‘‘माझ्या स्वभावातील औत्सुक्य, कुतूहल यापायी मी इतकी झपाटून जाते की मला अमुक गोष्ट का जमणार नाही? मी ते करून पाहाणारच या विचारापर्यंत माझी मजल जाते आणि जिद्दीने मी ती गोष्ट करतेच. नाटकाचंही तसंच झालं. पहिल्या ऑडिशनच्या वेळी स्वत:ला बजावत राहिले, ‘‘मला हे जमलंच पाहिजे.’’ माझी पहिलीच एन्ट्री. वाक्य होतं, ‘‘हाय!’’ तेव्हा ‘हाय’ एवढं प्रचलित नव्हतं. मी त्यांनाच प्रश्न केला, ‘‘ही हाय नक्की कोणती? हाय खातो ती की हाय म्हणतो ती?’’ सगळे हसले, मी वाचन केलं. माझ्या पहिल्याच वाक्यावर माझी निवड पक्की झाली. तेव्हा प्रथमच कळलं की विनोदी नाटक अधिक गंभीरपणे करावं लागतं. पण ते करताना मला अजिबात जड गेलं नाही. आणि  ‘मला हे जमणार नाही’ हे वाक्यच मी आयुष्यातून पुसून टाकलं.’’

‘‘मी सहावीत होते तेव्हा! पुण्याच्या हुजूरपागा शाळेच्या आवारात मोठी विहीर होती. चार पायऱ्या उतरून आत गेलं की त्याजागी एक दरवाजा होता. त्याला कुलूप होतं. असं म्हणायचे की आत एक भुयार आहे. ते शनिवारवाडय़ापर्यंत जातं. आम्हाला सक्त ताकीद होती की तिथे जायचं नाही. एखादी गोष्ट करू नको म्हटलं की मला प्रश्न पडतो की मी ते का करायचं नाही? मग माझी उत्कंठा, कुतूहल शिगेला पोहोचत असे आणि मी ती गोष्ट करून पाहायचीच असं ठरवते. त्याही वयात मी त्या भुयारात उतरायचं नक्की केलं. संधी साधून एक दिवस बॅटरी, सुरी, वॉटर बॉटल तिथे नेऊन ठेवली. मला मैदानी खेळांची खूप आवड! डॉजबॉल खेळून सगळे पांगले. मैदानावर सामसूम झाली तशी उतरत्या संध्याकाळी मी त्या विहिरीत उतरले. दगडाने चार घाव घालताच ते गंजलेलं कुलूप तुटलं. बॅटरीच्या उजेडात मी आत चालायला सुरुवात केली. मला त्या काळोखात भुयारातून चालताना अजिबात भीती वाटली नाही. जेमतेम पंधरा-वीस पावलं चालले आणि मला सळसळ ऐकू आली. मी बॅटरीचा उजेड समोर टाकला तर माझ्यापासून पाच पावलांवर एक पिवळाधम्मक नाग फणा काढून उभा! माझी बोबडीच वळली. बॅटरी, चाकू, सगळं सामान खाली टाकलं आणि धूम पळत सुटले. मधेच अडखळले. पडले. उठले. पुन्हा धावले. असं करत मातीने माखून घरी आले ती पुढे दोन दिवस शाळेकडे फिरकलेच नाही. नंतर मलाच गंमत वाटली की उद्या कोणीतरी त्या भुयारात शोध घेतला तर प्लॅस्टिकची वॉटर बॉटल, बॅटरी, चाकू या वस्तू पाहून इतिहासच बदलेल की!

bhagya dile tu mala fame actress surabhi bhave will appear in the new series Tu Hi Re Maza Mitwa of Star Pravah
‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेत्री झळकणार ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत, प्रोमो शेअर करत म्हणाली, “कलाकार म्हणून कायमच…”
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Abhishek Bachchan
अभिषेक बच्चनचं ‘ते’ वाक्य अन् अमिताभ बच्चन म्हणाले, “तुला शोमध्ये बोलवून चूक केली”; नेमकं काय घडलं?
Aishwarya Rai reaction when was introduced as Aishwarya Rai Bachchan
“मी अभिषेक बच्चनशी…”, ‘ऐश्वर्या राय बच्चन’ अशी ओळख करून दिल्यावर अभिनेत्रीने केलेलं वक्तव्य
loksatta satire article sujay vikhe patil
उलटा चष्म: पातेले कलंडलेच..
Supriya Sule criticizes Mahayuti over Uddhav Thackeray bag checking case Pune news
उद्धव ठाकरे यांच्या बॅग चेक प्रकरणावर सुप्रिया सुळे यांच मोठ विधान…..
Pankaja Munde At Rally In Parali Beed.
“डोळ्यांसमोर कमळ येईल, पण तुम्ही घड्याळाचेच बटन दाबा…” धनंजय मुंडेंच्या समोरच काय म्हणाल्या पंकजा? पाहा व्हिडिओ

माझ्या स्वभावातील औत्सुक्य, कुतूहल या पायी मी इतकी झपाटून जाते की मला अमुक गोष्ट का जमणार नाही? मी ते का करायचं नाही? मी ते करून पाहाणारच या विचारापर्यंत माझी मजल जाते आणि जिद्दीने मी ती गोष्ट करतेच. नाटकाचंही तसंच झालं. १९७० मध्ये रंगभूमीवर आलेल्या ‘पद्मश्री धुंडीराज’ या नाटकात गाणाऱ्या अभिनेत्रीची गरज होती म्हणून मला विचारलं गेलं इतकंच! तोवर कधी चेहऱ्याला रंग लागला नव्हता. शाळेत असताना माणिकताईंच्या मुली म्हणून रोजची प्रार्थना, स्वागतगीतं किंवा राष्ट्रगीत गाण्यापुरतं निवडलं जायचं. तसं वसंतराव कुलकर्णीकडे तीन र्वष गाणं शिकले, पण गाणं शिकण्यासाठी अफाट कष्ट, मेहनत घ्यावी लागते. तेवढी माझी मानसिक तयारी नव्हती आणि तशी महत्त्वाकांक्षाही! ‘पद्मश्री धुंडीराज’साठी विचारलं गेलं पण नंतर असा सूर निघाला की वंदनाला हे जमेल का? झालं! पुन्हा तेच! अभिनय करून तर पाहू! आणि मला जमणार नाही म्हणजे काय? जमलंच पाहिजे!

अट्टहासाने मी त्यांना म्हटलं, ‘‘मी ऑडिशन देते तर खरी! पटलं तर ठेवा. नाहीतर काढून टाका.’’ मला स्क्रीप्ट दिलं गेलं. मी स्वत:ला बजावत राहिले. ‘‘मला हे जमलंच पाहिजे.’’ मी ऑडिशनला गेले. हॉल गच्च भरला होता. ‘गोवा हिंदू असोसिएशन’चे सर्व पदाधिकारी, जितेंद्र अभिषेकी, दत्ता भट, विजय केंकरे, मनोरमा वागळे, मंगला संझगिरी.. माझी पहिलीच एन्ट्री. शब्द होता, ‘‘हाय!’’ तेव्हा ‘‘हाय’’ एवढं प्रचलित नव्हतं. मी त्यांनाच प्रश्न केला, ही ‘‘हाय’’ नक्की कोणती? हाय खातो ती की हाय म्हणतो ती? सगळे हसले, मी वाचन केलं. माझ्या पहिल्याच वाक्यावर माझी निवड पक्की झाली. या माझ्या पहिल्याच नाटकाची तीन महिन्यांची तालीम हे माझ्यासाठी जणू अभिनयाचं वर्कशॉप होतं. नाटक समजून घेणं, आपल्या भूमिकेचा अभ्यास करून ती उभी करणं हा खरोखर अभ्यासाचा विषय होता. हे नाटक विनोदी! तेव्हा प्रथमच कळलं की विनोदी नाटक अधिक गंभीरपणे करावं लागतं. पण ते करताना मला अजिबात जड गेलं नाही. कारण मी जन्मत:च हसरी, खेळकर आहे! अहो जन्माला आले तेव्हासुद्धा रडलेच नाही. थापटय़ा मारून मला रडवावं लागलं, असं आई सांगायची. अजूनही माझा स्वभाव असाच आहे. रडणं, कुढणं माझ्या स्वभावातच नाही. ‘फरगिव्ह अँड फरगेट’ हाच माझा जगण्याचा मंत्र आहे. ‘पद्मश्री धुंडीराज’ मला करायला मिळणं ही माझ्या आयुष्यातली सर्वात आनंददायी गोष्ट आहे. कारण नाटकांतून लोक आनंद घेतात आणि आपण त्यांना तो आनंद मिळवून देतो. हे माझ्यासाठी खूप आनंददायी आहे!

