डॉक्टर होऊन आनंदवनात आलो खरा, पण माणसांशी नाळ जुळत नव्हती. मग एके दिवशी ‘पांढरा कोट’ काढून टाकला आणि ‘डाक्टर सायबा’चा ‘भाऊ’ कधी झालो कळलं नाही. आनंदवनात कुष्ठरुग्णांबरोबर अंध-अपंग, वृद्धांची संख्या वाढत होती. माझे वेगवेगळे प्रयोग सुरू झाले. आनंदवनच्या विद्यापीठात अनेक एकलव्य तयार झाले, पण या एकलव्यांचा केवळ अंगठाच नाही तर सगळीच बोटं कलम करून टाकली होती नियतीने, पण त्या बोटं नसलेल्या हातांनी खूप मोठी करामत करून दाखवली. आज शेती,  डेअरी, हातमाग, यंत्रमाग, छापखाना, हस्तकला आदी  ४० उद्योगांमधून हजारो वस्तूंची निर्मिती होत असते, पण या सगळ्यात माझ्यातल्या वादळाला आपल्या परिवाराला कधीच वेळ देता आला नाही. पण आता मात्र मी ती सगळी कसर नातवंडांमध्ये भरून काढतो. भारती म्हणते की, आजोबा झाल्यावर तू बदललास. खरं आहे, माझ्यासारख्या एकलकोंडय़ा, कार्यमग्न व्यवस्थापकाचा नातवंडांनी एक साधासुधा आजोबा करून मला ‘माणसात’ आणलं. आता या तिघांबरोबर मी माझं आणि माझ्या मुलांचंदेखील बालपण जगून घेतो आहे..

मी काही लेखक नाही. आज या लेखाच्या निमित्ताने खूप र्वष मागचा प्रवास करून आलो. किती किस्से, घटना, अनुभव जमा झाले गाठीशी; गणनाच नाही.. कसं लिहिणार इतकं सगळं? ‘आनंदवन म्हणजे कुष्ठकार्य’ एवढीच ओळख जनमानसात रुजलेली होती; पण प्रत्यक्षात त्यापलीकडे अंध-अपंग-कर्णबधिर-बेरोजगार-अल्पभूधारक शेतकरी-अन्यायग्रस्त आदिवासी अशा समाजातील उपेक्षित घटकांना न्याय्य, निरोगी आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्याची संधी देणारं शाश्वत मॉडेल ‘आनंदवना’ने घडवलं आणि तेसुद्धा समाजाने नाकारलेल्या याच साध्यासुध्या माणसांच्या कष्टातून! या साऱ्या प्रवासाची गोष्ट ‘आनंदवन प्रयोगवन’ पुस्तकातून प्रथमच समाजापुढे मांडली गेली.

स्वत:बद्दल काही बोलावं-लिहावं असं मला कधीच वाटलं नाही. कारण मी कधीच स्वत:ला आनंदवनापासून, तिथल्या कामापासून आणि माणसांपासून वेगळं ठेवून पाहिलेलं नाही आणि कधी पाहू शकणारही नाही. खरं तर हे काम बाबांचं

(बाबा आमटे), त्यांना भक्कम साथ देणाऱ्या ताईचं (साधना आमटे) आणि या दोघांना येऊन मिळालेल्या शेकडो-हजारो कार्यकर्त्यांचं. मीसुद्धा त्यातलाच एक. अशी कामं कुणा एकटय़ा-दुकटय़ा व्यक्तीच्या बळावर उभी राहू शकत नाहीत. त्यामुळे मी जे काही लिहितो आहे त्यामध्ये काही कामं, काही माणसं तुम्हाला भेटतील; पण बाकी काम बघायला आणि शिलेदारांना भेटायला तुम्हाला आनंदवनात यावं लागेल.

माझा जन्म १९४७ मध्ये वरोरा गावाच्या सूतिकागृहात झाला. म्हणजे ‘आनंदवन’ सुरू होण्यापूर्वीचा काळ. माझ्या जन्मानंतर २ वर्षांनी आनंदवनाची नीव रचली गेली. ताई म्हणजे माझी आई सांगायची की, तो काळ फार खडतर होता. दारिद्रय़, अस्थिरता आणि संकटांनी भरलेला काळ. जसजसं मोठं होत होतो तसतसं या वास्तवाला सामोरे जात होतो. प्रकाशचा जन्म १९४८ चा. सलग दोन बाळंतपणे आणि पुरेशा पोषण आहाराचा अभाव यामुळे ताईला क्षयरोगानं ग्रासलं. मग मी बाबांजवळ आणि प्रकाश ‘उरळीकांचन’च्या निसर्गोपचार केंद्रात ताईजवळ, असं जवळपास आठ-नऊ  महिने चाललं. ताई-बाबांनी एकमेकांना लिहिलेल्या पत्रांमधून हे समजतं. कुष्ठरोगाचं नुकतंच जोर धरू लागलेलं प्रचंड काम करत असताना बाबांनी माझ्यासारख्या खोडकर मुलाचा सांभाळ एकटय़ाने केला..

पुढे यंत्र आणि तंत्रज्ञान माझी आवड बनत गेली. मी नवव्या वर्षीच गाडी चालवायला शिकलो आणि त्यात तरबेजही झालो. मग हळूहळू वाहनदुरुस्तीचे (रिकामे) उद्योग सुरू केले. मी एनसीसीमध्ये होतो तेव्हा मला सकाळी लवकर उठून परेडसाठी जावं लागायचं. जंगलाचा रस्ता होता, पण जवळ सायकल घ्यायला पैसे नव्हते. मग काय, भंगारातून सायकलचे वेगवेगळे पार्ट्स जमा केले आणि आमचा ‘चीफ मेकॅनिकल इंजिनीअर’ गिरीधरच्या मदतीने एक सायकल तयार केली. पुढे अनेक र्वष मी तीच सायकल वापरली. पुढे माझी ही आवड माझ्या मुलाने- कौस्तुभने अगदी तशीच्या तशी उचलली. फरक एवढाच की त्याने मार खाल्ला नाही!

ताई-बाबा आम्हाला दिवस-रात्र कामाला जुंपलेले दिसायचे. बाबांनी कधी जांभई दिल्याचं माझ्याच काय, कुणाच्याच स्मरणात नाही. आमचं संपूर्ण बालपण असंच कष्टकरी माणसं पाहण्यात गेलं. आनंदवनातल्या कुष्ठरोगी बांधवांसोबत जमतील तेवढी कामं करत आणि शाळा सांभाळत आम्ही दोघं भाऊ  वाढलो. मोठे झालो आणि पोरांची काळजी घेणारे इतर आई-वडील पाहू लागलो तेव्हा कळलं की आपलं बालपण वेगळं होतं. पण लहान असताना मात्र त्यात वेगळं असं काही वाटायचं नाही, कारण तेव्हा बाकीचं जग आम्ही पाहिलेलंच नव्हतं. आमच्या दृष्टीने ‘आनंदवन’ हेच आमचं जग होतं आणि ताई-बाबा अन् आनंदवनातले कुष्ठरुग्ण हेच आमचं कुटुंब. कुणाला आश्चर्य वाटेल, पण आम्ही पुढे शाळेत जाऊ  लागल्यावरही आमचं जग मर्यादितच राहिलं. कारण कुष्ठरुग्णांच्या वसाहतीत राहणाऱ्यांना आपलंसं करणार कोण? आम्ही अगदी जंगलातल्या प्राण्यांसारखे होतो, रानटी. आम्ही कधी दुकानं पाहिली नव्हती. त्यामुळे बाहेर पडल्यावर प्रत्येक गोष्ट हवीशी वाटायची. एकदा ‘तपोवन’चे सर्वेसर्वा  डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांच्या अमरावतीच्या घरी बाबा आम्हाला घेऊन गेले. त्यांच्या घरातील खाऊने भरलेले डबे पाहिले आणि ‘हे विश्वची माझे घर’ या तत्त्वाचे पालन करणाऱ्या आम्ही दोघा भावांनी फडताळावर चढून सगळे डबे साफ करून टाकले. बाबांना फार शरमल्यासारखं झालं.

