बाइक चालवताना हेल्मेट हवेच अशी सक्तीच सध्या आहे. मात्र, ती झुगारून देऊन बेफाम गाडी चालवण्याची हौस अनेकांना असतेच. अशा बेफाम बाइकस्वारांमध्ये केवळ महाविद्यालयीन तरुणच असतील असे नाही, चांगले नोकरदारही बिनधास्त हेल्मेटशिवाय बाइक चालवताना रस्त्यावर सहज आढळून येतात.. हेल्मेट घालायला बाइकनेच तुम्हाला सक्ती केली तर.. अशा स्मार्ट हेल्मेट बाजारात येऊ घातल्यायत..
कारची बाइकला धडक.. बाइकस्वाराच्या डोक्याला जबर दुखापत.. निसरड्या रस्त्यावरून बाइक घसरून दोघे जखमी.. डोक्याला जबर मार..
या व अशा अपघाताच्या बातम्या आपण रोज नाही तरी आठवड्यातून तीन-चारदा तरी वाचत असतो. या बातम्या वाचून अनेकजण त्या विसरूनही जातात. पण, ज्यांचे अशा अपघातांमध्ये नुकसान झाले असते, त्यांचं काय.. त्यांना ती जखम एकतर आयुष्यभर वागवावी लागते नाही तर काही काळासाठी तरी.. अपघातांना अनेक कारणे असतात, प्रत्येकवेळी त्यात तुमचीच चूक असेल असे नाही. पण तरीही अपघात होतातच. आणि अपघात होत असले तरी काही कोणी बाइक चालवणं सोडत नाही. किंबहुना दिवसागणिक त्यात वाढच होत असते. असो, मुद्दा बाइकस्वारांच्या सुरक्षेचा आहे. थोडक्यात सेफ्टी फर्स्ट..
अगदी काल-परवाचीच गोष्ट आहे, केंद्र सरकारने वाहतूक सुरक्षेचे नियम अधिकाधिक कठोर केले आहेत. वानगीदाखल सांगायचे झाल्यास सीटबेल्ट न लावता कार चालवत असाल तर अमुक रुपये दंड, दारू पिऊन गाडी चालवत असाल तर तमुक रुपये दंड, हेल्मेट न वापरता दुचाकी चालवत असाल तर अमुक-अमुक रुपये दंड (म्हणजे यापूर्वीही हे नियम होते परंतु आता दंडाच्या रकमेत वाढ केली आहे, कारण या दंडाला घाबरून तरी लोक जबाबदारीने गाड्या चालवतील ही त्यामागची भावना) वगरे वगरे. या नियमांचे पालन होते की नाही याची काटेकोर तपासणी केली जाते की नाही हा संशोधनाचा विषय असला तरी नियमांचे उल्लंघन करण्यात आपण कायम आघाडीवरच असतो. म्हणजे, हेल्मेट तर घातलेले नाही आणि समोर वाहतूक पोलीस उभे आहेत तर त्यांना टाळून कसं जाता येईल याकडे आमचा ओढा. कारण नाही तर उगाच ५०० रुपये दंड बसायचा, तो टाळला की झालं. हो पण हे झालं तात्पुरतं, वाहतुकीचे नियम आपल्याच सुरक्षेसाठी बनवलेत हे कळतं पण वळत नाही, अशातली गोष्ट आहे.
बाइक चालवताना हेल्मेट हवेच अशी सक्तीच सध्या आहे. मात्र, ती झुगारून देऊन बेफाम गाडी चालवण्याची हौस अनेकांना असतेच. अशा बेफाम बाइकस्वारांमध्ये केवळ महाविद्यालयीन तरुणच असतील असे नाही, चांगले नोकरदारही बिनधास्त हेल्मेटशिवाय बाइक चालवताना रस्त्यावर सहज आढळून येतात. हेल्मेट सक्ती आपल्यासाठी नाहीच जणू असा त्यांचा थाट असतो. हेल्मेट सक्तीचा कसा बोजवारा उडवला असाही त्यांचा अविर्भाव असतो. म्हणून काय यावर काहीच उपाय नाही का. हेल्मेट घालणे सक्तीचे असलेच पाहिजे याबाबत दुमत नाही, पण त्याची कठोर अंमलबजावणी आपल्यासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात शक्यच नाही का. खरोखर आपण हेल्मेट घालण्याची सक्ती बाइकस्वारांवर करू शकतो का. या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत होय..
आयआयटी विद्यार्थ्यांचा आविष्कार..
देशात होणारे बहुसंख्य रस्ते अपघात हे दुचाकीस्वारांचे असतात, असे एका संशोधनातून सिद्ध झाले आहे. बाइक अपघातातील बहुसंख्य मृत्यू हे डोक्याला जबर मार बसल्यामुळेच झाल्याचेही आढळून आले आहे. त्यामुळेच बाइक चालवताना डोक्याच्या सुरक्षेसाठी हेल्मेट सक्ती अगदी आवश्यकच असते. मात्र, त्याचे काटेकोर पालन होताना दिसत नाही. त्यामुळे यावर काहीतरी उपाययोजना शोधायला हवी यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यात मुंबई, आयआयटीच्या दोन विद्यार्थ्यांना यश आले आहे. इलेक्ट्रिकल इंजिनीअिरगच्या दुस-या वर्षांत शिकत असलेल्या या विद्यार्थ्यांची नावं आहेत रोहन पिल्लई आणि विवेक कुमार. त्यांनी असं एक तंत्र विकसित केलंय की हेल्मेट डोक्यावर असल्याशिवाय बाइक सुरूच होऊ शकणार नाही. त्यांच्या या आविष्काराला बळ दिलं ते राजेश गंगर या उद्योजकानं.
उन्हाळी सुट्टीत आयआयटीच्या मुलांना प्रोजेक्ट करायचे असतात. अभ्यासक्रमातील एखादा विषय घेऊन दोन महिने एखाद्या कंपनीत काम करत त्यावर त्यांना प्रोजेक्ट रिपोर्ट आयआयटीत सादर करायचा असतो. त्यानुसार रोहन आणि विवेक यांनी राजेश यांच्याकडे काम करण्यास सुरुवात केली. या दोघांनीही दोन महिने अथक परिश्रम करत स्मार्ट हेल्मेटची निर्मिती केली.
काय आहे तंत्रज्ञान?
बाइकस्वाराच्या हेल्मेटवर काही सेन्सर्स आणि कंट्रोलर्स लावले जातील. हे सेन्सर्स आणि कंट्रोलर्स बाइकच्या इग्निशनला सिग्नल देतील की ज्यामुळे बाइकस्वाराने हेल्मेट घातले आहे, याचे सिग्नल्स मिळून बाइक सुरू होऊ शकेल. सेन्सर्स हेल्मेटच्या आत व बाहेर फिक्स केलेले असतील. त्यामुळे त्यातून निघणारे सिग्नल्स कायम इग्निशनला हेल्मेटची पोझिशन कळवत राहतील. बाइकस्वाराने हे स्मार्ट हेल्मेट घातलेच नसेल तर इग्निशन स्टार्ट होणार नाही परिणामी गाडी बंद अवस्थेतच राहील. अशा प्रकारे हेल्मेट परिधान केल्याशिवाय बाइकस्वाराला गत्यंतरच उरणार नाही. या तंत्रज्ञानाचे पेटंट आपल्या नावे करण्याची तयारी सुरू आहे. डिसेंबपर्यंत या स्मार्ट हेल्मेट बाजारात येतील अशी शक्यता आहे.
स्मार्ट हेल्मेट..
बाइक चालवताना हेल्मेट हवेच अशी सक्तीच सध्या आहे. मात्र, ती झुगारून देऊन बेफाम गाडी चालवण्याची हौस अनेकांना असतेच. अशा बेफाम बाइकस्वारांमध्ये केवळ महाविद्यालयीन तरुणच असतील असे नाही, चांगले नोकरदारही बिनधास्त हेल्मेटशिवाय बाइक चालवताना रस्त्यावर सहज आढळून येतात..
First published on: 06-08-2012 at 11:25 IST
मराठीतील सर्व Drive इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smart helmet drive drive it automobile two wheeler tech technology