प्रेक्षकांना आनंद मिळवून द्यायचाच या मानसिकतेतून मी प्रत्येक नाटकाचं आव्हान स्वीकारत गेले. ‘झुंज’ हे नाटक मी असंच मिळवलं. मी हे नाटक वाचलं आणि झपाटून गेले. रखमाची रांगडी भूमिका करायचीच असं मी पक्कं ठरवलं. तसं मी मोहनकाका (मोहन वाघ) यांना सांगितलंही. दलित-दलितेतर संबंधांवरील हे अप्रतिम नाटक! त्यातील रस्ते झाडणाऱ्या रखमा या बाईची प्रभावी भूमिका! चार-पाच नाटकांचा अनुभव गाठीशी असूनही या भूमिकेसाठी माझा विचार होईना. कारण एकतर ही भूमिका माझ्या वयापेक्षा दहा-बारा वर्षांनी मोठय़ा बाईची! तिचे लुक्स, देहबोली, भाषा तळागाळातल्या ‘गंवार’ बाईची! मी.. माझं व्यक्तिमत्त्व सुखवस्तू, संपन्न वर्गाचं प्रतिनिधित्व करणारं! तेव्हा मला ही भूमिका जमणारच नाही यावर सगळ्यांचं एकमत! शेवटी माझ्या हट्टाखातर मोहनकाकांनी दिग्दर्शक मधुकर तोरडमलांना तयार केलं. मला एक मोठ्ठा परिच्छेद वाचायला दिला. म्हणाले, ‘‘पाठ कर. भेटू आठवडय़ाने.’’ मी तयारी केली. मुलांना करून दाखवलं. तर त्यांची प्रतिक्रिया थंड! तरी मला खात्री होती मला हे काम जमेलच! ऑडिशन झाली आणि तात्काळ माझी निवड झाली.

रखमाच्या तोंडात अस्सल शिव्या होत्या. मी अगदी त्याच पद्धतीने नाटकात खच्चून शिव्या घातल्या. पहिल्याच प्रयोगावर माधव मनोहरांनी परीक्षणात लिहिलं, ‘रखमाच्या भूमिकेत वंदना गुप्ते भाव खाऊन गेली!’ त्यांनी शिरीषला फोन केला, ‘‘अरे वंदनाने नाटकात काय झक्कास शिव्या घातल्यात.’’ शिरीष मिस्कीलपणे म्हणाले, ‘‘मी घरी रोज अशाच शिव्या खातो ना! तिला सवय आहे!’’ आम्ही सगळेच खूप हसलो. विनोद सोडा! पण मी या नाटकावर खरच खूप मेहनत घेतली होती. रखमा काळीसावळी. तिचा मेकअप करायला मला एक तास लागायचा. नऊवारी मी प्रथमच नेसले. पण रंगमंचावर नऊवारीत सराईतपणे वावरावं यासाठी मी त्याचा सराव केला. मुख्य म्हणजे झाडूवाल्या बाईची देहबोली, भाषा, भाषेचा लहेजा, तिचे लुक्स प्रत्यक्षात कसे असतात ते जाणून घ्यायला मी मुद्दाम माटुंग्याच्या वस्तीत जाऊन राहिले. तिथल्या बायकांचं नीट निरीक्षण केलं. त्यांच्या लकबी, सवयी कशा असतात, त्या चुलीवरचं भांडं कसं उतरवतात, चहा कसा गाळतात, सुपारी कशी कातरतात, तंबाखू कसा चोळतात, पथारी कशी पसरतात, फतकल मारून कशा बसतात, नवऱ्याशी-मुलांशी कशा बोलतात हे सर्व निरीक्षण केलं आणि त्याचा वापर चपखलपणे रखमाच्या भूमिकेसाठी केला. प्रत्येक भूमिकेचा अभ्यास करावा, त्या भूमिकेचं आव्हान कसं पेलावं ते मी ‘झुंज’मधून शिकले. अर्थात त्यामुळे माझी ही भूमिका गाजली. संपूर्ण महाराष्ट्रात माझं नाव झालं. ‘रंगभूमीला चांगली अभिनेत्री मिळाली’ अशी समीक्षकांनी दाद दिली. अरुण टिकेकरांनी इंग्रजी वृत्तपत्रासाठी इंग्रजीत माझी पहिली मुलाखत घेतली. तेव्हापासून ‘हे करून बघू या. ते करून बघू या’ ही भूक लागली. मला हे जमणार नाही हे वाक्यच मी आयुष्यातून पुसून टाकलं.

