इंडिका मोटरींच्या उत्पादन मालिकेमध्ये टाटा मोटर्सने आता भर टाकत नेत इंडिका व्हिस्टा डी ९० ही एक आगळीवेगळी मोटार ग्राहकांसमोर ठेवली. लोकांच्या मनात असणारी मोटारीची नेमकी गरज ओळखून तशी मोटार आधुनिक साधनांचा व सामग्रीचा वापर करून सादर केली आहे. प्रवाशांना आसनस्थ होण्यासाठी असणारी सेदानसारखी आरामदायी आसन व्यवस्था. बसताना ऐसपैस वाटेल, अशी अंतर्गत रचना सेदान पद्धतीच्या मोटारीमध्ये बसल्याचा अनुभव देते. तर झटदिशी वेग घेत जाण्याची क्षमता एसयूव्हीची वाटते. पण हे सारे गुण स्पोर्टी लूकच्या हॅचबॅक असणाऱ्या टाटा मोटर्सच्या व्हिस्टा – डी ९० मध्ये देण्यात आले आहेत.
‘लोकसत्ता’ वृत्तान्तला खास टेस्ट ड्राइव्हसाठी ‘इंडिका व्हिस्टा डी ९०’ देण्यात आली. लोकांच्या मनातील अनेक मागण्या पूर्ण करणारी ही मोटार आहे की नाही, याचा अधिकाधिक मागोवा या टेस्ट ड्राइव्हमधून घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. एकंदर या टेस्ट ड्राइव्हमधून दिसलेली व जाणवलेली ही ‘इंडिका व्हिस्टा डी ९०’ नव्या काळातील वैशिष्टय़पूर्ण मोटार म्हणावी लागते. किमतीच्या तुलनेत काहीशी महाग असणारी ही मोटार गुणवान आहे हे मात्र नक्की!
‘इंडिका व्हिस्टा डी ९०’ रुंदीला साधारण मध्यम आकाराच्या सेदान इतकी असून लांबीला छोटय़ा हॅचबॅकपेक्षा मोठी आहे. लांबी चार मीटरपेक्षा आत आहे. त्यामुळेच आतील रचनेत सेदानसारखा प्रशस्तपणा देण्याचा प्रयत्न करता आला आहे. वर्दळीच्या रस्त्यावर चालविताना टर्निग रेडिअस (मोटार वळविण्याचा परीघ) चांगला असून त्यामुळे व्हिस्टा या मार्गावर प्रभावीपणे वापरता येते. ९० पीएस इतकी ताकद देऊ शकणारी व्हिस्टा वर्दळीच्या ठिकाणी नियंत्रितपणेही चालविता येते व आवश्यक तेव्हा झटकन पुढे नेण्यासही उपयुक्त ठरते.
व्हिस्टा डी ९० ला हाताने गीअर टाकावे लागतात. अजून तरी अ‍ॅटोमॅटिक गीयर्सची सुविधा यात देण्यात आलेली नसली तरी गीयर्स सहजसुलभ आहेत, ते टाकताना अडचण वाटत नाही. त्यांची रचनाही योग्य जागी असल्याने गीयर टाकताना अडचणीचे वाटत नाही व गतीने ते वापरता येतात.
डिझेल डी ९० मधील वरच्या श्रेणीत असलेली व्हिस्टा अद्ययावत सुविधा देण्यात आल्या असून यामध्ये पॉवर विंडो, मोटारीच्या चावीच्या भोवती इल्युमिनिटेड रिंग, सात प्रकारची गती असलेले वायपर्स ज्यामुळे वायपरची गती कोणती हवी ते पर्याय अधिक आहेत, इंधनाची टाकी उघडण्यासाठी व डिक्की उघडण्यासाठी आतील बाजूला देण्यात आलेल्या नियंत्रण कळीमुळे एकाच ठिकाणी तुम्हाला त्याचा ठाव मिळतो.