या निमित्ताने अजून एक किस्सा आठवला. १९५८ मध्ये वादळात आमच्या मातीच्या झोपडीवजा घराची पडझड झाल्यामुळे काही सुहृदांनी ‘आमटे फॅमिली हॉलिडे फंड’ तयार केला आणि घर दुरुस्तहोईपर्यंत ताई-बाबांसकट आम्हाला हिमालय दर्शनासाठी पाठवले गेले. हृषीकेशला गंगेच्या किनारी भरपूर भटकलो. आजूबाजूला अनेक गोष्टी खुणावत होत्या, आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी हट्ट करत होतो. दिसेल ती प्रत्येक गोष्ट मला खायची असायची. एका ठिकाणी एक माणूस गरम गरम जिलबी तळत होता. मी जिलबीसाठी हटून बसलो. ताई-बाबांना इतका राग आला की त्यांनी मला तिथे बसवलं आणि रागावून म्हणाले, ‘‘खा मेल्या, जेवढी खायची तेवढी खा.’’ मी जवळपास सव्वा किलो जिलबी खाल्ली आणि पचवलीसुद्धा! मात्र त्यानंतर जिलबीवरची वासना उडाली ती कायमचीच! तिथून पुढे आम्हाला देहरादूनचे ‘डून स्कूल’ दाखवण्यासाठी नेलं गेलं. गेटच्या बाहेर उभं राहून आम्ही ती शाळा पाहत होतो, तेव्हा ती शाळा दाखवणाऱ्या अधिकारी स्त्रीने आम्हा दोघा भावांना सांगितलं की आता तुम्हाला याच शाळेत शिकायचं आहे! भारतातील सगळ्या प्रथितयश लोकांची मुलं ज्या शाळेत शिकतात तिथे आपल्या मुलांना शिक्षण घेता येईल या कल्पनेने क्षणभर बाबा भारावून गेले; पण लगेचच सावरलेसुद्धा आणि त्यांनी स्पष्ट नकार दिला. म्हणाले, ‘‘माझी मुलं सर्वसामान्य मुलांसारखीच शिकतील आणि वाढतील.’’ पुढे एकदा ‘टाटा ट्रस्ट’चे चेअरमन डॉ. रुसी लाला यांच्यासोबत माझी आनंदवनातील भावी योजनांसंदर्भात बैठक होती; तेव्हा त्यांनी मला प्रश्न विचारला की ‘‘तुम्ही दोघं भाऊ इथे राहून काम का करता?’’ तेव्हा मी त्यांना उत्तर दिलं की, ‘‘आमच्या वडिलांनी आम्हाला सर्वसामान्य शाळेत टाकलं म्हणून आज आम्ही इथे काम करतो; कारण आमची समाजाशी जोडली गेलेली नाळ कधीच तुटली नाही.’’

आनंदवनात येणाऱ्या कुष्ठरुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याने हक्काचा डॉक्टर असणं गरजेचं होतं. ही गरज आमच्या असण्यात इतकी भिनली होती की प्रकाश आणि मी मॅट्रिक झालो तेव्हा डॉक्टरकीसाठी प्रवेश घ्यायचा हे जणू ठरलेलंच होतं. खरं तर मला डॉक्टर बनण्यापेक्षा इंजिनीयर बनणं जास्त आवडलं असतं. पण आनंदवनातली परिस्थिती अशी होती की डॉक्टरकीपेक्षा वेगळा विचार करणं शक्य नव्हतं. त्यामुळे माझं इंजिनीयिरगचं वेड मी बाजूला ठेवलं आणि डॉक्टरकी स्वीकारली. प्रत्यक्ष बोलून दाखवलं नसलं, तरी बाबांच्याही मनात आम्ही दोघांनी डॉक्टर झालं पाहिजे, अशी अपेक्षा होतीच. १९६६ मध्ये मी आणि प्रकाश वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी नागपूरच्या गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झालो. मी विचार केला, डॉक्टर झाल्यावरही इंजिनीयिरगचं डोकं चालवायला आपण मोकळे असूच. दुसरं म्हणजे मला शेती, आर्किटेक्चर, पर्यावरण अशा अनेक बाबींमध्ये रस होता. त्या सगळ्याचंच औपचारिक शिक्षण घेणं शक्य नव्हतं. उलट, त्यापैकी कोणत्याही क्षेत्रातले प्रयोग करायला आनंदवनाचं संपूर्ण आकाश मला मोकळं होतं.