खरं तर या टप्प्यापर्यंत येण्यापूर्वीच मी नाटक आयुष्यातून बाद केलं होतं. लग्नानंतरही काम करावं, नाव कमवावं अशी माझी अजिबात महत्त्वाकांक्षा नव्हती. त्यामुळे मी नाटकांत काम करणं बंद केलं होतं. थोडय़ाफार जिंगल्स, डबिंगची कामं करत होते आणि त्यात मी समाधानी होते. संसार छान चालला होता. शिरीष म्हणाले होते, ‘‘आपल्याकडे असं नाटकांत वगैरे कोणी काम करत नाही.’’ ते मलाही मान्य होतं. मी मजेत होते. एकदा ‘अखेरचा सवाल’मधील भूमिका करशील का विचारण्यासाठी मला भेटायला काही लोक आले. मी त्यांना म्हटलं, ‘‘मी लग्नानंतर नाटक सोडलंय!’’ त्यांनी मला खूप समजावलं. पण मी ठाम नकार दिला. ते लोक गेल्यावर माझे सासरे म्हणाले, ‘‘तू नाटक का घेतलं नाहीस? तू नाटकांत इतकं चांगलं काम करतेस, आम्हाला ते का बरं आवडणार नाही? लग्नानंतर माणिकबाईंनी कुठे गाणं सोडलं? मग तू नाटकांत काम करणं का बरं सोडतेस? होकार कळवून टाक त्यांना!’’ माझ्या सासऱ्यांच्या प्रोत्साहनामुळे मी पुनश्च नाटकांकडे वळले. त्यानंतर मात्र अगदी गरोदरपणात सातव्या महिन्यापर्यंत नाटकांतून सर्व प्रकारच्या भूमिका केल्या आणि तीन महिन्यांची मुलगी घरी ठेवूनही प्रयोग करायला लागले.

‘अखेरचा सवाल’ची एक आठवण सांगते. ‘आकाशवाणी’साठी त्या नाटकाचं रेकॉर्डिग चाललं होतं. समोर प्रेक्षक नाही. चेहऱ्याला रंग नाही. प्रॉपर्टी नाही. रंगमंचीय वातावरण नाही. तरीही केवळ आवाजाच्या माध्यमातून हे नाटक सादर करत होतो. रेकॉर्डिग संपलं. स्टुडिओतील रेकॉर्डिग करणारी संपूर्ण टीम, तंत्रज्ञ, माधुरी, मंदाकिनी पांडे (निर्मात्या) सगळे घळाघळा रडत होते. त्या दिवशी स्वरांची ताकद मला पहिल्यांदा जाणवली. सात स्वरांचा अचूक वापर करून प्रेक्षकांपर्यंत कसं पोहोचायचं हे स्वरांचं ज्ञान मला आईकडून मिळालं होतं. आईच्या सुरांनी मला संवादालाही लय असते, नाद असतो हे शिकवलं. संगीताची जाण असल्यानेच हा संवादाचा सूर मी नेमका पकडू शकते. लेखकाचे संवाद जड असले तरी त्यांना अजिबात धक्का न लावता प्रेक्षकांपर्यंत तो संवाद सोप्या पद्धतीने पोहोचवण्याचं भान मला असं हळूहळू येत गेलं. नाटकात काम करताना कलाकाराचा चेहरा, हावभाव, हे फक्त पहिल्या दहा रांगांमधल्या प्रेक्षकांना दिसतात. त्या पाठीमागच्या रांगेतल्या प्रेक्षकांपर्यंत कलाकार आवाज आणि देहबोलीच्या माध्यमातून पोहोचतो आणि गॅलरीतल्या प्रेक्षकांपर्यंत तो फक्त आवाज, संवादाची फेक याद्वारेच पोहोचतो. प्रत्येक नाटय़ कलाकारासाठी ही खरोखर तारेवरची कसरत असते. कारण आवाजाची पट्टी वाढवली तर समोरच्या प्रेक्षकांना अभिनय लाऊड वाटतो आणि कमी ठेवली तर मागच्या प्रेक्षकांपर्यंत कलाकाराचा अभिनय पोहोचत नाही. कलाकारासाठी अशा कितीतरी गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. उदाहरणार्थ, मला प्रॉपर्टी जागच्याजागी लागते. त्यासाठी प्रयोगापूर्वी मी रंगमंचावर एक फेरी मारते. सगळ्या वस्तू जागेवर आहेत का ते स्वत: तपासते. साडय़ा बदलण्यात मी अगदी तरबेज! २०-३० सेकंदांत मी संपूर्ण कपडय़ांचा सेट बदलू शकते. पण त्यासाठी प्रयोगापूर्वी त्या क्रमवार लावलेल्या आहेत का ते मी बघतेच! ‘चारचौघी’त २० मिनिटांचा एक मोठा सीन आहे. अशा इंटेन्स सीनच्या वेळी एकाग्रता आवश्यक असते. त्यासाठी थिएटरमध्ये पूर्ण शांतता हवी! मोबाइलचा आवाज, दरवाजातून प्रेक्षकांच्या ये-जा करण्यामुळे होणारा आवाज टाळण्यासाठी अगदी आमचे डोअरकीपरसुद्धा दक्ष राहातात, प्रेक्षकांचीसुद्धा वर्गवारी आहे. प्रत्येक थिएटरचा प्रेक्षकवर्ग वेगळा! प्रेक्षकशरण न होताही त्यांना नेमकं काय आवडेल, कुठला पॉज, कुठला विनोद अथवा कुठला सीन कशा पद्धतीने केल्यास समोरच्या प्रेक्षकांना आवडेल याचा अचूक अंदाज आल्याने त्यानुसार मी माझ्या अभिनयात रंग भरते. कोणत्याही नाटकाची संहिता हातात मिळाली की सर्वप्रथम मी ती माझ्या नवऱ्याला वाचायला देते. त्याची मतं अजमावते, त्यानंतर रात्री निजानीज झाली की दरवाजे बंद करून हॉलमध्ये बसायचं आणि मोठ्ठय़ाने वाचायला सुरुवात करायची अशी माझी पद्धत! असं करताना मला संहितेतल्या अनेक अवतरणांतील जागा सापडत जातात. त्या भूमिकेचे सूक्ष्म पदर अलगद उलगडतात. रात्री अडीच तीनपर्यंत हे काम चालतं. त्यानंतर माझी संहिता मी स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिते. मग ती मला लगेच पाठ होते.

