पाऊस आला किंवा पाऊस येण्यापूर्वी आपण सर्व खबरदारी घेतो. छत्र्या, रेनकोट, पावसाळी चपला-बूट वगैरेची तजवीज केली जाते. बॅगेतील कागदपत्रे भिजणार नाहीत, मोबाइलमध्ये पाणी जाणार नाही याच्यासाठी हरतऱ्हेची काळजी घेतो. वाहनाचेही असेच असते. तुमची कार असो वा बाइक, पावसाळ्यात तिची काळजी घेतलीच गेली पाहिजे. नाही तर ती कुरकुर करणारच. अलीकडे वाहननिर्मात्या कंपन्याही पावसाळ्यात आपल्या कार/बाइकची काळजी कशी घ्यावी वगैरेची शिबिरे भरवत असतात.. थोडक्यात काय कारने कुरकुर करू नये यासाठी आपण तिची काळजी घ्यावी हेच योग्य..
पावसाळ्यात वाहन चालविणे अधिकच धोकादायक बनते. तेवढेच ते वाहतूक कोंडीमुळेही नकोसे होते. वाहन चालविताना सतत अनुभवास येणारा अस्पष्ट रस्ता यामुळे तर मोठे अपघात हे किरकोळ कारणासाठी घडलेले आपण पाहिले आहेत. बाहेरगावी जाताना दरडी कोसळून मार्ग बंद झाल्यावर वाहन तेथेच उभे करण्यावाचूनही पर्याय नसतो. अशा वेळी वाहनांची वेगळ्या पद्धतीने काळजी घेण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन पडते. म्हणजे केवळ पावसाच्या धारांपासून बचाव करण्याचेच नव्हे तर अन्य कारणांमुळेही वाहनाची निगा ही घ्यावीच लागते. अशा वेळी थेट टायरपासून गाडी आणि त्यातील इंजिन यांची स्थिती चांगली राहण्यासाठी धडपडावे लागते. पावसाळ्यात वाहनांचे टायर अधिक लवकर खराब होतात. इंजिनातील बिघाड तर सातत्याचाच.
मान्सूनपूर्व गाडी सर्व तयारीनिशी सज्ज ठेवली तर ऐन पावसाळ्यात अचानक उद्भवणाऱ्या समस्यांपासून काही प्रमाणात बचाव करता येतोच. त्यासाठी या तयारीबरोबर तिची चाचणीही घेण्याची खबरदारी घ्यावी. विशेषत: बॅटरीशी संबंधित इतर उपकरणे, सुविधा सुरळीत आहेत की नाही, हे आवर्जून पाहावे. हॉर्न, लाइट, इंडिकेटर, ऑटोमॅटिक डोअर लॉक अथवा ग्लास सिस्टम हे तपासून घ्यावे. थोडय़ा पाण्यातही या बाबींमध्ये बिघाड निर्माण होऊ शकतो. त्यासाठी पर्यायी व्यवस्थाही उपलब्ध करून घ्यायला हवी.
अनेक कंपन्या त्यांच्या वाहनांसाठी मान्सूनमध्ये विशेष वाहन तपासणी शिबीर, कार्यशाळा राबवीत असतात. या वेळी आवश्यक उपकरणे बदलण्याबरोबरच त्यांची सततची देखभालही उपलब्ध करून दिली जाते. गाडीची अंतर्गत काळजी पावसाळ्यात जेवढी घ्यावी तेवढीच ती बाहेरूनही घ्यावी लागते. विशेषत: वाहनाचा रंग न उडण्यासाठी काही आवश्यक प्रक्रिया करून घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर गाडीवरील स्टेनलेस स्टीलच्या वस्तूंना गंजविरोधक मुलामा लावून घ्यावा. टायरमधील हवा, गॅसवरील वाहन असल्यास तेथील सुरक्षा यावरही लक्ष द्यायला हवे. वाहनात गळती होत नाही हेही नजरेच्या टप्प्यात यायला हवे. या गळतीमुळे वाहनातील अंतर्गत विशेषत: आसन व्यवस्था विनाकारण खराब होण्याची शक्यता अधिक असते. अंतर्गत रचनेतही अधिक आकर्षकता टाळून आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी व्हायला हवी. त्याचबरोबर सततच्या पाण्याच्या सान्निध्यामुळे लेग स्पेसमध्ये नेहमी स्वच्छता होईल अथवा पाण्याचा निचरा होईल, हे पाहावे. पावसाळ्यात काचांवरील वायपर नेहमी चालू असेल असे पाहावे. रात्रीच्या वेळी लाइट जेवढा आवश्यक तेवढेच मान्सूनमध्ये वायपर. शक्यतो दोन्ही आणि आवर्जून चालकासमोरील वायपर चालू स्थितीत असायला हवे. अशा वायपरच्या अतिरिक्त जोडय़ा घेऊन ठेवल्या तरी बिघडत नाही. कारण त्यातील नाजूक रबर लवकर खराब होते अथवा ते नेमक्या मांडणीत नसेल तर नादुरुस्त होते. वायपरसाठी पाणी व्यवस्थित काचेवर पडते आहे ना त्याचीही चाचपणी करावी. गाडीचे टेल लॅम्पही व्यवस्थित प्रकाश बाहेर टाकतात ना हेही पाहायला हवे. इंडिकेटर लॅम्पवरील प्लॅस्टिकची आवरणे नीट आहेत का ती तुटलेली अथवा अपारदर्शक नाहीत ना हेही तपासून पाहावे. वाहनांमधील ब्रेकची स्थिती उत्तम आहे, हे सतत प्रात्यक्षिकाने तपासून पाहावे.
मध्यंतरी जेके टायर कंपनीने पावसाळ्यातील निगाविषयक मोहिमेची घोषणा केली होती. यानुसार सुरक्षित प्रवासासाठी कंपनीने देशातील ३२ शहरांमधून येत्या १६ ऑगस्टपर्यंत वाहन निगाविषयक प्रसार हाती घेतला आहे. विमा व्यवसायात नव्याने शिरकाव केलेल्या लिबर्टी व्हिडीओकॉन जनरल इन्शुरन्सनेही मान्सूननिमित्त वाहनांची निगा घेण्यासाठी विशेष प्रसार मोहीम राबविली आहे. कंपनी मोटर विमा क्षेत्रामध्ये अग्रणी आहे. मोटर विमा क्षेत्रातील त्यांचा अनुभव व विशेषता यांच्यापासून संकेत घेत कंपनीने कारमालकांकरिता पावसाळ्यात गाडी चालविण्यापूर्वी तपासणीच्या काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. त्या कारमालकांनी पावसाळ्यादरम्यान कारच्या काळजीसाठी विचारात घ्यायला हव्यात अशाच आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा