मर्सिडीज या आलिशान कार बनविणाऱ्या जर्मन कंपनीने गेल्या अनेक दशकांपासून भारतीय ग्राहकांना भुरळ घातली आहे. मर्सिडीजमधून फेरफटका मारणे म्हणजे त्यांच्यासाठी ‘स्टेटस सिंबॉल’ बनला आहे. ही भारतीय ग्राहकांची आवड ओळखून कंपनीने ग्राहकांना हवा तसा रंग, अंतर्गत रचना, सीट आदींचा पर्याय खुला करून आपल्या ‘डिझायनो’ श्रेणीमध्ये तीन कार उपलब्ध करून दिल्या आहेत.
एएमजी एस ६३ कुपे
मर्सिडीजच्या स्वप्नवत कार एएमजी एस ६३ कुपेकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. या कारची निर्मिती करताना कंपनीने ‘आधुनिक व काहीतरी वेगळे  देण्याचा प्रयत्न केला आहे. ही कार चालविण्याचा चांगला अनुभव येण्यासाठी कारचे वजन कमी करण्यात आले आहे. तसेच दोन दरवाजा व हवा तसा रंग देण्याची सुविधा यामुळे ही कार ग्राहकांना बघताच क्षणी पसंतीस उतरणार आहे. या कारचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे तिची अंतर्गत रचना. डॅशबोर्ड, सीट व इतर अंतर्गत रचना तीन वेगवेगळ्या लेदरमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच ही रचना हाती म्हणजेच हस्तकलेने बनविण्यात येत असल्याने प्रवासाचा आनंद आणखी द्विगुणित होणार आहे. एएमजी एस ६३ कुपे ही कार नावाप्रमाणेच एएमजी ४मॅटिक ऑल व्हील ड्राइव्हचा अनुभव देणारी आहे. या कारला ५.५ लिटरचे व्ही ८ प्रकारातले बायटबरे इंजिन बसविण्यात आले आहे. ते ४३० किव्ॉट (५८५ अश्वशक्ती)चे निर्माण करते. यामुळे ही कार ० ते १०० किमी एवढा वेग केवळ ३.९ सेकंदात घेते.
तंत्रज्ञान नव्हे जादू..
एस ६३ कुपेचे आणखी एक महत्त्वपूर्ण वैशिष्टय़ म्हणजे बहुप्रतीक्षित असलेले ‘मॅजिक बॉडी कंट्रोल’ तंत्रज्ञान. हे तंत्रज्ञान म्हणजे खरोखरच एक जादू आहे. कार वेगात असताना वळणावर प्रवाशाला वळण जाणवू न देण्याची किमया यामध्ये साधण्यात आली आहे. यामध्ये वळणावर बाह्य़ बाजूकडून येणारा दाब नियंत्रित करण्यात आला आहे. यामध्ये हायड्रॉलिक सस्पेंशन वापरण्यात आले असून कार आतील बाजूला २.६५ अंशांमध्ये झुकते.
सुरक्षेसाठी पर्याय..
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आपल्या गरजेनुसार ग्राहक हे पर्याय निवडू शकतो. यामध्ये ब्रेक असिस्ट बीएएस प्लस, धोक्याची आगावू सूचना देणारी प्री-सेफ ब्रेक यंत्रणा, द्रुतगती मार्गावर लेन बदलत असताना वाहन येत असेल तर त्याची सूचना देणारी यंत्रणा आदींचा अंतर्भाव आहे.

एस ५०० कुपे
मर्सिडीजच्या दुसऱ्या एस ५०० कुपे या कारमध्ये डिझायनो श्रेणीतील ६३ कुपे कारमधील बहुतेक सर्व सोयी पुरविण्यात आल्या आहेत. या कारमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. यामध्ये डायमंड ग्रिल, मस्क्युलर बंपर, दोन दरवाजा, १७ इंचाचे अ‍ॅलॉय व्हील, सन रूफ यामुळे ही कार आकर्षक दिसते. या कारमध्ये ४.७ लिटरचे व्ही ८ प्रकारातील इंजिन जे ३३५ किव्ॉट शक्ती देते. ० ते १०० किमी प्रति तासचा वेग केवळ ४.६ सेकंदात घेते. अंतर्गत रचनाही आकर्षक ठेवण्यात आली आहे.

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात मर्सिडीजने एकाच वेळी तीन कार बाजारात उतरवून धमाका उडवून दिला. यामध्ये एस ५०० कुपे, एएमजी एस ६३ कुपे आणि एएमजी जी ६३ ‘क्रेझी कलर’ या एकापेक्षा एक उत्कृष्ट कारचा समावेश आहे. या कारच्या निर्मितीमध्ये मर्सिडीजने कोणतीही कसर ठेवली नसून सर्वोत्तम तंत्रज्ञान, स्पोर्टी लुक, अत्याधुनिक ग्राहकांना आवडेल अशी रचना, सजावट, यंत्रणा यांचा अंतर्भाव केला आहे.

जी ६३ ‘क्रेझी कलर’चा अंदाज
मर्सिडीजने भारतीय ग्राहकांच्या साहसी आवडीनिवडी लक्षात घेऊन एएमजी जी ६३ ‘क्रेझी कलर’ हे वाहन बाजारात उतरविले आहे. हे एसयूव्ही प्रकारातील वाहन १९७०-८०च्या दशकाची आठवण करून देते. एएमजी जी ६३ ‘क्रेझी कलर’मध्ये तीन रंग उपलब्ध आहेत. सोलार बीम, सनसेट बीम आणि एलियन ग्रीन हे तीन आकर्षक रंग आहेत. या प्रकारच्या वाहनाची रचना १९७०च्या सुरुवातीला करण्यात आली होती. १९७९मध्ये जी-व्ॉगन प्रकारातील वाहन प्रत्यक्षात आले. याला ऑन रोड- ऑफ रोड वाहन प्रकारासाठी बनविण्यात आले होते. जर्मन भाषेत याला गेलांडेव्ॉगन म्हणून ओळखले जायचे.  या प्रकारातील वाहने खासकरून लष्करी अधिकारी, जंगल सफरींचा छंद असणारे, साहसी वाहन शर्यती आदींसाठी केला जात होता.
मर्सिडीजने एएमजी जी ६३ हे  वाहन जुना आनंद पण नव्या, अत्याधुनिक अंदाजामध्ये पेश करून ग्राहकांची साहसी आवड अद्याप कायम असल्यावर शिक्कामोर्तब केले आहे. या एएमजी जी ६३ मध्ये मर्सिडीजने ताकद, नवा लुक देतानाच मर्सिडीजचा आलिशानपणा कसा देता येईल याकडेही लक्ष पुरविले आहे. गाडीची अंतर्गत रचना, आरामदायीपणा, तंत्रज्ञान याकडे विशेष लक्ष दिले आहे. ही एसयूव्ही बनविताना जंगलातील खाचखळगे, पाणी, चिखलमय भाग, डोंगर आदी पार करताना लागणाऱ्या सर्व बाबींचा विचार केला आहे. जमिनीपासूनची उंची २२ सेंमी, उंच भूभाग चढताना लागणारी उंची, ताकद आदींचा उत्कृष्ट मिलाफ यामध्ये करण्यात आला आहे.
वैशिष्टय़े….
४ ५.५ लिटर व्ही ८ प्रकारातील हे इंजिन ५४४ अश्वशक्ती एवढी ताकद * ० ते १०० किमी प्रति तासाचे वेग अवघ्या ५.४ सेकंदात. * सर्वाधिक वेग २१० किमी प्रती तास  उच्च शक्तीबरोबरच कमी इंधन वापरण्यासाठी पेट्रोल इंजेक्टरचा वापर  * सहा जणांची आसनक्षमता * ऑल व्हील ड्राइव्हसोबत डिस्क ब्रेक, एअर बॅग, आकर्षक सायलेन्सर
हेमंत बावकर -hemant.bavkar@expressindia.com

Story img Loader