कलाकाराने भूमिकेची कितीही तयारी केली तरी स्विच ऑन ऑफ करणं जमलंच पाहिजे. एका नाटकात सहकलाकार वहावतच जायचा (की तसं भासवायचा?) गळा दाबण्याच्या सीनमध्ये त्याच्या हातांचा दाब माझ्या गळ्यावर इतका पडायचा की मी गुदमरून जायचे. दंड इतके जोरात दाबायचा की त्याच्या बोटांचे वळ पडायचे. शेवटी मी त्यांना स्पष्ट सांगितलं, ‘‘तुम्ही अत्यंत वाईट कलाकार आहात! तुमच्या मुखवटय़ावर तुमची भूमिका असली तरी तुमच्या मेंदूत स्वत:चं भान हवंच ना!’’ शेवटी निर्मात्याकडे तक्रार केली तेव्हा त्यांच्या वागण्यात थोडी सुधारणा झाली. एक कलाकार दारू पिऊन तर्र्र होऊन प्रयोग करायचा. तो मला क्लूज् द्यायचा नाही. माझी फार पंचाईत व्हायची! शेवटी निर्मात्याला सांगितलं, ‘‘हा असा दारू पिऊन धुत होऊन प्रयोग करणार असेल तर मी याच्याबरोबर काम नाही करणार.’’ असं पावलापावलाला सावध राहावं लागतं. पुढे पुढे माणसांचा अंदाज येतो. कोणाशी कसं वागावं हे कळू लागतं.

