मी गडचिरोली जिल्हय़ातील अहेरी या गावातला रहिवासी. मी अकरावीत असताना वडिलांनी मला बाइक घेऊन दिली. बाइकबद्दल मला त्यावेळी काही फारसे ज्ञान नव्हते. मात्र, आकर्षण असल्याने बाबांनी मला बाइक घेऊन दिली. बाइकवरून मग लांबलांबचे प्रवास सुरू झाले. कधी घरी सांगून तर कधी घरच्यांच्या नकळत. एके वर्षी (आता ते नेमकं कोणतं हे आठवत नाही) आम्ही सगळ्यांनी ३१ डिसेंबरला गावाबाहेर जाऊन नवीन वर्षांचं स्वागत करण्याचं ठरवलं. मित्रांनी लगेचच हो म्हटले. गावापासून दोन किमी अंतरावर असलेल्या मित्राचा पेट्रोल पंप आम्ही पार्टीसाठी निश्चित केला. सगळे अकरावीत असल्याने पार्टी फक्त खाण्याचीच होती. पार्टी करून गावी परतत असताना मोबाइल आला.
मी गाडी चालवत असताना तो उचलला. बोलण्याच्या नादात माझे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि माझे मित्र राहुल दोंतुलवार, सुयोग पावडे व मी असे तिघेही नाल्यात जाऊन पडलो. इजा कोणाला झाली नाही पण गावात चर्चा सुरू झाली की आम्ही दारू प्यायल्यामुळे गाडीवरून पडलो. प्रत्यक्षात तसे काहीही नव्हते. पण गावात चर्चेला उधाण. कॉलेजमध्येही जो तो आमच्याकडे संशयाने पाहू लागला होता. मात्र, घरच्यांना काही कळले नव्हते. नंतर सर्व मित्रांनी खरा प्रकार सांगितला. त्यामुळे माझ्याकडील बाइक जप्त करण्याची कारवाई टळली.
सुमित पाकलवार, अहेरी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा