भारतीय ऑटोमोबाइलची बाजारपेठ ही केवळ नव्या गाडय़ांवरच अवलंबून नसून यातील बराच मोठा वाटा जुन्या किंवा वापरलेल्या गाडय़ांचाही आहे. पाश्चात्त्य देशांमध्ये तर युज्ड कार्सची आर्थिक उलाढाल खूप मोठी आहे. दाराबाहेर नवीन कोरी करकरीत चार चाकी हवी, ही भारतीयांची धारणा हळूहळू बदलत आता दाराबाहेर जुनी का होई ना, पण गाडी हवी, इथपर्यंत पोहोचली आहे. पण जुन्या गाडय़ा घेताना काही गोष्टींची काळजी घेणं खूप महत्त्वाचं ठरतं..
आपल्या दारात नवीन कोरी करकरीत फियाट किंवा मारुती-८०० उभी राहावी, यासाठी एके काळी उच्चभ्रूच नाही, तर उच्च मध्यमवर्गही धडपडत होता. त्यांना कोणी तरी वापरलेली नाही, तर स्वत:ची नवीनच गाडी हवी होती. पण या नव्या गाडय़ा जुन्या होत गेल्या, कनिष्ठ मध्यमवर्गीयांच्या हातातही बऱ्यापैकी पैसा खुळखुळू लागला आणि आधी कोणी तरी वापरलेल्या, पण सुस्थितीत असलेल्या गाडय़ा एखाद्या बैठय़ा घरासमोर दिसायला लागल्या. पाश्चात्त्य देशांमध्ये अगदी सर्रास दिसणारी युज्ड कार संस्कृती आपल्याकडेही फोफावायला सुरुवात झाली.
सध्या तर या युज्ड कार संस्कृतीचा प्रसार प्रचंड प्रमाणात झाला आहे. इतका की, एखाद्या कारच्या शोरूममध्येच आता युज्ड कार्स घेण्यात रस असलेल्या ग्राहकांसाठी वेगळा कक्ष असतो. या गाडय़ा घेण्यासाठी बँकाही जास्त व्याजदराने कर्ज देऊ लागल्या आहेत. जसजसा युज्ड कारचा बोलबाला होऊ लागला आहे, तसतशी युज्ड कार घेताना नेमकी कोणती काळजी घ्यावी, याबाबत ग्राहकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ही काळजी घेणं अत्यावश्यक आहेच. कारण वापरलेल्या असल्या, तरी या गाडय़ांच्या किमती ८० हजारांपासून पाच-आठ लाखांपर्यंत असू शकतात. तसंच या गाडय़ा वापरलेल्या असल्याने त्यांचं आयुर्मान आधीच कमी झालं असतं. पण खालील काळजी घेऊन ग्राहक सर्रास गाडी घेऊ शकतात.
युज्ड कार घेण्याआधी-
अशी गाडी घेण्याआधी काही गोष्टींचा विचार करणं अत्यावश्यक आहे. यात तुमचं बजेट, तुमची गरज आणि गाडीचं मायलेज यांचा विचार होणं गरजेचं आहे. गाडी घेण्याआधी तुमचं बजेट निश्चित होणं गरजेचं आहे. तुम्ही गाडी विकत घेण्यासाठी नेमके किती पैसे बाजूला काढले आहेत, हे ठरलं असेल, तर त्या बजेटमधल्या गाडय़ा तुम्ही शोधू शकता. तुम्ही गाडी हप्त्यावर घेत असाल, तर त्यासाठी अनेक ऑनलाइन संकेतस्थळांवरून गाडीची किंमत आणि तुम्हाला पडणारा हप्ता यांची आकडेवारी तुम्हाला मिळू शकेल. कदाचित तुम्हाला आवडलेली गाडी तुमच्या बजेटपेक्षा थोडी जास्त किमतीत असेल. अशा वेळी तुमची नेमकी गरज काय आहे, हा घटक निर्णायक ठरू शकतो. पाच जणांच्या कुटुंबासाठी एखादी सेडान गाडी घ्यायची, की सतत लांबचा प्रवास करण्यासाठी एखादी स्पोर्ट युटिलिटी गाडी घ्यायची, की अगदी चौघांसाठी योग्य आणि इंधन बचत करणारी हॅचबॅक घ्यायची, याचा निर्णय तुम्ही आधीच घ्यायला हवा. तसंच उगाच कमी किमतीत मिळतेय, म्हणून एसयूव्ही पदरात पाडून घेण्याची घाईही करू नका. कदाचित तुम्हाला इंधनाचा खर्च पुढे भार वाटण्याची शक्यता आहे. तसंच वापरलेल्या गाडय़ांचं मायलेज हीदेखील विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यासाठीही तुम्ही ऑनलाइन संकेतस्थळांचा आधार घेऊ शकता. गाडी कोणत्या कंपनीची आहे, कोणते मॉडेल आहे, किती र्वष वापरात होती आणि किती किलोमीटर धावली आहे, यावरून गाडीचं मायलेज कळू शकतं. पण संकेतस्थळावर दाखवलेल्या मायलेजपेक्षा दोन ते तीन किलोमीटर प्रतिलिटर एवढं कमी मायलेज गाडी देईल, असं पकडून चालायला हरकत नाही.
गाडी घेताना-
गाडी घेण्याआधी त्या गाडीची चाचणी घेऊन बघा. त्याशिवाय गाडी घेताना सर्व कायदेशीर कागदपत्रं व्यवस्थित तपासून घ्या. गाडी तुमच्या नावावर नोंदवली गेली आहे, परिवहन कार्यालयातील सर्व कामं झाली आहेत, याची खात्री करून घ्यायला हवी. तसंच गाडी घेताना थोडी घासाघीस होणं स्वाभाविक आहे. तुमच्या बजेटपेक्षा तुम्ही थोडे खाली उतरूनच घासाघीस सुरू करायला हवी. मालकाने त्या ऑफरला नकार दिल्यास गाडीची स्थिती आणि इतर गोष्टींचा विचार करून किंमत वाढवायला हरकत नाही. त्यालाही नकार आला, तर मात्र तुम्ही तुमची अंतिम किंमत सांगा आणि त्यावर ठाम राहा. मालकाला ती पसंत असेल, तर उत्तम! नाही तर दुसरी गाडी पाहणे केव्हाही चांगलं आहे. गाडी विकत घेताना रोख रक्कम देऊन घेण्यापेक्षा डिमांड ड्राफ्ट देणं योग्य ठरेल. पण हा विचार ज्याने-त्याने स्वत: करायला हवा.
कोणत्या वापरलेल्या गाडय़ांना मागणी?
गेल्या काही वर्षांत वापरलेल्या गाडय़ांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. या गाडय़ांमध्ये प्रामुख्याने ह्य़ुंदाई, मारुती आणि टाटा या कंपन्यांच्या गाडय़ांची संख्या जास्त आहे. त्यातही ह्य़ुंदाई सेंट्रो, अॅसेंट या गाडय़ांची चलती आहे. त्याशिवाय मारुती सुझुकी कंपनीच्या एसएक्स-४ पासून स्विफ्ट डिझायर अशा गाडय़ा वापरलेल्या गाडय़ांच्या बाजारात चांगल्या दरांत विकल्या जातात. तसंच अनेक ठिकाणी ह्य़ुंदाई आय-१०, मारुती सुझुकी ऑल्टो या हॅचबॅक गाडय़ांनाही मागणी आहे. टाटा कंपनीच्या इंडिका आणि इंडिगो या दोन्ही गाडय़ांना चांगली मागणी आहे. मात्र या दोन्ही गाडय़ांपैकी बऱ्याच गाडय़ा ट्रान्स्पोर्ट कंपन्यांकडे असल्याने त्यांचे मायलेज तपासून मगच त्या विकत घेणं योग्य ठरेल.
गाडीची माहिती आणि निवड
बजेट आणि गरजा निश्चित झाल्या की, आपल्याला हवी ती गाडी निवडणं, ही कठीण बाब नाही. हे काम ऑनलाइन संकेतस्थळांनी आणखीनच सोप्पं करून ठेवलं आहे. तरीही तुमच्यासाठी ते थोडंसं कठीण आहेच. कारण गाडीची नेमकी काय माहिती घ्यायची आणि कशी घ्यायची, हे कळणं थोडं अवघड असतं. गाडीची निवड करताना विविध संकेतस्थळांना भेटी द्या. तुम्हाला आवडलेल्या आणि तुमच्या बजेटमध्ये असलेल्या निवडक आठ ते दहा गाडय़ांची यादी करा. संकेतस्थळावर दिलेली त्या गाडय़ांची सर्व माहिती नीट वाचा. फोटोही बारकाईने पाहा. तुम्ही निवडलेल्या गाडय़ांची परीक्षणंही नजरेखालून घालण्यास हरकत नाही. त्यामुळे तुम्हाला गाडीच्या अनेक बाबींची माहिती मिळू शकते. तसेच सद्यस्थितीत असलेली गाडी नेमकी विकत घेण्याजोगी आहे की नाही, याचीही तुलना तुम्ही करू शकता. पण एकच गाडी पाहून ती निवडण्याची घाई करू नका. त्यासाठी आठ ते दहा गाडय़ा नजरेखालून घालणं केव्हाही चांगलं आहे.
विक्रेता शोधा!
पूर्वी नातलगांपैकी एखादा गाडी विकायला काढत असेल, तर पटकन त्याला गिऱ्हाईक मिळत असे. गाडी विकणारा आणि विकत घेणारा, दोघेही एकमेकांच्या परिचयाचे असल्याने फार कष्ट पडत नव्हते. पण आता तुम्हाला युज्ड कार घ्यायची असेल, तर इंटरनेटसारखा दुसरा पर्याय नाही. त्याचबरोबर मारुती सुझुकी, ह्य़ुंदाई यांसारख्या कंपन्यांनी स्वत:च्या युज्ड कार शाखाही काढल्या आहेत. तुम्ही या कंपन्यांच्या शोरूममध्ये जाऊन त्या कक्षाकडून अशा गाडय़ांची माहिती आणि गाडय़ाही घेऊ शकता. त्याचप्रमाणे सध्या अशा जुन्या गाडय़ा विकण्यासाठी मदत करणारी अनेक संकेतस्थळे आहेत. या संकेतस्थळांवर तुमच्या शहरातील गाडी विकण्यास उत्सुक असलेल्या लोकांची माहिती मिळू शकते. तसेच काही वर्तमानपत्रांतील जाहिरातींवरूनही तुम्ही अशा जुन्या गाडय़ा शोधू शकता.
गाडीची कुंडली!
वापरलेली गाडी घेण्याआधी त्या गाडीची कुंडली, म्हणजेच इतिहास जाणून घेणं गरजेचं आहे. त्यात काही घटकांची तपासणी अत्यावश्यक आहे. यात गाडी किती अंतर धावली आहे, हे तपासून बघाच. साधारणपणे पेट्रोलवर धावणारी गाडी वर्षांला १२ हजार किलोमीटर धावते. तर डिझेलवर चालणाऱ्या गाडीचं प्रमाण हे वर्षांला १५ हजार किलोमीटर एवढं असावं. गाडीची परिस्थिती पाहून यात १० टक्के पुढे-मागे होऊ शकते. मात्र तीन वर्षांत ५० हजार किलोमीटरहून अधिक धावलेली गाडी घेणं टाळावं. ती गाडी पुढे खूप काम काढू शकते. त्याचबरोबर तीन वर्षांपेक्षा जुन्या गाडय़ा विकत घेण्याचेही शक्यतो टाळावे. कारण तीन वर्षांपेक्षा जुन्या गाडय़ा घेताना वित्तसाहाय्य आणि विमा यांबाबत समस्या उद्भवू शकतात. त्याचप्रमाणे या गाडय़ा पुढे खूप त्रास देऊ शकतात. तुम्हाला आवडलेली गाडी याआधी किती जणांनी वापरलेली आहे, हे पाहणंही फायद्याचे आहे. सेकंड हॅण्ड गाडी घेणंच योग्य आहे. पण ती गाडी थर्ड किंवा फोर्थ हॅण्ड असेल, तर मात्र शक्यतो ती घेणं टाळावं. कारण त्याचा फटका मायलेज आणि गाडीच्या एकंदरीत परफॉर्मन्सला बसू शकतो. तसेच गाडीची सर्व कागदपत्रंही नीट तपासून घेणं आवश्यक आहे. गाडीला याआधी कुठे अपघात झाला होता का, याची खातरजमा करून घ्या! अपघात झालेली गाडी शक्यतो घेणं टाळायलाच हवं. तसेच गाडीच्या मालकाकडे ओरिजनल आरसी बुक आहे, याचीही खात्री करून घ्या!
रॉनी टायरवाला
जुने, पण पण पारखून घेतल्यावर सोने!
भारतीय ऑटोमोबाइलची बाजारपेठ ही केवळ नव्या गाडय़ांवरच अवलंबून नसून यातील बराच मोठा वाटा जुन्या किंवा वापरलेल्या गाडय़ांचाही आहे. पाश्चात्त्य देशांमध्ये तर युज्ड कार्सची आर्थिक उलाढाल खूप मोठी आहे. दाराबाहेर नवीन कोरी करकरीत चार चाकी हवी, ही भारतीयांची धारणा हळूहळू बदलत …
First published on: 28-08-2014 at 07:46 IST
मराठीतील सर्व Drive इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Old is gold but after testing