मला नाटय़संसाराइतकाच स्वत:चा संसार सांभाळणं महत्त्वाचं वाटत होतं. घरच्यांना गृहीत धरून काम करणं मला साफ नामंजूर होतं. त्यामुळे मला अनेक तडजोडी कराव्या लागल्या. आयुष्यभर खूप खूप तारांबळ झाली माझी! कुटुंबीय, नातलग, सणसमारंभ हे सगळं सांभाळायचं त्याच वेळी नाटय़प्रयोग, दौरे हेही सांभाळायचं.. प्रत्येक जबाबदारी जिवापाड मेहनत घेऊन पार पाडायची अशी मला सवयच लागून गेली. नाटकांचे प्रयोग नेहमी सुट्टीच्या दिवशी! सुट्टीच्या दिवशी घरचे सगळे छान एकत्र असायचे. मजा करायचे. मी एकटी मात्र घराबाहेर! मुलांच्या परीक्षा, वाढदिवस, गॅदिरग, जवळच्या माणसांचे मृत्यू.. अशा वेळी आपण मनाने सतत त्यांच्या सोबत आहोत अशी आपल्या अस्तित्वाची त्यांना जाणीव द्यायची. मग त्यासाठी वेळेला २४ तास कसले ३६ तास कामात बुडून जायचं. विश्रांती नाही काही नाही. कितीही दमलं तरी ‘‘मी दमले’’ न म्हणता उसनं अवसान आणून सर्वाच्या उत्साहात सामील व्हायचं. नाटकांच्या तारखा सांभाळून घरच्या, नातलगांच्या कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावायची. इतकं सगळं करूनही आर्थिक गरज नसताना आपण वेळीअवेळी नाटकासाठी घराबाहेर पडतो, दौऱ्यांवर जातो, मुलांच्या वाढीच्या वयांत त्यांच्यापासून दूर राहातो या गोष्टीचा एवढा ‘गिल्ट फील’ मनात भरून असायचा की सतत आपल्या वागण्याचं परिमार्जन करण्याचा दुबळा प्रयत्न करत राहायचं!

एवढय़ा तडजोडी करून कलेतला आनंद मिळायचा नाही असं नाही. आपला आनंद प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय हा आनंदही असायचा. पण हे करताना किती आणि कशाकशाशी जुळवून घ्यायचं? पहिला प्रयोग असो की हजारावा प्रत्येक प्रयोग त्याच इंटेंसिटीने करायचा. तीच ऊर्जा तोच ताजेपणा – तीच उत्स्फूर्तता! प्रत्येक प्रयोगात टिकवायची. कारण नाटकाला आलेला प्रेक्षक ते नाटक प्रथम पाहात असतो ना! घरी आजारी असलेल्या आपल्या लेकरासाठी मन कितीही व्याकूळ असलं तरी विनोदी नाटकातला अभिनय इतका प्रभावी करायचा की प्रेक्षक खळखळून हसलेच पाहिजेत. एकावेळी प्रेक्षकांची, निर्मात्यांची, घरच्यांची..सगळ्यांची मनं सांभाळायची. एकदा ३१ डिसेंबरला शिवाजी मंदिरला माझ्या ३ जुन्या नाटकांचे पाठोपाठ प्रयोग होते आणि रात्री दीड वाजता नवीन नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग! गंमत म्हणजे मधल्यावेळेत मी माझ्या कुटुंबाबरोबर ३१ डिसेंबरची रात्रही सेलिब्रेट करून आले. माझ्या या नाटय़प्रेमापायी कुटुंबीयांनाही खूप तडजोड करावी लागलीय. एकदा सुट्टीत आम्ही चौघांनी अमेरिकेला फिरायला जायचा बेत केला. सगळी तयारी झाली आणि ‘सोनचाफा’ घेऊन निर्माते माझ्याकडे आले. ते म्हणाले, ‘‘हे बघ. मला थांबायला वेळ नाही. मी लगेच तालमी सुरू करतोय!’’ मी घुटमळले, पण शिरीष चटकन म्हणाले, ‘‘ठीक आहे वंदना. आपण अमेरिकेला पुढच्या वर्षी जाऊ. तू ही संधी सोडू नको.’’ सगळ्यांचा हिरमोड झाला, पण ‘सोनचाफा’मधली ‘अगं’ची भूमिका माझ्या करिअरमधला ‘टर्निग पॉइंट’ ठरली. व्हाइस चॅन्सलर टोपेसाहेबांनी तर एका कार्यक्रमात मला ‘अगंऽऽऽ’अशी हाक मारली आणि माझ्या भूमिकेचं खूप कौतुक केलं.

वि. वा. शिरवाडकरांनी कौतुकाने नाशिकमधल्या छान हॉटेलांत नेऊन मला आवडणारे पदार्थ पोटभर खिलवले. नाशिकच्या दौऱ्यातला ‘सोनचाफा’चा नाटय़प्रयोग आणि माझी ‘अगं’ची भूमिका त्यांना फार आवडली होती.

नाटय़ व्यवसाय आणि दौरे हे तर घट्ट समीकरण! मी या क्षेत्रात नवीन असताना दौऱ्यावर निघालं की बसमध्ये चांगल्या जागा वरिष्ठ कलाकारांना आणि आम्ही नवखे कलाकार मात्र दोन सिटच्या मध्ये बिछाने टाकून झोपत असू. लॉजमधल्या खोल्या तर फारच घाणेरडय़ा असत, रूम्स शेअर तर कराव्या लागतच. पण रात्रभरच्या प्रवासानंतर आंबलेलं, शिणलेलं अंग बिछान्यावर टाकावं तर चादरी, बिछाने अस्वच्छ, बाथरूम्स कळकट. तक्रार केली तर म्हणत, ‘‘अहो डॉ. लागूसुद्धा गेल्या आठवडय़ात इथेच राहून गेलेत! राहा तुम्हीसुद्धा!’’ एकदा एका दौऱ्यातली खोली एवढी अस्वच्छ होती. संडास कॉमन, खोलीत शेवाळलेली मोरी, घाणेरडय़ा चादरी. मला तर रडू कोसळलं. घरी तारांकित आयुष्य जगणारी मी! हे मी काय भोगतेय? एरव्ही मी कधीही कोणते नखरे नाही केले. पण त्या दिवशी मात्र मी एकटी दुसऱ्या चांगल्या हॉटेलमध्ये जाऊन राहिले. एका दौऱ्यात मी साडेतीन महिन्यांच्या तान्ह्य़ा लेकीला सोडून आले होते. घरचे सगळे तिला फुलासारखी जपत होते. ती मजेत होती. मी मात्र प्रत्येक प्रयोगानंतर तिचा आवाज टेप करून आणला होता, तो ऐकत बसायची. प्रत्येक नाटकाचा चौथा अंक रडारडीचाच असायचा. विजया मेहता, दया डोंगरे आम्ही सगळ्याच जणी मुलांच्या आठवणीने व्याकूळ होऊन जायचो. पण म्हणतात ना ‘शो मस्ट गो ऑन!’

शेक्सपिअरच्या या वचनाचा किती वेळा अनुभव घ्यावा मी? एकदा ‘गगनभेदी’चा विदर्भात दौरा होता. दौऱ्यावर निघतानाच मला तापाची कणकण होती. तसेच दोन-तीन प्रयोग केले आणि अमरावतीच्या प्रयोगाला मला उभंच राहता येईना. शेवटचा सीन केला आणि मी कोसळले. प्रेक्षकांमधून डॉक्टरांना बोलावण्यात आलं. मला १०५ डिग्री ताप होता. दौरा अर्धवट सोडून आम्ही निघालो तेव्हा सहकलाकारांपैकी दोघे तिघे म्हणाले, ‘‘औषध घ्यायचं, पण वंदनाने दौरा पूर्ण करायला हवा होता.’’ मला खूप चीड आली. कलाकार इतके संवेदनशून्य कसे? आज जाणवतं, त्यांची ती रोजीरोटी होती! पण असे माझ्यामुळे शो कॅन्सल होण्याचे प्रकार फक्त दोनदा घडले. एकदा मला गालगुंड झाले होते, चेहरा सुजला होता आणि एकदा माझा साफ आवाज बसला आणि प्रयोग रद्द करावा लागला.

हां. मात्र इंदूरमधल्या ‘स्वानंद न्यास’ नावाच्या संस्थेने ‘चारचौघी’चा प्रयोग लावला त्याचा किस्सा भन्नाट आहे! त्या प्रयोगासाठी बस आदल्या रात्री रवाना झाली. मी आणि दीपा सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांच्या फ्लाईटने इंदूरला जाणार होतो. गजर लावून मी झोपले आणि गजर झालाच नाही. सकाळी जाग आली तेव्हा घडाळ्यात सहा वाजले हाते. मी चक्क घडय़ाळ फेकलं. मुलीला उठवलं आणि गाडीने सुसाट वेगाने एअरपोर्टला पोहोचले तेव्हा माझ्यासमोर विमान आकाशात उडालं होतं. शेवटी अथक प्रयत्नांती दिल्लीचं तिकीट मिळालं.  मग दिल्ली तिथून भोपाळ इंदूर अशी फ्लाईट मिळाली. तोवर आयोजकांना फोन करून चारच्या ऐवजी सातचा प्रयोग लावायला सांगितला. साडेसातला थिएटरवर पोहोचले. दिवसभराचा ताण, धावपळ, उपासमार! तरीही प्रयोगाला उभी राहण्यापूर्वी प्रेक्षकांची माफी मागितली आणि म्हटलं, पुन्हा आयुष्यात अशी चूक होणार नाही. दुसऱ्या दिवशी पेपरात टीकेऐवजी कौतुकच छापून आलं की एवढी धावपळ करून कोणीही प्रयोगासाठी असं पोहोचलं नसतं!

