आपण वाहन चालवतो, वाहतुकीचे नियमही पाळतो.. मात्र, प्रत्येकवेळी आपल्याला सर्वच नियम माहीत असतील असे नाही. याविषयी कायदा काय म्हणतो याचीही अनेकांना माहिती नसते. मोटार वाहन नियमांची तसेच त्यातील बदलांची ओळख व्हावी, तसेच त्या अनुषंगाने येणाऱ्या सर्व बाबींची माहिती व्हावी यासाठी ड्राइव्ह स्ट्रेट सदर..
अनेकदा असे होते की, अपघात झाल्यानंतर जखमींना म्हणा किंवा मृतांच्या नातेवाइकांना म्हणा, मदत देण्याचे जाहीर होते. ती मदत खरोखर दिली जाते की नाही हा संशोधनाचा विषय आहे. मात्र, रस्ता अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला त्याच्या हक्काची नुकसानभरपाई मिळवण्याचे सर्वाधिकार न्यायसंस्थेने दिले आहेत. अपघात चालकाच्या हलगर्जीपणामुळे किंवा बेदरकारपणे गाडी चालवण्यामुळे झाला असेल तर त्या चालकावर भारतीय दंड संहिता कलम २७९ व मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा नोंदवला जातो. अपघातातील जखमींची अवस्था किरकोळ अथवा गंभीर स्वरूपाची असेल तर चालकावर भारतीय दंड संहिता कलम ३३७ व ३३८ नुसार अतिरिक्त कलमे लागतात. आणि जर अपघातग्रस्त मृत्यूमुखी पडला तर भारतीय दंड संहिता कलम ३०४ अ नुसार गुन्हा नोंदवला जातो. मात्र, हा गुन्हा केवळ हलगर्जीपणा किंवा बेदरकारपणे गाडी चालवल्यामुळे चालकावर दाखल होऊन त्यानुसार खटला चालवला जातो. इथेच ग्यानबाची मेख आहे. आपल्याला याच खटल्यातून नुकसानभरपाई मिळेल अशी आशा अपघातग्रस्तांना वाटत असते. वस्तुत परिस्थिती वेगळी असून अधिकाधिक नुकसानभरपाई पदरात पाडून घेण्यासाठी वेगळी लढाई लढावी लागते. त्यासाठी स्वतंत्ररित्या अस्तित्त्वात असलेल्या न्यायाधिकरणाकडे अर्ज करावा लागतो. याची बहुतांश लोकांना माहिती नसते. चालकावरील गुन्हा नोंदणी, त्याचे दोषित्व यातून अपघातग्रस्ताला मदत मिळणार असली तरी नुकसानभरपाई मिळण्याच्या रकमेवर त्याचा परिणाम होत असतो. न्यायालयाने मोटार अपघातात मिळणाऱ्या भरपाईचे सामान्य (जनरल डॅमेजेस) आणि विशेष (स्पेशल डॅमेजेस) भरपाई अशा दोन प्रकारांत विभाजन केले आहे. प्रथम प्रकारातील भरपाई मानसिक, शारीरिक आघात, होणारा त्रास, वेदना, होणारी गरसोय, जीवनातील होणारा त्रासदायक बदल इत्यादींसाठी दिली जाते. तर दुस-या प्रकारात मोटार अपघातामुळे पसे कमावण्याची क्षमता गमावणे, संपत्ती व व्यवसायात होणारे नुकसान, इतर खर्च जसे की, वैद्यकीय उपचारासाठी येणारा खर्च, तसेच ठराविक कालावधी साठी घ्यावा लागणारा स्पेशल डाएट, मदतनीस ठेवण्यासाठी लागणारा खर्च व या अनुषंगाने येणारा खर्च यांसाठी नुकसान भरपाई दिली जाते. मोटार वाहन कायदा, १९८८ कलम १४० मध्ये करण्यात आलेल्या तरतुदीनुसार अपघात हा अपघातग्रस्ताच्या चुकीने झाला किंवा कोणत्याही चालकाच्या अथवा वाहन मालकाच्या हलगर्जी शिवाय झाला तरीदेखील अपघातग्रस्ताच्या कायमचे अपंगत्व प्रकरणी २५ हजार व अपघातग्रस्ताच्या मृत्यूप्रकरणी त्याच्यावर अवलंबून असलेले कुटुंबियांना ५० हजार अशी त्वरित मदत दिली जाते. मात्र, त्यासाठी कलम १४० नुसार अर्ज केला जाणे आवश्यक ठरते. एकूणच सर्व प्रकरणाची चौकशी व निकाल लागून अंतिम नुकसान भरपाई मिळण्यास फार उशीर लागतो. म्हणून ही तरतूद करण्यात आली आहे. साधारणत कलम १४० अंतर्गत अर्जाचा निकाल हा ४५ दिवसांत लागला पाहिजे. अनेकदा असेही होते की, अपघात स्थळावरून वाहनधारक पळून जातो किंवा अपघात नेमका कोणत्या वाहनामुळे झाला हे समजत नाही. अशा परिस्थितीत अपघातग्रस्ताला त्वरित मदत मिळते का, त्यात कोणत्या अडचणी येतात, याची माहिती आपण पुढील भागात पाहू या.
आर्थिक नुकसानभरपाईचा हक्क
अनेकदा असे होते की, अपघात झाल्यानंतर जखमींना म्हणा किंवा मृतांच्या नातेवाइकांना म्हणा, मदत देण्याचे जाहीर होते. ती मदत खरोखर दिली जाते की नाही हा संशोधनाचा विषय आहे.
आणखी वाचा
First published on: 30-01-2014 at 10:27 IST
मराठीतील सर्व Drive इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Right of financial compensation