सणासुदीच्या मुहूर्तावर नवनवीन गाडय़ा रस्त्यावर उतरवण्याची स्पर्धा वाहननिर्मात्यांमध्ये लागली आहे. टाटाची झेस्ट येत नाही तोच मारुतीने सिआझ ही सेडान प्रकारातली गाडी उतरवली. आता त्यात मर्सिडिझची भर पडली आहे. मर्सिडिझझने सहा सिलिंडरचे शक्तिशाली डिझेल इंजिन असलेली ई ३५० सीडीआय ही गाडी सादर करून या स्पध्रेची तीव्रता आणखी वाढवली आहे. अनेक सोयीसुविधांनी युक्त असलेली ई ३५० सीडीआय राज्य करायलाच जणू अवतरली आहे, असा तिचा थाट आहे..
मर्सिडिझचे सीडीआय हे मॉडेल भारतातील सर्वाधिक खपाचे म्हणून समजले जाते. याच सीडीआयचे नवीन सुधारित रूप म्हणून मर्सडिीझने नुकतेच ई ३५० सीडीआय हे मॉडेल लाँच केले आहे. या नव्या गाडीविषयी जाणून घेऊ या..
बाह्यरूप
नव्या ई ३५० सीडीआयच्या पुढील भागात करण्यात आलेले बदल हे पूर्वी सर्व ई-श्रेणीतील मॉडेलमध्ये केलेल्या बदलांशी सुसंगत आहेत. या ब्रॅण्डचे वेगळेपण उठून दाखविणाऱ्या सर्व आकारांना त्यात समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नव्या ई ३५० सीडीआयचे बाह्यरूप आता अधिक देखणे झाले आहे. हेडलॅम्पच्या आतील भागातील दिव्यांच्या प्रवाही रचनेमुळे दर्शनी भागात ई-श्रेणीची ओळख ठरलेल्या ‘चार डोळे’ प्रकारचा ठसा कायम राखण्यात आला आहे.
ई-श्रेणीच्या मोटारींमध्ये पूर्वीच केलेल्या बदलांमध्ये या मोटारींच्या रेडिएटरच्या केंद्रस्थानी चांदणीची रचना करण्यात आली होती. नव्या ई ३५० सीडीआयमध्येही हीच संकल्पना कायम ठेवण्यात आली असून त्यामुळे मोटारीला स्वतंत्र आणि अधिक स्पोर्टी दृश्यस्वरूप लाभले आहे. आता मागच्या दरवाजाच्या खालच्या भागातून टेल लाइटपर्यंत एक फीचर रेषा खेचण्यात आली आहे. नवी ई ३५० सीडीआय आता अधिक गोलसर आणि देखणी वाटते, पण त्यामुळे तिच्या वेगवान आणि दणकट दिसण्यात काही बाधा आलेली नाही. पुनर्रचित ई-श्रेणीच्या मोटारींत एलईडी टेललाइटची रचना आडवी करण्यात आली असून ते दुरंगी दिवे मोटारीची रुंदी ठसवितात, तर फायबर ऑप्टिक दिव्यांमुळे रात्री वेगळे डिझाईन दिसते. नव्या ई ३५०सीडीआयचे मल्टीस्पोक १७ इंची लाइट अ‍ॅलॉय व्हील चमकदार असून मोटारीचा आलिशान दर्जा आणि स्पोर्टी स्वरूप अधोरेखित करतात.
इंटेलिजन्ट असिस्टन्स सिस्टम्स :नव्या ई ३५० सीडीआयमध्ये मोटार चालविण्याचा सर्वस्वी नवा, अधिक आनंददायक अनुभव देण्यात मर्सडिीझ-बेंझच्या इंटेलिजन्ट असिस्टंट सिस्टम्सचा वाटा मोठा आहे. तांत्रिक प्रगती आणि नव्या शोधांमुळे नवी ई ३५० सीडीआय चालविणे आता अधिक आनंददायक, सोयीचे झाले आहे. या नव्या यंत्रणेत इको स्टार्ट-स्टॉप सेवा कायमस्वरूपी समाविष्ट करण्यात आली असून त्याच्या जोडीला इंटेलिजन्ट लायटिंग सिस्टम उपलब्ध करण्यात आली आहे. त्यात प्रकाशझोत सर्वत्र सारखा पडण्याची सोय असून कॉर्निरग ही अतिरिक्त सुविधाही पुरविली आहे. हाय बीम असिस्ट यंत्रणेत ३६० अंशांत वळणारा कॅमेरा आहे. शिवाय टायरमधील दाब कमी होत असल्याचे सूचित करणारी यंत्रणा, कमांड ऑनलाइन सेवा आणि अटेन्शन असिस्ट या सेवाही आहेत.