पुस्तकांचा खर्च वाचावा म्हणून आम्ही भाऊ  एका इयत्तेतच शिकलो. मेडिकलला गेल्यावर आम्हाला पहिली फुलपॅन्ट, पहिला जोडा, पहिली सायकल आणि पहिलं घडय़ाळ मिळालं. तोपर्यंत आम्ही हाफ पॅन्ट घालून कॉलेजला जात असू. आम्ही नागपूरला रामकृष्ण मिशनच्या विवेकानंद हॉस्टेलला राहायचो. जवळ पैसे नसायचे. वेगवेगळ्या गोष्टी खाव्याशा वाटायच्या. मग एकदा खानावळीत खाडे करून जे पैसे वाचले त्यामधून आम्ही डोसा खायला गेलो. पण हे नेमकं कोणीतरी पाहिलं आणि बाबांना सांगितलं, त्यांना खूप दु:ख झालं. सांगायचं एवढंच की आनंदवनाबाहेरील जगाशी कधीच संबंध न आलेले आम्ही त्या जगाचा भाग बनून, टक्केटोणपे खात खात डॉक्टर बनलो.

डॉक्टर बनून आनंदवनात परत आलो आणि पांढरा कोट घालून रुग्ण तपासायला सुरुवात केली. अनेक दिवस हे चालू होतं, रुग्ण येत होते, मी तपासून गोळ्या देत होतो आणि ते निघून जात होते. मात्र एक अंतर कायम होतं. मला हे अंतर अस्वस्थ करू लागलं. एक गोष्ट सतत जाणवत होती की, नुसतं कुष्ठरोगावर उपचार करून भागणार नाही तर माणसांच्या उद्ध्वस्त मनावर उपचार होणं जास्त गरजेचं आहे. कुष्ठरोग झाल्यामुळे समाजाने आणि कुटुंबाने दूर लोटलेल्या एका तळागाळातल्या व्यक्तीच्या मनावरचे आघात खूप प्रचंड आणि खोल असतात. तेव्हा जाणवलं, नुसतं औषधी गोळ्या खाण्यापेक्षा आरोग्याबाबत दृष्टिकोन होलिस्टिक हवा. त्या दिवशी पांढरा कोट काढून टाकला. ‘डाक्टर सायबा’चा ‘भाऊ’ कधी झालो माझं मलाच कळलं नाही. सकस आहार, सुसज्ज आवास, पाणी आणि संडास या गोष्टी आरोग्याइतक्याच महत्त्वाच्या मानल्या. दोन तत्त्व प्रमाण मानून कामाला लागलो, ‘नॉट फॉर द पीपल, बट विथ द पीपल’ आणि ‘आय एम इन द ऑफिस बट नॉट बॉस.’

पाण्याची चणचण आनंदवनाच्या पाचवीला पुजलेली होती. आम्ही लहानपणापासून ती अनुभवत आलो होतो. जसजसा विचार करण्याच्या वयात आलो, तसं ‘पाणी नसेल तर पुढे काय?’ या प्रश्नाने मला घेरायला सुरुवात केली. मी डॉक्टर बनून आनंदवनात आलो तेव्हा बाबा सोमनाथला असायचे. शिवाय हेमलकशाचा नवा ‘लोकबिरादरी प्रकल्प’ मार्गी लावण्यासाठी त्यांचं तिकडे जाणं-येणं सुरू असायचं. त्यामुळे आनंदवनात मी स्वतंत्रपणे काम करू लागलो होतो. त्या वेळी पहिल्यांदाच मी आनंदवनाचं भविष्य माझ्या नजरेने पाहत होतो. त्यामुळे भविष्यातल्या समस्याही समोर दिसू लागल्या होत्या. आनंदवनातली माणसं वाढत होती. आनंदवनात कुष्ठरुग्णांबरोबर अंध-अपंग आणि घरातून बाहेर काढलेली वृद्ध माणसं या सगळ्यांची संख्या वाढत होती. त्यामुळे पिण्याच्या आणि वापराच्या पाण्याची गरज वाढती होती. शिवाय खर्चही वाढत चालला होता.

