जुन्या धाटणीच्या गाडय़ा आताशा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. दुचाकी स्कूटर्स असतील किंवा येझदी, व्हेस्पा, लॅमरेटा इत्यादी उत्पादकांच्या दुचाकी असतील, नवीन मोटरसायकल्सनी, विशेषत स्पोर्टस् बाइक्सनी, या सर्व दुचाक्यांना नामशेष करून टाकले आहे. मात्र, आजही अनेकांचा ‘जुनं ते सोनं’ या म्हणीवर विश्वास आहे. त्यामुळेच जुन्या गाडय़ांचे जतन करणे आणि त्यांना आधुनिक रुप देण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. चारचाकींबाबत तेच दुचाकींबाबतही आहे. त्यामुळेच यामाहावर प्रेम करणारे अनेकजणांनी आजही त्यांच्या जुन्या यामाहा बाइक्स जतन करून ठेवल्या आहेत. त्या रस्त्यावर धावताना दिसतातही.
यामाहाच्या या सर्व दुचाकींचे इंजिन हे टू स्ट्रोक आहे. म्हणजेच आजच्या काळातील बाइक्सच्या तुलनेत त्यांचे मायलेज फारच कमी आहे. तरी देखील या जुन्या, फार आवाज करणाऱ्या आणि अधिक इंधन खाणाऱ्या यामाहाबाबत आजही क्रेझ कायम आहे. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे, की यामाहाने त्यांचा या बाइक्सची कधीच ‘इंधन बचत करणारया बाइक्स’ अशी जाहिरात केलेली नाही. यामाहाच्या गाडय़ा नेहमीच वेगवान, अधिक पीक-अप असणाऱ्या म्हणूनच ओळखल्या जातात.
मूळची जपानची असलेली ही कंपनी आज जगभरात विस्तारलेली आहे. दुचाकी निर्मिती हा या उद्योगाचा एक छोटासा भाग आहे. मात्र, आज त्याने संपूर्ण विश्वच व्यापून टाकले आहे. बाइक्सबरोबरच यामाहा जहाजांचे इंजिन्स, हेलिकॉप्टर, रोबोट्स निर्मिती इत्यादी कित्येक क्षेत्रात आपले अस्तित्व टिकवून आहे. १९५५ सालापासून यामाहा दुचाकी निर्मितीच्या क्षेत्रात आहे. तेव्हापासून यामाहाने दैनंदिन वापराच्या दुचाकी, रेसिंगच्या वेगवान दुचाकी व अन्य अनेक प्रकारच्या दुचाकींची निर्मिती करण्यास सुरुवात केली आणि आजपर्यंत त्यांच्या शेकडो मॉडेल्सनी बाजारपेठेत पाय रोवले आहेत.
यामाहाचे भारतातील स्थान
यामाहाच्या टू स्ट्रोक इंजिन असलेल्या बाइक्सना एकेकाळी भारतीय बाजारपेठेत प्रचंड मागणी होती. मात्र, त्या फक्त एका विशिष्ट वर्गातच लोकप्रिय होत्या. केवळ वेगवान दुचाकी हवी असणारे आणि त्या परवडू शकणारे लोकच या दुचाकींचा विचार करायचे. फोर स्ट्रोक इंजिनाच्या शोधानंतर जसे अधिकाधिक इंधन बचत करणारे पर्याय ग्राहकासमोर येऊ लागले, ग्राहक या अधिक इंधन बचत करणाऱ्या दुचाकींना पसंती देऊ लागले. बदलत्या बाजारपेठेची ही गरज लक्षात घेऊन यामाहानेही फोर स्ट्रोक इंजिनाचा वापर करून भारतीय बाजारपेठेत बाइक्स उतरवल्या. अल्बा, G5, फेजर, स्पार्क, FZ अशा कितीतरी यामाहा बाइक्स आजपर्यंत बाजारपेठेत येऊन गेल्या आहेत. विविध पसंतीच्या आणि गरजेच्या ग्राहकांकरता विविध दुचाकी बाजारपेठेत उतरवूनही यामाहाचा बाजारपेठेत हवा तसा जम बसलेला नाही. FZ ही त्यांची स्पोर्टस् बाइक्स वगळता इतर सर्व दुचाकींना ग्राहकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा