आपल्या बाइकला किक मारावी आणि निघावं सुसाटत.. पार अगदी जगाचीच भ्रमंती करून यावं असंच प्रत्येकाला वाटत असतं. कारण आपलं आणि बाइकचं नातंच असं असतं. मात्र, प्रत्येकाला हे बाइकवरून जगभ्रमंती करण्याचं स्वप्न पूर्ण करता येतंच असं नाही. त्याला अनेक गोष्टी कारणीभूत असतात. पण म्हणून काही कोणी स्वप्न पाहण्याचं सोडून देत नाही. विशाखापट्टणमच्या भारद्वाज दयालाचंही असंच होतं. मात्र, त्याने बाइकवरून जगभ्रमंती करण्याचं स्वप्न सत्यात उतरवलं. दीड वर्षांत
४७ हजार किमीचा प्रवास एकटय़ाने बाइकवरून केल्यानंतर तो दिमाखात मायदेशी परतला. त्याचा हा विक्रम आहे जुनाच पण अजूनही त्याला यापेक्षा आणखी काही वेगळं करण्याचा ध्यास आहे. अशा या बाइकवेडय़ाशी मारलेल्या गप्पा..
भारद्वाज दयाला मूळचा विशाखापट्टणमचा. बाइकचं वेड असलेल्या या तरुणाने
२ एप्रिल २००६ ते २ ऑक्टोबर २००७ असा दीड वर्ष बाइकवरून जगभरात प्रवास केला. पाच खंड, १४ देश आणि ४७ हजार किमीचा प्रवास असा त्याचा विक्रम आहे. कोणतेही पाठबळ नसताना एकटय़ाच्या बळावर त्याने ही भ्रमंती केली. बाइकवरून जगभ्रमंती करणारा तो एकमेव भारतीय आहे. त्याच्या या प्रवासाविषयी त्याने लोकसत्ताशी शेअर केलेला अनुभव.
जगभ्रमंती आणि तीही बाइकवरून, कसं काय शक्य झाले हे..?
माझ्या लहानपणापासून मला नवनवीन ठिकाणं पाहण्याची, जगभर फिरण्याची हौस होती. आपली ही हौस भागवण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असायचो. जग फिरायचं असेल तर विमानातून त्याची काही मजा घेता येणार नाही. त्यामुळे मग बाइकचा पर्याय मी शोधला. अनेकदा आपण आपल्याभोवतालच्या विश्वालाच जग समजायला लागतो. मात्र, खरं जग त्यापलीकडे असते. त्यामुळे त्याची अनुभूती घ्यावी यासाठी मोटारसायकल हा सर्वोत्तम पर्याय असून त्याच्यावरूनच जगभ्रमंती करण्याचा मी निर्णय घेतला.
जगाच्या सफरीवर निघताना तू कोणत्या बाइकला आधी प्राधान्य दिले होते..?
अर्थातच माझी पहिली पसंती होती रॉयल एन्फिल्डला. तेव्हा मी बुलेटच्या प्रेमात होतो. आणि आपल्याकडे अजूनही हीच सर्वात दणकट बाइक आहे. मात्र, एन्फिल्डच्या निर्मात्यांनी तिच्यात सुधारणा करण्याचा कधी प्रयत्न केला नाही. अर्थात आता त्यात बरीचशी सुधारणा झाली आहे. आणि शिवाय लांबच्या प्रवासात बुलेटमध्ये कधीही कोणताही प्रॉब्लेम निर्माण होण्याचा धोकाही होता. त्यामुळे मी नवीन तंत्रज्ञानाने युक्त अशा हिरो होंडा करिझ्माची निवड केली. त्यामुळे मी माझा पुढचा अख्खा प्रवास याच बाइकवरून केला.
दीड वर्ष, १४ देश आणि ४७ हजार किमी प्रवास, काय वाटतं..?
मी थोडा नाराज होतो. कारण किमान एक लाख किमीचा पल्ला गाठायची माझी योजना होती. मात्र, ती शक्य होऊ शकली नाही.
भविष्यात काय योजना आहेत..?
आगामी काळात बाइकवरून दक्षिण अमेरिका आणि संपूर्ण युरोप पालथे घालण्याची तीव्र इच्छा आहे.
तुझ्या प्रवासाच्या मार्गाविषयी काही सांग..?