आनंदवनाला पाणी आणि जीवनावश्यक गोष्टी या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचं स्वप्न उराशी बाळगून मी आजवरच्या प्रवासात विविध प्रयोग करत गेलो आणि ते यशस्वीही झाले. पण या सगळ्यासाठी मी प्रचंड विरोधाचा सामना केलेला आहे. बाबांचं काम बघतच आम्ही मोठे झालो होतो. त्यांच्या प्रत्येक कामामध्ये आमचा सहभाग असायचा. त्यामुळे बाबांनी पाण्यासाठी आजवर केलेले प्रयत्न माहिती होते. त्याबद्दल त्यांची मतं काय आहेत तेही माहिती होतं. त्यांनी त्यांचे मार्ग अजमावून झाले होते. पण आता त्यापुढे जाण्याची गरज आहे असं मला वाटत होतं. ‘आनंदवन’ पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचा मी चंगच बांधला होता. आधी श्रमशक्तीच्या जोरावर आणि नंतर विविध यंत्रांच्या साहाय्याने हळूहळू स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरू होती. पण मी अजूनही या बाबतीत असमाधानी होतो, अस्वस्थ होतो कारण त्या वेळी आनंदवनात कोणतंही मोठं मशीन नव्हतं. मी आधी नमूद केलेला ‘टाटा ट्रस्ट’मधल्या डॉ.रुसी लाला यांच्यासोबतच्या माझ्या बैठकीच्या वेळी आणखी एक गोष्ट घडली. वर्ष होतं १९९०. त्या वेळी ‘टेल्को’ने जपानच्या ‘हिताची’ कंपनीसोबत नवा एक्सकॅव्हेटर लाँच केला होता. लालांनी आनंदवनाबद्दलची सगळी माहिती ऐकून घेतली आणि ते मला म्हणाले, ‘‘पोरा, तुला काय हवंय सांग.’’ मी म्हटलं, ‘‘मला तुमचा नवीन एक्सकॅव्हेटर हवा आहे.’’ ही मागणी ऐकून लाला गारच झाले. आनंदवनाला एक्सकॅव्हेटर कशाला पाहिजे याचा त्यांना उलगडा होईना. मी म्हटलं, ‘‘हा एक्सकॅव्हेटर स्वयंपाक सोडून सगळं काही करू शकतो!’’ मग मी त्यांना ‘आनंदवन’ म्हणजे एक नांदतं गाव आहे, तिथे शेती आहे, पाण्याचे प्रश्न आहेत, वगैरे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. माणूस भला होता. त्यांनी नियम वाकवून आम्हाला टाटा-हिताचीचा एक छोटा एक्सकॅव्हेटर दिला. काय आनंद झाला तेव्हा आम्हाला! हे मशीन आनंदवनात येणं हा एक मैलाचा दगड ठरला. तेव्हापासून चित्र बदलायला सुरुवात झाली. त्यापूर्वी आनंदवनात सहा-सात तलाव होते. ते आम्ही एकेक करून खोल करत गेलो. नवे तलाव खणले. ही आनंदवनातील जलक्रांतीची सुरुवात होती. नंतर पाण्याची कामं वेगाने होऊ  लागली आणि अजूनही सुरूच आहेत. आज आनंदवनात पडणाऱ्या पावसाच्या पाण्यापैकी ९० टक्के टक्के पाणी अडवण्यात आम्हाला यश आलं आहे.

