आता बाईक किंवा कार वापरणं अगदी सामान्य झालंय. प्रत्येकजण प्रवासाची सोय म्हणून स्वतःचं वाहन घेणं पसंत करतो. काही लोक नवं वाहन खरेदी करतात, तर काही लोक जुनं म्हणजेच सेकंड हँड वाहन घेतात. कोण कसं वाहन खरेदी करणार हे सर्वस्वी त्या व्यक्तीच्या बजेटवर अवलंबून असतं. मात्र, यापुढे जुनं वाहन वापरताना तुम्हाला खास काळजी घ्यावी लागेल. अन्यथा तुम्हाला हे वाहन चांगलीच महागात पडेल. याबाबत रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नोटिफिकेशन काढत नियमांच्या अंमलबजावणीचे आदेश दिलेत. त्यामुळे जुनं वाहन वापरण्याआधी हे नियम जरुर समजून घ्या.
यानुसार १५ वर्षांपेक्षा अधिक जुनी गाडी वापरणाऱ्यांना नुतनीकरणासाठी तब्बल आठपट शुल्क भरावं लागणार आहे. याची अंमलबजावणी एप्रिल २०२२ पासून होणार आहे. हा नियम केवळ कारलाच लागू नाही तर अगदी बस आणि ट्रकसारख्या अवजड वाहनांना देखील लागू असणार आहे. रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सोमवारी (४ ऑक्टोबर) याबाबतचं नोटिफिकेशन जारी केलं. या नियमाची अंमलबजावणी पुढील वर्षी एप्रिल २०२२ पासून होईल.
वाहन नोंदणी नुतनीकरणासाठी किती शुल्क लागणार?
सरकारी नोटिफिकेशननुसार १५ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांच्या नोंदणी नुतनीकरणासाठी आता वाहन मालकांना तब्बल ५,००० रुपये भरावे लागणार आहे. याआधी हे शुल्क केवळ ६०० रुपये होतं. याचप्रमाणे मोटारसायकलसाठी आधी हे शुल्क ३०० रुपये होतं. आता ते १,००० रुपये झालंय. बस आणि ट्रकसाठी नुतनीकरण प्रमाणपत्रासाठी आधी १,५०० रुपये मोजावे लागत होते. आता यासाठी तब्बल १२,५०० रुपये द्यावे लागणार आहेत. वाहन मालकांनी आपल्या वाहनाच्या नोंदणी नुतनीकरणात उशीर केल्यास खासगी वाहनांना प्रति महिना ३०० रुपये दंड आणि व्यावसायिक वाहनांना ५०० रुपये दंड होणार आहे.
राफ्ट मोटर्स उभारणार १ लाख चार्जिंग स्टेशन, फक्त २५ रुपयांमध्ये होणार वाहन चार्ज !
दिल्ली आणि परिसरात हा नियम लागू नाही
देशभरात नव्या नियमाचा प्रभाव दिसणार असला तरी दिल्ली आणि परिसरात या नियमाचा परिणाम दिसणार नाही. कारण या भागात आधीपासूनच १० वर्षांपेक्षा जुन्या डिझेल वाहनांवर आणि १५ वर्षांपेक्षा अधिक जुन्या पेट्रोल वाहनांवर बंदी घालण्यात आलीय.