प्रथमत विशाखापट्टणम ते मुंबई असा माझा प्रवास होता. तेथून इराणची राजधानी तेहरानला विमानाने गेलो. तिथून मग बाइकने तुर्कस्तान, सिरिया, जॉर्डन असं करत करत लाल समुद्रामाग्रे आफ्रिका खंडात उतरलो. तिकडून पुन्हा इजिप्तला परतलो. पुन्हा परतीचा प्रवास तुर्कस्तानातून मग ग्रीसमाग्रे युरोपात प्रवेश केला. तिथून मग इटली, कॅनडा व इंग्लिश खाडी ओलांडून ब्रिटनमध्ये गेलो. ब्रिटनहून विमानाने टोरांटोला (कॅनडा) आलो. कॅनडातून उत्तर डाकोटामाग्रे अमेरिकेत प्रवेश केला. अमेरिकेतील बहुतेक प्रमुख शहरांमध्ये बाइकवरून फिरलो. त्यानंतर जहाजमाग्रे ऑस्ट्रेलियाला गेलो. दरम्यानच्या काळात मी विमानाने फिजी व न्यूझीलंडलाही गेलो. तेथेही बाइक चालवली. ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड फिरून इंडोनेशियात आलो. तेथून बांगलादेश आणि १८ महिन्यांच्या भटकंतीनंतर भारत-बांगलादेश सीमेवरून मायदेशात आगमन केले.
तुला तुझ्या प्रवासात बाइकबाबत काही अडचण आली का..?
अशा प्रकारच्या प्रवासात कोणतीही बाइक त्रास देणारच. कारण प्रत्येकवेळी हवामान वेगळे असते. त्याचा परिणाम नाही म्हटलं तरी मशीनवरही होतोच की. त्यात मी कोणतीही विशेष रचना असलेली बाइक नव्हे तर स्ट्रीट बाइक चालवत होतो. त्यामुळे अनेकदा बाइक ब्रेकडाऊन झाल्याचा अनुभव मला आला. परंतु प्रवासाला निघतानाच मी या अशा प्रकारच्या त्रासावर मात करण्याची तयारी ठेवली होती. ब्रेकडाऊन झालेली बाइक मी स्वतच रिपेअर करायचो. त्यासाठी मी माझ्याकडे एक किट तयार करून ठेवले होते.
कोणत्या प्रकारची अडचण जास्त अनुभवायला मिळाली..?
दर दोन हजार किमीच्या प्रवासानंतर माझ्या बाइकची चेन निखळून पडायची. बाइकच्या पुढील भागाचे ब्रेकही सल व्हायचे. मग त्यावर मी स्वतच रिपेअिरग करायचो किंवा मग स्थानिक पातळीवरील मेकॅनिकला गाठायची वेळ यायची. घरी परतेपर्यंत तर माझ्या बाइकच्या इंजिनात मी स्वतच अनेक बदल केले होते. जसे की, नवीन सििलडर टाकले, पिस्टन बदलले, क्रँक केसेस नव्या टाकल्या, टायर बदलवले, गीअर व्हील्सही बदलवले इ. इ.
प्रवासाला निघताना तू तुझ्या बाइकमध्ये काही विशेष बदल केले होते का..?
होय, मी माझ्या करिझ्माला दोन पॅनिअर बॉक्सेस लावून घेतले आणि मागील बाजूला मोठा बॉक्स जोडून घेतला. पुढील बाजूलाही दोन स्टील बॉक्स लावले. तर इंधनटाकीवर कॅमेरा बॉक्स बसवला. या सर्व जामानिम्यामुळे बाइकचे वजन वाढून अनेकदा ती डुगडुगायची. बाइकला चांगली गती मिळावी यासाठी मी कब्र्युरेटर थोडे अधिक क्षमतेचे लावून घेतले होते.
बाइकवरून जगभ्रमंती करू इच्छिणाऱ्या तरुणांना काय सांगशील..?
नुसता विचार करू नका.. कृती करा. किमान दहा लाख तरुणांना तरी माझ्यासारखं बाइकवरून जगभ्रमंती करावं असे वाटत असेल. तुम्हीही हे करू शकता. मात्र, त्यासाठी इच्छाशक्ती दांडगी असायला हवी आणि मार्गातील सर्व अडथळे दूर करून ध्येय गाठण्याची आसक्ती हवी.
अनंत असावी ध्येयासक्ती
आपल्या बाइकला किक मारावी आणि निघावं सुसाटत.. पार अगदी जगाचीच भ्रमंती करून यावं असंच प्रत्येकाला वाटत असतं. कारण आपलं आणि बाइकचं नातंच असं असतं.
First published on: 28-11-2013 at 11:10 IST
मराठीतील सर्व Drive इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Visakhapatnam biker moves to world tour