अंतर्भाग
नव्या ई ३५० सीडीआयच्या अंतर्भागात उच्च दर्जाच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. या मोटारीच्या डॅशबोर्डाला चकचकीत (हाय ग्लॉस) काळ्या रंगाच्या लाकडी रंगाने मढविले आहे. या विशेष रासायनिक प्रक्रिया केलेल्या चकचकीत काळ्या लाकडी रंगामुळे नव्या ई ३५० सीडीआयला आधुनिक आणि स्टायलिश रूप लाभले आहे. उच्च दर्जाची चंदेरी क्रोमची फ्रेम, डॅशबोर्डच्या कडेने (खालच्या भागात) केलेली मंद दिव्यांची सोय आणि चारही दरवाजांवर बसविलेल्या कापडामुळे मोटारीच्या अंतर्भागातील वातावरण प्रसन्न वाटते. बसल्यावर पाठीला आधार देण्याच्या सुविधेमुळे मोटारीतील आसने अधिकच आरामदायी झाली आहेत. ‘आर्टिको’’ चामडय़ाने मढविलेल्या आसनांमुळे आत बसल्यावर आलिशानतेचा अनुभव येतो. चालक व त्याच्या शेजारच्या प्रवाशाच्या आसनांना ‘मेमरी’ची सोय असून त्यांची उंची वाढविण्याची सुविधा आहे. शिवाय पाठीला हव्या त्या कोनात आधार देण्याची व तिची गादी पुढे-मागे करण्याची सुविधा आहे. ई ३५० सीडीआयमध्ये बसविलेल्या कमांड ऑनलाइन मल्टीमीडिया यंत्रणेत १७.८ इंची हाय रिझोल्युशन रंगीत डिस्प्ले, इंटरनेट, यूएसबी आणि ब्ल्यूटूथ कनेक्शन, माहिती साठविण्यासाठी १०जीबीची क्षमता तसेच दिशादिग्दर्शनासाठी जीपीएस यंत्रणा बसविल्याने चोखंदळ ग्राहकांसाठी ही मोटार अतिशय आकर्षक ठरते. कमांड ऑनलाइन यंत्रणेत आजवरच्या सर्वात आधुनिक दिशादिग्दर्शन व टेलिमॅटिक सेवा समाविष्ट असून त्यात पेट्रोल पंप, एटीएम, रुग्णालय, रेस्तराँ, हॉटेल वगरेंची माहिती दिलेली आहे.

