मर्सिडीज या आलिशान कार बनविणाऱ्या जर्मन कंपनीने गेल्या अनेक दशकांपासून भारतीय ग्राहकांना भुरळ घातली आहे. मर्सिडीजमधून फेरफटका मारणे म्हणजे त्यांच्यासाठी ‘स्टेटस सिंबॉल’ बनला आहे. ही भारतीय ग्राहकांची आवड ओळखून कंपनीने ग्राहकांना हवा तसा रंग, अंतर्गत रचना, सीट आदींचा पर्याय खुला करून आपल्या ‘डिझायनो’ श्रेणीमध्ये तीन कार उपलब्ध करून दिल्या आहेत.
एएमजी एस ६३ कुपे
मर्सिडीजच्या स्वप्नवत कार एएमजी एस ६३ कुपेकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. या कारची निर्मिती करताना कंपनीने ‘आधुनिक व काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न केला आहे. ही कार चालविण्याचा चांगला अनुभव येण्यासाठी कारचे वजन कमी करण्यात आले आहे. तसेच दोन दरवाजा व हवा तसा रंग देण्याची सुविधा यामुळे ही कार ग्राहकांना बघताच क्षणी पसंतीस उतरणार आहे. या कारचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे तिची अंतर्गत रचना. डॅशबोर्ड, सीट व इतर अंतर्गत रचना तीन वेगवेगळ्या लेदरमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच ही रचना हाती म्हणजेच हस्तकलेने बनविण्यात येत असल्याने प्रवासाचा आनंद आणखी द्विगुणित होणार आहे. एएमजी एस ६३ कुपे ही कार नावाप्रमाणेच एएमजी ४मॅटिक ऑल व्हील ड्राइव्हचा अनुभव देणारी आहे. या कारला ५.५ लिटरचे व्ही ८ प्रकारातले बायटबरे इंजिन बसविण्यात आले आहे. ते ४३० किव्ॉट (५८५ अश्वशक्ती)चे निर्माण करते. यामुळे ही कार ० ते १०० किमी एवढा वेग केवळ ३.९ सेकंदात घेते.
तंत्रज्ञान नव्हे जादू..
एस ६३ कुपेचे आणखी एक महत्त्वपूर्ण वैशिष्टय़ म्हणजे बहुप्रतीक्षित असलेले ‘मॅजिक बॉडी कंट्रोल’ तंत्रज्ञान. हे तंत्रज्ञान म्हणजे खरोखरच एक जादू आहे. कार वेगात असताना वळणावर प्रवाशाला वळण जाणवू न देण्याची किमया यामध्ये साधण्यात आली आहे. यामध्ये वळणावर बाह्य़ बाजूकडून येणारा दाब नियंत्रित करण्यात आला आहे. यामध्ये हायड्रॉलिक सस्पेंशन वापरण्यात आले असून कार आतील बाजूला २.६५ अंशांमध्ये झुकते.
सुरक्षेसाठी पर्याय..
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आपल्या गरजेनुसार ग्राहक हे पर्याय निवडू शकतो. यामध्ये ब्रेक असिस्ट बीएएस प्लस, धोक्याची आगावू सूचना देणारी प्री-सेफ ब्रेक यंत्रणा, द्रुतगती मार्गावर लेन बदलत असताना वाहन येत असेल तर त्याची सूचना देणारी यंत्रणा आदींचा अंतर्भाव आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा