देशात सर्वात लोकप्रिय आणि विश्वासार्ह मानल्या गेलेल्या मारुती वाहन उद्योगावर त्यांच्या हॅचबॅक, सेडान आणि एमयूव्ही या तीनही प्रकारच्या गाडय़ा बाजारातून माघारी बोलावण्याची नौबत आली. वाहन उद्योगाला मंदीने घेरलेले असतानाच मारुतीसारख्या अग्रणी कंपनीवर ही वेळ येणे केव्हाही वाईटच. का आली मारुतीवर ही वेळ, काय आहेत त्यांच्या वाहनातील दोष, ते दूर होतील का, कंपनीच्या विश्वासार्हतेवर निर्माण झालेले प्रश्नचिन्ह मिटेल का, त्याचा हा धांडोळा..
कंपनीच्या इतिहासात प्रथमच १,०३,३११ वाहने माघारी बोलाविण्याची वेळ मारुतीवरही अखेर आली. १२ नोव्हेंबर २०१३ ते ४ फेब्रुवारी २०१४ दरम्यान विकले गेलेल्या या गाडय़ा आहेत. यामध्ये ४७,२३७ वाहने ही स्विफ्ट (हॅचबॅक), ४२,४८१ डिझायर (सेदान) व १३,५९३ इर्टिगा (मल्टी पर्पज व्हेइकल) यांचा समावेश आहे. इर्टिगा तर या नव्या वाहन प्रकारात लोकप्रिय होत असताना ही वेळ आली आहे. कंपनीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी रिकॉल आहे. मात्र याचबरोबर मारुती सुझुकी या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उमटले आहे.

रिकॉल तसे नवे नाही
यापूर्वीच जनरल मोटर्सच्या शेव्हर्लेची लाखाची रिकॉल जागतिक स्तरावर गाजली आहे. मात्र भारतात एवढय़ा मोठय़ा प्रमाणात प्रथमच वाहन माघारी घेण्याची ताजी प्रक्रिया पार पडत आहे. मारुतीचे वृत्त धडकत नाही तोच टोयोटाच्या ४५ हजार इनोव्हांचेही रिकॉल जाहीर झाले होते. मात्र मारुतीच्या लाखाच्या संख्येने केवळ मोठा आकडा म्हणून तोंडात बोटे घालण्यासारखे नाही, तर मारुतीसारख्या कंपनीवरही ही वेळ यावी, असे चित्र निर्माण झाले.

सहकार्यासाठी कंपनीचे संकेतस्थळ
मारुती सुझुकीकडून लाखभर वाहनांचे रिकॉल केल्यानंतर कंपनीने वाहन खरेदीदारांसाठी संकेतस्थळ मदत व्यासपीठही उपलब्ध करून दिले. यानुसार संबंधित वाहनधारकाने त्याच्या वाहनाचा चेसिस क्रमांक संकेतस्थळावर टाकावयाचा आहे. तत्पूर्वी या १४ आकडय़ापूर्वी एमए३ असे टाइप करावयाचे आहे. ११ एप्रिलपासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे.

रिकॉल आकडा ६ लाखांपुढे
भारतात सदोष वाहने परत बोलाविण्याची संख्या आता ६ लाखांच्या पुढे गेल्याचे वाहन उत्पादक संघटनेचे म्हणणे आहे. संघटनेच्या स्वत:हून सदोष वाहने माघारी बोलाविण्याच्या पुढाकारबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ही प्रक्रिया पार पडते. यासाठी जुलै २०१३ मध्ये संघटनेने कंपन्यांनाही उपाय योजण्यास सांगितले. यानुसार आतापर्यंत चारचाकी वाहने तयार करणाऱ्या तब्बल आठ कंपन्या, तर दुचाकी बनविणाऱ्या दोन कंपन्यांनी एकूण ६ लाख वाहने परत बोलाविली आहेत. यामध्ये अर्थातच ताज्या मारुती तसेच आलिशान वाहने तयार करणाऱ्या (आता टाटा मोटर्सच्या मालकीच्या) जग्वार लॅण्ड रोव्हरचाही समावेश आहे. मारुतीची यंदाची रिकॉल ही कंपनीच्या लेखी सर्वात मोठी असली तरी भारतात यापूर्वी सर्वात मोठी वाहन माघार अमेरिकेच्या फोर्डने येथे नोंदविली आहे. कंपनीने २.९५ लाख वाहने परत बोलाविली होती. यामध्ये फिगो, फिएस्टा क्लासिक व इकोस्पोर्ट (अनुक्रमे हॅचबॅक, सेदान व कॉम्पॅक वाहन प्रकार) यांचा समावेश होता, तर याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे अस्तित्वात आल्यानंतर जग्वार लॅण्ड रोव्हरने पहिली रिकॉल नोंदविली आहे. सदोष वाहने माघारी बोलाविल्यानंतर कंपन्यांबाबत वाहनखरेदी/धारकांच्या मनात किंतु उपस्थित होतो. मात्र या प्रक्रियेची अंमलबजावणी म्हणजे व्यवसायात पारदर्शकता, असे वाहन उत्पादक कंपन्यांना मनोमनी वाटते.