सुरक्षा
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नव्या ई ३५० सीडीआयमध्येही आठ एअरबॅग्ज आहेत. चालक व पुढच्या प्रवाशासाठी अ‍ॅडेप्टिव्ह डय़ुएल स्टेज एअरबॅग्ज देण्यात आल्या असून साइड इम्पॅक्ट व खिडक्यांसाठीही एअरबॅग बसविण्यात आल्या आहेत. वेगात असतानाही मोटारीवर संपूर्ण नियंत्रण राखण्यासाठी अ‍ॅक्सिलरेशन स्किड कंट्रोल (एएसआर), ब्रेक असिस्ट(बीए)सह इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅम (ईएसपी) या यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत. मर्सिडिझने विकसित केलेल्या ‘प्री-सेफ’ तंत्रज्ञान तसेच समोरासमोरच्या टकरीत डोके पुढे आपटू नये यासाठी असलेली ‘नेक-प्रो’ यंत्रणा यामुळे आसने आरामदायी आणि सुरक्षितही होतात. चालकाला डुलकी लागल्यामुळे किंवा त्याचे चालवण्याकडे लक्ष नसल्यामुळे मोटार भरकटत जाऊ लागल्यास चालकाचे लक्ष वेधण्यासाठी असलेली ‘अटेन्शन असिस्ट’ ही यंत्रणाही आता ई-श्रेणीत कायमस्वरूपी बसविण्यात आली आहे. चालक, पुढील व मागील प्रवाशाला आपल्या आसनपट्टय़ाचा ताण कमी-जास्त करण्याची सोय आणि धडकेच्या धक्क्यापासून प्रवाशांना सुरक्षित ठेवणारी तीन टप्प्यांतील इम्पॅक्ट प्रोटेक्शन यंत्रणा ही यातील सुरक्षा यंत्रणेची ठळक वैशिष्टय़े होत. रात्रीच्या वेळी रस्त्यांवर असलेल्या कमी-अधिक प्रकाशामुळे सर्वत्र सारखा प्रकाश टाकणारी इंटेलिजन्ट लाइट यंत्रणा व त्यातील कॉर्निरग सुविधा यामुळे रात्रीच्या वेळी मोटार चालविणेही सुरक्षित झाले आहे. याच्या जोडीला अडेप्टिव्ह हाय बीम असिस्ट ही पूरक यंत्रणा असून त्यात स्वयंचलित हाय व लो बीम प्रकाश योजना ठेवली आहे.

सुविधा
ई ३५० सीडीआयच्या छतात बसविलेले विस्तृत सनरूफ मोटारीत थेट नसíगक प्रकाश तर आणतेच पण मोकळ्या आकाशाचे दर्शनही घडवते. अ‍ॅक्टिव्ह पाìकग असिस्ट या यंत्रणेत जोडलेल्या ‘पार्कट्रॉनिक्स’ यंत्रणेमुळे चालकाला मोटार पार्क करणे अतिशय सोपे झाले आहे. ३६० अंशांतून वळणाऱ्या कॅमेऱ्यामुळे मोटार उभी करण्यासाठी सर्वात सोयीची जागा चालकाला सूचित केली जाते. याशिवाय अ‍ॅक्टिव्ह स्टिअरिंग इंटरव्हेन्शन या वाढीव सुविधेमुळे पार्क करणे तसेच मोटार चालविणे अधिक सुखकर झाले आहे. ई ३५० सीडीआयमध्ये एक अतिरिक्त चाकही देण्यात येत असल्याने चालकाला दिलासा मिळाला आहे. हे पूर्ण आकाराचे चाक ठेवल्यानंतरही सामान ठेवण्यासाठी प्रशस्त जागा उपलब्ध होते.

पॉवर व टॉर्क
ई ३५०सीडीआयमध्ये वापरण्यात आलेल्या विविधांगी यंत्रणा आणि सुविधांमुळे ती आपल्या श्रेणीतील एकमेवाद्वितिय मोटार ठरते. यातील व्ही ६ डिझेल इंजिनाची क्षमता २९८७सीसी असून १६००-२४०० आरपीएमला ते इंजिन ६२०एनएम इतकी शक्ती निर्माण करते. ताशी १०० किमीचा वेग घेण्यास या मोटारीला अवघे सहा सेकंद लागतात.

किंमत
नवी ई ३५० सीडीआयची किंमत ५४.४२ लाख रुपये असून ती देशभरातील मर्सिडिझ-बेंझच्या सर्व शोरूम्समध्ये उपलब्ध आहे.

* ३६० अंशांत वळणारा कॅमेरा
* मल्टीस्पोक १७ इंची अ‍ॅलॉय व्हील
* इंजिन क्षमता २९८७सीसी
* ताशी १०० किमीचा वेग
* नलाइन मल्टीमीडिया
* स्वयंचलित  प्रकाश योजना

Story img Loader