‘शो मस्ट गो ऑन’चा एक विदारक अनुभवही आहे. भारती (आचरेकर) माझी बहीण. तिचे पती विजय आचरेकरांचं अकस्मात निधन झालं. मी त्यावेळी तिथेच हॉस्पिटलमध्ये होते. माझे त्या दिवशी दोन प्रयोग होते. ऐनवेळी नाटक रद्द करणं शक्य नव्हतं. दुपारचं नाटक ‘गगनभेदी.’ ती ट्रॅजेडी होती. पण रात्रीचं नाटक ‘प्रेमाच्या गावा जावे!’ दोन नाटकांत अवघं दीड तासाचं अंतर! तेवढय़ा वेळात अंत्यविधी आटपून मी थिएटरवर परतले. त्या कॉमेडी नाटकात मी हसत होते. विनोद करत होते. पण आतून मला गदगदून रडू फुटत होतं. त्यावेळी माझ्या घरच्यांनी मला समजून घेतलं हे विशेष!

या संपूर्ण नाटय़प्रवासात थोरामोठय़ांकडून मी खूप शिकले. भीमसेन जोशींना ‘माणिकरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यासाठी आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा हा वयोवृद्ध तपस्वी आपल्या शिष्यांकडून नवीन बंदीश शिकून घेत होता. कलाकार कधीच पूर्णत्वाकडे जात नाही. त्याच्या मनात शिकण्याची आस आहे तोवर पूर्णत्वाची प्रक्रिया चालू राहते. कलाकाराने टीका सकारात्मक घ्यावी. मी तशी घेते. कारण त्यातूनच त्या भूमिकेत आणखी काय काय करता येईल याचा आपण शोध घेऊ शकतो. प्रत्येक नाटक हे टीमवर्क आहे. जो नट आपल्यामुळे नाटक चालतंय अशी स्टारगिरी करेल तो अकाली संपेल! सेलिब्रिटी म्हणून मिरवण्यापेक्षा कलेला प्राधान्य दिलं तर नाटकही मोठं होतं आणि कलाकारही!  एकदा एक तरुण मुलगी हुबेहुब माझी नक्कल करू लागली. माझ्या दाद घ्यायच्या जागा ती घेऊ लागली. तिला प्रेमाने खूप समजवलं. पण तिने नाही ऐकलं. अशा पाकिटापुरत्या काम करणाऱ्या, स्वत:ला स्टार समजणाऱ्या कलाकारांबरोबर काम करण्यापेक्षा नाटक न करणं मी पसंत करते. मालिकांमध्येही मी रमत नाही. म्हणून कुतूहलापोटी मी चित्रपटनिर्मितीच्या क्षेत्रात उतरले. ‘फॅमिली कट्टा’  हा उत्तम निर्मितीमूल्य असलेला चित्रपट केला, पण डिस्ट्रिब्युटर थिएटरवर मराठी चित्रपट टिकू देत नाहीत. कॉपरेरेट चॅनेल्समुळेही छोटे निर्माते मरतात आणि सर्वात क्लेशदायक गोष्ट म्हणजे प्रेक्षक मराठी मातीतल्या चित्रपटांकडे पाठ फिरवतात.

खरं तर या मायबाप प्रेक्षकांमुळे वंदना गुप्ते एक कलाकार म्हणून घडली आहे. मी अनेक भूमिका केल्या. त्या व्यक्तिरेखा साकारताना, त्या भूमिकांमध्ये खोलवर उतरताना, त्यातले गहिरे रंग शोधताना प्रत्येक वेळी मी मलाच नव्याने सापडत गेले. त्या व्यक्तिरेखांनी मला घडवलं. प्रत्येक भूमिकेसाठी संहिता अभ्यासताना लेखकांनी त्यात मांडलेल्या विचारांचं माझ्या मनात रोपण झालं. त्यामुळे माझं व्यक्तिमत्त्व खूप संपन्न झालं. या संपन्न व्यक्तिमत्त्वातून जे नवीन आविष्कार साकार होतील त्याला आजवर दिला तसाच प्रतिसाद मायबाप प्रेक्षक पुढेही देत राहतील याचा मला विश्वास वाटतो!

वंदना गुप्ते – अभिनेत्री

शब्दांकन : माधुरी ताम्हणे – madhuri.m.tamhane@gmail.com