बाइक हा तसा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय..
पहिल्यांदा बाइक घेतली तेव्हा होणारा आनंद..
बाइकवर केलेली मुक्तछंद
भटकंती ..
बाइकने कधीकधी रस्त्यावर दिलेला धोका..
अशा कित्येक आठवणी असतात आपल्या पहिल्यावहिल्या बाइकविषयीच्या..
या आठवणींना उजाळा देऊ या ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून..
५ मे १९८७ रोजी मी माझी पहिलीवहिली बाइक, कावासाकी बजाज १००, सोलापुरातून खरेदी केली. आमच्या घराण्यातली ही पहिलीच बाइक. आतापर्यंत तब्बल पाच लाख किमी प्रवास मी या बाइकवरून केला आहे. गाडी घेतल्यानंतर जुल, १९८७ मध्ये मी व माझा मित्र मोहन माने तासगाव, कोल्हापूर, जोतिबा, सांगली व पंढरपूर असा प्रवास करून आलो. चार दिवसांच्या या प्रवासाचे गुपित मात्र आम्ही घरी सांगितले नव्हते. ऑफिसच्या कामाच्या नावाखाली आम्ही भटकत होतो (नंतर तीर्थरूपांच्या रागाला सामोरे जावे लागले ही बाब अलाहिदा). मात्र, या चार दिवसांत आम्ही खूप मजा केली. पावसात मनमुराद भिजलो. वाटेत थांबून चिंच-बोरं तोडणे, शेतात घुसणे, सूरपारंब्या मारणे आदी मजा तर केलीच शिवाय देवदर्शनही केले. सांगलीत असताना गाडीच्या चोकमध्ये कचरा साचला. त्यामुळे गाडी खूप रेस करावी लागत होती. मात्र, तेथील डीलरकडून गाडी त्वरित दुरुस्त करून मिळाली. या प्रवासामुळे आमची िहमत वाढली. मग या गाडीवर कर्नाटकमध्ये बीदर, बसवकल्याण येथे मित्राच्या लग्नाला तर जामखेड, परळी येथे नातेवाइकाच्या लग्नाला जायचे असल्यास मग माझ्याच गाडीवर जाणे ओघाने आलेच. मी माझी गाडी दररोज २० मिनिटे पिवळ्या कपडय़ाने साफ करत असे व दर अमावस्याला धुऊन पूजा करत होतो.
दर महिन्याला अथवा २५०० किमी झाले की सोलापूरला जाऊन सव्र्हिसिंग करत असे. त्यामुळे माझी गाडी खूप चांगल्या स्थितीत असून जवळजवळ २६ वष्रे होऊनही आजही उत्तम आहे. ही गाडी आजपर्यंत कधीही प्रवासात बंद पडली नाही ही खूप महत्त्वाची बाब. आज गाडीचा अॅव्हरेज कमी झाल्यामुळे सध्या तिचा वापर कमी झाला आहे. मात्र, या गाडीला आजही माझे सर्व मित्र पत्थरफोड गाडी म्हणतात.
– भूपेंद्र नलावडे, उस्मानाबाद</strong>
तुम्ही फक्त एवढंच करायचं..
तुमच्या बाइकविषयीच्या आठवणी आम्हाला कळवायच्या. त्या आम्ही शब्दबद्ध करून दर गुरुवारी ‘ड्राइव्ह इट’ पानावर प्रसिद्ध करू. सोबत तुमचा व बाइकचा फोटो असणे अत्यावश्यक. ‘मी बाइकवेडा’ या सदरासाठी असा उल्लेख जरूर करा. मग, चला उचला लेखणी आणि मारा किक.. आठवणींना..! शब्दमर्यादा : २०० शब्द.
ई-पत्ता : vinay.upasani @expressindia.com