चालकासाठी उंचीची बाब ही महत्त्वाची असते, त्यामुळे आसन वर-खाली करण्यासाठी सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला आपल्या उंचीप्रमाणे आसनस्थिती नीट करता येते, तसेच त्यामुळे तुमची समोर असणारी नजरही तुम्हाला मोटार रात्री चालविताना समोरच्या मोटारीचा हेडलॅम्प डोळ्यांवर येणार नाही याची सोय पाहता येते. पॉवर स्टिअरिंग रॅक अ‍ॅण्ड पिनिअन असून ते अतिशय संवेदनशील आहे. त्यामुळे मोटार नियंत्रित करणे खूप सोपे जाते. टर्निग रेडिअस मात्र छोटय़ा जागेत तसा फार चांगला नाही. मात्र पॉवर स्टिअरिंगमुळे तसा फार त्रास होत नाही. विशेष करून गर्दीच्या ठिकाणी पूर्ण यू टर्न घेणे तसे सोपे जात नाही. वातानुकूलित यंत्रणेसाठी पूर्ण ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोलची सुविधा असून एचव्हीएसी नियंत्रणही यात दिलेले आहे. आरशातून मागील वाहनांची स्थिती पाहण्यासाठी वा मागे मोटार घेताना मागील स्थिती जमिनीवर काय आहे, तेही दृश्य स्थितीत येतील अशी आरशांची रचना असून ते आरसेही आतील बटनांद्वारे नियंत्रित करता येता. ज्यामुळे मागे दिसणारी दृश्यमानता जुळवून घेणे सोपे जाते. याशिवाय मल्टि ट्रीप मीटर, डिजिटल क्लॉक, नेव्हिगेशन सिस्टिम, ६.७ इंचाचा टचस्क्रीन असणारा एलसीडी ज्याद्वारे केवळ बोटाच्या स्पर्शाद्वारे संपूर्णपणे संगीत वेगवेगळ्या सॉफ्टवेअरवर ऐकण्याची सुविधा मिळते, एफएम ऐकता येतो. यूएसबीचा वापर करता येतो व ब्लूटूथद्वारे मोबाइल संलग्न करता येतो, तो मोटारीत बसून हातात न घेता वापरता येतो, ध्वनिक्षेपक यंत्रणाही त्यात चांगली दिली असून त्यात चार ध्वनिक्षेपक व दोन ट्विटर देण्यात आले आहेत. त्यांच्या आवाजाचा दर्जाही उत्तम आहे. बाहेर तापमान किती आहे, ते देखील तुम्हाला कळू शकते. आसनासाठी वापरण्यात आलेले कापड, लेदर व अंतर्गत रचनेतील प्लॅस्टिक हे चांगल्या दर्जाचे आहे. अंतर्गत रंगसंगतीत दुहेरी रंग दिले असून बाहेरही टपाला दुसरा साजेसा रंग देण्यात आला आहे. मागील आसन व्यवस्थेत ६०/४० असे विभाजन असल्याने अर्धी जागा तुम्हाला आसन मुडपून सामानासाठीही वापरता येऊ शकते. दुसऱ्या रांगेतील आसन व त्यापुढील चालकाच्या रांगेची मागची बाजू यामधील अंतरही भरपूर व ऐसपैस असल्याने मागे बसणाऱ्याला अतिशय आरामदायीपणे बसता येते.
वाहन चालकाच्या दृष्टीने ही मोटार चालविण्यास कठीण वाटत नाही. मोटार मागे घेताना पुढील काचेला (विंडस्क्रीन) मध्यवर्ती लावलेल्या आरशातून मागील बाजूच्या काचेतून असणारी दृश्यमानता व्यापक आहे. मात्र जमिनीकडील भाग पूर्णपणे पाहण्यासाठी उजव्या व डाव्या बाजूला बाहेरच्या अंगाला असलेल्या आरशांचा वापर करावा लागतो. पण त्यातून दृश्यमानता अतिशय व्यवस्थित आहे. मागील वाहनांचा अंदाज मध्यवर्ती असलेल्या विंडस्क्रीनवर लावलेल्या आरशातून मागील रस्त्याची दृश्यमानता व्यवस्थित व्यापक वाटते. त्यामुळे ओव्हरटेक करताना हा आरसाही पुरेसा आहे. गर्दीच्या रस्त्यावरही त्याचा वापर पुरेसा ठरू शकतो. चालकाच्या आसनाला वर-खाली करता येते, त्यामुळे काहीशा बुटक्या व्यक्तीलाही मोटार चालविणे सोपे जाते व स्टिअरिंग खाली वर करता येते त्यामुळेही उंच व्यक्तीला वाहन चालविताना आपल्याला हवी त्याप्रमाणे स्टिअरिंगची स्थिती जुळवून घेता येते. आसनही पुढे-मागे करताना बैठक व पाठीचा भाग या दोन्ही बाबी जुळवून घेण्याची सुविधा वरच्या श्रेणीत देण्यात आली आहे. चावी आतच राहू नये वा आसनाचा पट्टा लावण्यास विसरू नये याची आठवणही बीप आवाजाने करून दिली जाते. एअर बॅगची सुविधा वरच्या श्रेणीत दिली आहे. एकूण सुरक्षिततेच्या मुद्दय़ांचाही विचार करताना इंडिका व्हिस्टा डी ९० ने ग्राहकाला सेदान दर्जाच्या मोठय़ा मोटारीच्या सुविधा देऊ केल्या आहेत.