मारुतीकडून अपेक्षा नव्हती!
*  मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. जपानी समूहाचा हिस्सा मूळच्या भारतीय कंपनीत वाढत गेला तसा कंपनीचा बाजारहिस्साही कमी होत गेला. एरवी प्रत्येक १० मागे ७ ते ८ कार या मारुतीच्या असायचा काळही होता. आता ५० टक्क्यांच्या आतील बाजारहिश्शामुळे कंपनीच्या कारची संख्या १० मागे अवघ्या ४ ते ५ वर येऊन ठेपली आहे. त्याचबरोबर कंपनीचे स्पर्धकही बदलले. एरवी फक्त कोरियन ह्युंदाई तसेच थोडीफार फियाट, टाटा मोटर्सबरोबर स्पर्धा करणाऱ्या मारुतीसमोर नव्या दमाचे होन्डा, फोक्सव्ॉगन, निस्सान, शेव्‍‌र्हले हेही येऊन उभे ठाकले.
*  मारुतीने यापूर्वीही सदोष वाहने मागे बोलाविली आहेत. यामध्ये हॅचबॅक श्रेणीतील ए-स्टारचा समावेश होता.
*  जवळपास एक लाख ही वाहने सदोष इंधन टाकीच्या कारणास्तवच फेब्रुवारी २०१० मध्ये परत बोलाविण्यात आली होती. त्याचबरोबर यामध्ये निर्यात केलेल्या काही गाडय़ांचाही समावेश होता. यंदाही तेच निमित्त मिळाले आहे. मात्र संख्या वाढली आहे व वाहन प्रकारदेखील.
*  उपरोक्त तीन वाहन प्रकारांमध्येही इंधन टाकीच्या तोंडाशी दोष आढळून आला आहे. अनेक गाडय़ांच्या इंधन टाकीतून गळती झाल्याच्या तसेच इंधनाचा वास सातत्याने येत असल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या आहेत, त्यामुळे ज्या गाडय़ांच्या तक्रारी आल्या त्यांना पुन्हा परत बोलावून कंपनी त्यातील दोष नाहीसे करून देणार आहे. तेही कोणतीही रक्कम न आकारता. ही प्रक्रिया सुरुही झाली आहे.
*  मारुती सुझुकीच्या वाहनांमध्ये दोष निर्माण झाला तो भाग जेबीएम कंपनीने पुरविला आहे. विशेष म्हणजे या कंपनीत मारुतीचा जवळपास ३० टक्के हिस्सा आहे. म्हणजे मारुतीला अन्य कुणाला दोष देता येणार नाही व कारवाईचे तर नावच घ्यायला नको.
* कंपनीच्या त्या काळात बनविलेल्या अनेक गाडय़ा अद्याप विक्रेत्यांकडेच असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे त्यांनाही आता चिंता ग्रासली आहे. मारुतीला गेल्या काही महिन्यांत सामोरे जावे लागलेल्या कामगार-व्यवस्थापन संघर्षांतून रिकॉलसारखा प्रकार उद्भवला असल्याचे मानले जाते. या दरम्यान उभयतांदरम्यान केवळ हिंसक संघर्षच उभा ठाकला नाही तर कंपनीला टाळेबंदी (म्हणजे स्वत:हून उत्पादन निर्मिती ठप्प ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा लागला.) घोषित करावी लागली.

Story img Loader