नवे आर्थिक वर्ष सुरू झाले आणि भारतीय वाहन उद्योगाने एकदम कात टाकली. एप्रिलमधील प्रवासी कारच्या विक्रीत केवळ संख्यात्मक वाढच झाली नाही तर गेल्या दोन महिन्यांपासून त्याच कंपन्या आणि त्याच वाहनांचे नवे रूपही समोर आले. टाटा, महिंद्रापासून ह्युंदाई, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज बेन्झपर्यंतच्या अनेक कंपन्यांनी त्यांच्या आहे त्या वाहनांचे अत्याधुनिक मॉडेल रस्त्यावर उतरविले आहे. वाहन आणि त्यातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे ही तर आता अनिवार्यच झाली आहेत. वाहनांच्या रंग, रूप बदलाबरोबरच अंतर्गत रचना, वेगक्षमता, त्यातील सुविधा हे त्यातील यंदाचे वैशिष्टय़ ठरावे.
नावीन्य आणि संशोधन हा तर कोणत्याही कारसाठी पायाच. त्याला या नव्या वर्षांत हात नाही लावला तर गेल्या वर्षभराची वाहन क्षेत्रातील मरगळ कशी दूर होणार? या अनुषंगाने अद्ययावत करण्यात आलेल्या काही निवडक कारची झलक वाहनप्रेमींसाठी..
मिहद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा एक्सयूव्ही ५०० :
किंमत – ११.२१ लाख रुपयांपासून
एसयूव्ही आणि त्यातही मध्यम गटातील हे वाहन प्रचंड लोकप्रिय ठरले आहे. नव्या वाहनांमध्ये ३१ नवे बदल करण्यात आले आहेत. तांत्रिक तसेच बाह्य़ रूपात त्यात लक्षणीय असा बदल करण्यात आला नाही. हेड लॅम्प, फॉग लॅम्प यात एलईडी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला आहे. वाहनाची मागची बाजूही थोडी अधिक आकर्षित करण्यात आली आहे. अंतर्गत रचनेत फारसा काही फरक नसला तरी डॅशबोर्डच्या शेड नव्या आहेत. नव्या एक्सयूव्ही ५०० चे मायलेजही प्रतिकिलोमीटरने वाढविण्यात आले आहे. यातील सहा वाहन प्रकार हे १६ लाख रुपयांच्या घरात नेऊन ठेवण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेनो इंडिया : क्विड : ३ ते ४ लाख रुपये
मूळच्या फ्रान्स कंपनी रेनो इंडियाने तर छोटय़ा प्रवासी वाहन क्षेत्रात एकदम धडक देताना नवी क्विड सादर केली. या क्षेत्रात सध्या मारुतीची अल्टो ८००, ह्युंदाईची इऑन या तग धरून आहेत. प्रत्यक्षात ही कार यंदाच्या दसरा – दिवाळीत बाजारात येईल. रेनो-निस्सानच्या भागीदारीतून तयार करण्यात आलेली ही कार पेट्रोलवर धावणारी आहे. तिच्या अंतर्गत तंत्रज्ञानाबाबत अद्याप खुलासा करण्यात आला नसला तरी तिचे रूप मात्र आकर्षक, स्पोर्टी आहे. त्यातील ९८ टक्के भाग हे इथे भारतातच तयार करण्यात आले आहेत. यात नेव्हिगेशन सिस्टीम, हवा तपासण्याचे डिजिटल उपकरण आहे.
टाटा मोटर्स नॅनो जेनक्स : १.९९ ते २.१९ लाख रुपये
टाटाची नॅनो तिच्या पहिल्या सादरीकरणापासूनच चर्चेत राहिली आहे. यंदा तब्बल दोन वर्षांनंतर तिचे नवे रूप सादर केले गेले. ६२४ सीसी क्षमतेची नवी नॅनो प्रतिलिटर २१ ते २३ किलोमीटर प्रवास देते. यंदा यात इंधन साठवणूक क्षमता २४ लिटपर्यंत वाढविण्यात आली आहे. ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन असलेल्या नॅनोच्या अंतरंग तसेच बाह्य़ रूपात अधिक बदल करण्यात आले आहेत. एएमटी सध्या झेस्टमध्ये वापरले जाते. जेनेक्स्ट मोहिमेंतर्गत आपल्या वाहनांना अद्ययावतता देण्याचा कंपनीचा प्रयत्न सुरू आहे.
मर्सिडीज बेन्झ एस ६०० गार्ड : ८.९ कोटी रुपये
रुपयांच्या बाबतीत कोटय़वधीच्या आकडय़ात असलेल्या कारची मालक कंपनी मर्सिडीज बेन्झने एस श्रेणीतील ६०० गार्ड ही कार तयार केली आहे. यात व्हीआर ९ हे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. व्ही १२ पेट्रोल इंजिन असलेल्या या कारमध्ये गार्ड हे संरक्षितदृष्टय़ा अद्ययावत करण्यात आलेली उपाययोजना आहे. यापूर्वी गार्ड तिच्या अन्य श्रेणीतही आहे. यामुळे वाहनाची वेगक्षमता वाढण्यास मदत होते. लांबलचक आणि मोठी असली तरी ती चार आसनीच आहे. मात्र त्यात अंतर्गत जागा खूपच मोकळी आहे.