक.. आठवणींना..!
शब्दमर्यादा : २०० शब्द.
ई-पत्ता : vinay.upasani @expressindia.com

मी बाइकवेडी..
काही वर्षांपूर्वी बिनधास्त हा मराठी चित्रपट पाहिला. त्यातील नायिका व तिच्या मत्रिणी बिनधास्तपणे बाइक चालवताना पाहून आपणही बाइक शिकावी असे तीव्रतेने वाटू लागले. घरच्यांनी वेड्यात काढले. मात्र, मी काही हट्ट सोडला नाही. अखेरीस ऑगस्ट, २००० मध्ये हिरोहोंडा स्प्लेंडर घेतली. वयाच्या चाळिशीपर्यंत लुना, कायनेटिक, एम-८० वगरे बायकी थाटाच्या गाड्या चालवून झाल्या होत्या. मात्र, बाइक म्हणजे आव्हानच होते. याही परीक्षेत मी उत्तम मार्कानी पास झाले. रोज बाइक शिकणे, सराव करणे, आसपासच्या परिसरात फेरफटका मारणे आदी करता करता बाइक चांगली चालवता येऊ लागली. ठाणे वर्षां मॅरेथॉन स्पध्रेत धावकांबरोबर बाइक चालवली. जागतिक नागरी सुरक्षा दिनानिमित्ताने डोंबिवलीत आयोजित करण्यात आलेल्या मॉक ड्रीलमध्ये सहभागी झाले. त्यातही यश मिळवले. घरच्यांच्याच नव्हे तर सर्वाच्याच चच्रेचा विषय बनले. आता पन्नाशीत सुपरबाइक घेऊन देशभ्रमण करण्याचा विचार करतेय.
नयना आघारकर, डोंबिवली.

.. आणि मी गाडी शिकलो
मी सध्या इंजिनीअिरग शिकतोय. मला लहानपणापासूनच सायकल आणि गाडी चालवण्याची खूप हौस होती. आमच्याकडे बाबांनी घेतलेली टीव्हीएस व्हिक्टर ही बाइक आहे. मला हिचे खूप आकर्षण असायचे. सातवीला असतानाचा माझा अनुभव सांगतो. बाबा दुपारी ऑफिसातून घरी जेवायला यायचे. तेव्हा माझी सकाळची शाळा होती. त्यामुळे मीही दुपारी घरीच असायचो. एकदा बाबा घरी आले असता त्यांची बाइक चालवण्याची मला खूप इच्छा झाली. पण विचारण्याची िहमत नव्हती. त्यामुळे चावी घेऊन गुपचूप बाहेर पडलो. गाडीवर बसलो. अंगण उताराचे असल्याने बाइक आरामात खालपर्यंत गेली. गाडीचे गीअर्स कसे टाकतात हेच माहीत नसल्याने भांबावलो. गाडीवरचा ताबा सुटला. समोरून बलगाडी येत होतो. आणखीनच घाबरलो. ब्रेकच्या ऐवजी क्लच दाबला. गाडी आणखी सुसाटली. अखेरीस दोघेही रस्त्याच्या बाजूला पडलो. ओळखीच्यांनी उठवलं. गाडीच्या मागील बाजूचे इंडिकेटर तुटलेले. मी घाबरलो. बाबांना समजले तर मार पडणार ही भीती. गुपचूप घरी आलो. गाडी होती तशीच ठेवून दिली. आणि अभ्यासाच्या खोलीत जाऊन बसलो. सायंकाळी बाबा घरी आले तरी काही बोलेनात. म्हणून हळूच बाहेर जाऊन पाहिले तर इंडिकेटर तुटलेलाच होता. मी बळेच विचारले बाबांना त्याविषयी. त्यांनाही कळले नव्हते. मला हायसे वाटले. अखेरीस बाबांनी इंडिकेटर दुरुस्त करून आणला आणि माझे दुसाहस झाकलेलेच राहिले. त्यामुळे िहमत वाढली. रोज दुपारी गाडी चालवण्याचा सराव करू लागलो. आणि एक दिवस गाडी चालवायला शिकलोच. आता चांगली दहा वष्रे झाली गाडी शिकून. उत्तमरित्या गाडी चालवता येते. मात्र, ते दिवस अजूनही आठवतात.
अजित शिंदे

पहिलं प्रेम
माझं आयुष्यातलं पहिलं प्रेम माझी बाइकच आहे. मला लख्खं आठवतंय. बारावी चांगल्या मार्कानी पास होऊन मी इंजिनीअिरगला प्रवेश घेतला होता. कॉलेजच्या पहिलाच दिवस होता. सायंकाळी कॉलेज संपल्यानंतर मी मित्रांबरोबर बाहेर पडत होतो. तेवढ्यात माझा भाऊ कॉलेजच्या गेटपाशी उभा असलेला दिसला. मी धावतच तिकडे गेलो. त्याने बाजूलाच नवीकोरी बजाज एक्ससीडी१२५ गाडी लावली होती. माझ्यासाठी बाइक म्हणजे सरप्राइज गिफ्ट होते. मला सुसाट आनंद झाला. इंजिनीअिरगचे चारही वष्रे बाइकवरून आल्हाददायक गेले. बाइक केवळ माझी राहिली नव्हती तर अख्ख्या मित्रमंडळीची ती सार्वजनिक बाइक झाली होती. अनेक दूरदूरच्या ठिकाणी आम्ही या बाइकवरून फिरून आलो आहोत. अनेक गंमतीजमती केल्या आहेत. एकदा तर भर रस्त्यात गाडी बंद पडली. चार किमी अंतरापर्यंत गाडी ढकलत नेली. आजही ती कधीकधी धोका देते. मात्र, पहिलं प्रेम असल्यामुळे मी तिच्या सर्व गुणदोषांकडे डोळेझाक करतो. बाजारात येणारी प्रत्येक नवी बाइक घेण्याइतपत क्षमता आता आहे मात्र अजूनही मी माझ्या एक्ससीडी१२५ ला अंतर दिलेले नाही. माझी पहिली बाइक असल्यामुळे असेल कदाचित पण ती दारात असली की मी नििश्चत असतो. आय रिअली लव्ह माय बाइक.
विजय मिश्रा, कोपरगांव