क्वॉड्राजेट इंजिन व्हीजीडी तंत्रासह नव्याने संशोधित करून देण्यात आले असून ते करताना मायलेज चांगले कसे मिळेल व कमी वेळेत वेग घेता कसा येईल याचाही विचार केला आहे. बॉनेट उघडून पाहिल्यास काही बाबी तशा सोयीस्कर वाटतात तर काही बाबींमुळे बॉनेटची जागा खचाखच कोंबल्यासारखी वाटते. यामुळे इंजिनाला मोटार चालू असताना नैसर्गिकरीतीने मिळणारी हवा लागण्याची योजना फार फलप्रद वाटत नाही. इंजिनामुळे ४००० आरपीएममध्ये ९० पीएस इतकी ताकद मिळत असून १७५०-३००० आरपीएममध्ये २०० एनएम टॉर्क मिळू शकतो. इंजिनाचे हे नवे रूप नक्कीच उपयुक्त आहे. बाहेरचे तापमान किती आहे, हे कळण्यासाठी डॉशबोर्डवर सेन्सर (संवेदक) लावला असून त्यामुळे सूर्याच्या किरणांमुळे मिळणारा तापमान समजण्याचा भाग संवेदकाद्वारे डॅशबोर्डमधील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छोटय़ा स्क्रीनवर दिसतो. यात तुमच्या वेगानुसार किती मायलेज मिळू शकते, किती वाजले आहेत, यासाठी दिलेले डिजिटल घडय़ाळ या जमेच्या बाजूही आहेत. आरपीएम मीटरमुळे तुमच्या वेग देण्याच्या आणि मायलेज चांगले मिळविण्याच्या मानसिकतेत नक्कीच फरक पडू शकतो. यामुळे यात दिलेला हा आरपीएम मीटर तुमच्या वाहनचालनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
एबीडी ईबीडीसह असून ब्रेक लावताना मोटार नियंत्रणात झटकन येते. १५.५ सेकंदात मोटारीचा वेग कमाल ताशी ० ते १०० किलोमीटर इतका गाठता येतो. यामुळेच एसयूव्हीसारख्या वेगवेडाची किमयाही काही प्रमाणात अनुभविता येते. अलॉय व्हील, टायरचा आकार यामुळे मोटार रस्ता पकडून धावते हे विशेष.
एक चांगली हॅचबॅक व सेदान मोटारीचा दर्जा देण्याचा टाटा मोटर्सचा हा प्रयत्न काही प्रमाणात फिनिशिंगमध्ये कमी पडल्याचे जाणविते. विशेष करून जोडणीच्या ठिकाणी, प्लॅस्टिक व रबर यांची जेथे जोडणी दिसते, सांधे असतात, तेथे ढिसाळ काम मात्र खेददायक वाटते. आसन मागेपुढे करताना काहीसे कडकपणा जाणविणारे आहेत. वाहन वेगात घेतो त्या वेळी साधारण ताशी १२० किलोमीटर वेगाने जाताना स्टिअरिंग जाणविण्याइतके व्हायब्रेट होते. थरथरते. रचनेमध्ये, फिनिशिंगमध्ये व आरेखनात अंतर्गत सुविधादायी रचनेत काही बाबतीत आणखी काही सुधारणा अपेक्षित वाटतात. ज्यामुळे त्यांचा वापर करताना भविष्यात त्रासदायी वाटू शकतात. या काही बाबी वगळता टाटा मोटरची ही हॅचबॅक देशातील विविध भागांतील चांगले व वाईट रस्ते यावर प्रभावीपणे वाटचाल करण्याची ताकद असणारी म्हटले तर चूक ठरणार नाही. केवळ स्पोर्टी लूक आहे म्हणून ती स्पोर्ट कार नव्हे तर कुटुंबासह प्रवास करतानाही सुखकर व सुरक्षित प्रवास घडवून देणारी ही मोटार आहे.
इंडिका व्हिस्टा डी ९० मधील वैशिष्टय़े
*    टचस्क्रीन मल्टिमिडिया सिस्टिम
*    पूर्ण ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल
*    वाहनचालकाच्या माहितीसाठी अ‍ॅडव्हान्स इन्फर्मेशन सिस्टिम
*    नेक्स्ट जनरेशन इन्स्ट्रमेंट क्लस्टर
*    स्टिअरिंगवर मोबाइल फोनसाठी, म्युझिक सिस्टिमच्या आवाजावरील नियंत्रणादी बटणांच्या सुविधा
*    मागील बाजूला बसलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी मोबाइल चार्जिग करण्याची स्वतंत्र सुविधा
*    बाहेरील आरशांसाठी इलेक्ट्रिक नियंत्रण सुविधांची बटणे, वाहनचालकाच्या उजव्या हाताच्या आवाक्यात.
*    ब्लू ५ तंत्रज्ञान यामुळे ब्लू टुथ सुविधा त्यामुळे ५ मोबाइल फोन संलग्न करण्याची सुविधा.
*    मागील वायपरची अद्ययावत प्रणालीयुक्त सुविधा.
*    कमाल वेगाची क्षमता ताशी १५८ किलोमीटर.
*    १५.५ सेकंदात ताशीवेग ० ते १०० किलोमीटर इतका वाढविण्याची क्षमता.
*    टीएफटी इंटरफेस असलेला स्क्रीन त्यात जीपीएस नेव्हिगेशनची सुविधा अंतर्भूत.
तांत्रिक वैशिष्टय़े
लांबी/रुंदी/उंची (सर्व एमएम) : ३७९५/१६९५/१५५०
इंजिन : क्वॉड्राजेट ९०, बीएस ४ डिझेल इंजिन, १२४८ सीसी, ४ सिलेंडर, व्हीजीटी (व्हेरिएबल जॉमेट्री टबरेचार्जर)
कमाल ताकद : ९० पीएस- ४००० आरपीएम
कमाल टॉर्क : २२ एनएम – १७५०-३००० आरपीएम.
टायर्स : १७५/६५ आर १४- रॅडिअल टय़ूबलेस
गीयर्स : पाच पुढील व एक रिव्हर्ससाठी
सस्पेन्शन : फ्रंट – इंडिपेंडंट लोअर विशबोन, कॉइल स्प्रिंगसह मॅकफर्सन स्टर्ट, रेअर – सेमी इंडिपेंडंट, कॉइल स्प्रिंगसह ट्विस्ट बीम, शॉकअ‍ॅब्सॉर्बर.
स्टिअरिंग :  पॉवर असिस्टेड रॅक अ‍ॅण्ड पिनिअन
ब्रेक्स : व्हॅक्यूम असिस्टेड इंडिपेंडंट डय़ुएल सर्किट, डायग्नोल स्प्लिट, हायड्रॉलिक ब्रेक्स – फ्रंट डिस्क ब्रेक, रेअर ड्रम ब्रेक.
इंधन टाकी क्षमता : ४४ लीटर डिझेल
व्हीलबेस : २४७० एमएम
ग्राऊंड क्लीअरन्स : १६५
बूट स्पेस : २३२ लीटर
रंगसंगती : पोर्सेलिन व्हाइट, स्पाइस रेड, अल्ट्रा व्हायोलेट, कॅव्हर्न ग्रे, जेट सिल्व्हर
मुंबई एक्सशोरूम मूल्य : व्हीएक्स – झेड एक्स क्लॉड्राजेट – ९० पीएस – ६ लाख ११ हजार २५८ रुपये, झेड एक्स क्लॉड्राजेट – ९० पीएस – ६ लाख ५८ हजार ५६२ रुपये,  झेड एक्स प्लस क्यूजेट – ९० पीएस ६ ६ लाख ९४ हजार २८८ रुपये ( याशिवाय जकात, नोंदणी, विमा आदी आकार वेगळे)

Story img Loader