मी डॉक्टर होऊन परत आलो तेव्हा विचार आला की, ‘ळँी१ी ्र२ ल्ल३ँ्रल्लॠ ुीं४३्रऋ४’ ्रल्ल छीस्र्१२८’ मग बाहेरच्या समाजाने आनंदवनात का यावं? आनंदवनाला आणि बाहेरच्या जगाला जोडू शकेल असा धागा निर्माण करण्याची अतिशय आवश्यकता होती. ओबडधोबड स्वरूपातील आनंदवनाला एक सुंदर रूप देण्याची गरज होती. मग माझी इंजिनीअिरग आणि आर्किटेक्चरची आवड डोकं वर काढू लागली. आम्ही टाकाऊ  वस्तूंमधून सुंदर ग्रीटिंग कार्डस् बनवू लागलो, आनंदवनात सुंदर बगीचे निर्माण करायला सुरुवात केली. मी माझे हे छंद स्वत:पुरते सीमित न ठेवता आमच्या माणसांना त्याचा भाग बनवलं. तसंच माझा अजून एक छंद आहे ‘कॅलिग्राफी’. दिवसभराची कामं झाल्यानंतर मी मध्यरात्रीपर्यंत पत्र लिखाणाचं काम करायचो. सगळ्यांना पत्र आणि त्यासोबत एक सुंदर ग्रीटिंग कार्ड पाठवायला सुरुवात केली. प्रत्येक पत्रात वेगवेगळ्या हस्ताक्षरांत आनंदवनात घडणाऱ्या गोष्टी हितचिंतकांपर्यंत पोचवायचो. या प्रकारे शेकडो-हजारो मनं आनंदवनाच्या कार्याशी घट्ट जोडली गेली आणि त्या निमित्ताने आनंदवनात बनलेली ग्रीटिंग कार्ड्सदेखील पोचली आणि एका नव्या उद्योगाची दणक्यात सुरुवात झाली. आज आनंदवनात वर्षांकाठी जवळपास एक लक्ष हॅण्डमेड ग्रीटिंग कार्ड्सची विक्री होते! एक दिवस मला एक गमतीशीर अनुभव आला. एका सद्गृहस्थांनी माझ्या हस्ताक्षरातलं पत्र पाहून मला खडसावून सांगितलं की आम्हाला अशी छापील पत्रं नकोत. त्यांना हे पत्र छापील नसून माझ्या हस्ताक्षरातलं आहे हे पटवून देता देता नाकीनऊ  आले! पाषाणशिल्पं आणि काष्ठशिल्पं हे सुद्धा माझे आवडते छंद आहेत. आजही आनंदवनात या वस्तूंचा मोठा संग्रह आहे. माझी नजर सतत अशा वस्तूंच्या शोधात असते.

आनंदवनातील बांधवांच्या गरजा आणि क्षमता ओळखून, पारखून आणि त्याप्रमाणे कामाची आखणी करून, मी एक एक योजना अमलात आणू लागलो. तेव्हा, एक गोष्ट माझ्या लक्षात आली की ही सर्व माणसं म्हणजे पैलू न पाडलेले हिरे आहेत; मी फक्त पैलू पाडण्याचं काम करत होतो. आज आनंदवनात शेती आणि डेअरीसोबत, मेटल फॅब्रिकेशन, हातमाग, यंत्रमाग, छापखाना, हस्तकला, चर्मकला, इलेक्ट्रिकल फिटिंग, प्लंबिंग, वाहनदुरुस्ती या आणि अशा सुमारे ४० उद्योग-व्यवसायांमधून हजारो वस्तू आणि सेवांची निर्मिती होत असते.

आता येतो माझ्या लग्नाकडे.. प्रकाशने मेडिकलला असतानाच स्वत:साठी जोडीदार निवडली; पण मला काही ते ‘साधलं’ नाही आणि नंतर काही केल्या माझं लग्न जमेना. तेव्हा मला दोनशे पन्नास रुपये मानधन मिळत असे. एवढय़ा पैशांत संसार चालवणारी आणि कुष्ठरुग्णांच्या सहवासात आपले आयुष्य घालवू इच्छिणारी मुलगी मिळणे अवघड. पण १९७६ मध्ये माझं लग्न झालं आणि औरंगाबादची डॉ. भारती आनंदवनात दाखल झाली. भारतीने हॉस्पिटलची जबाबदारी तर सांभाळलीच, पण त्यापलीकडेही ती आनंदवनातल्या सर्व कार्यकर्त्यांची काळजी वाहणारी ‘वहिनी’ झाली. बाबांच्या कामात ताईची जी भूमिका होती ती पुढे भारतीने समर्थपणे निभावली. ताईने कुष्ठरुग्णांना ‘राइट टू कम्पॅॅनियनशिप, राइट टू सेक्शुअ‍ॅलिटी’ मिळवून दिला. भारतीने त्या पुढे जाऊन ‘राइट टू पॅरेन्टहूड’सुद्धा मिळवून दिला..

माझ्यासमोर आनंदवनचं मैदान होतं आणि तिथले प्रश्न होते. ते कसे सोडवायचे याचा विचार करू लागल्यावर एकेक प्रश्न उलगडत गेला, उत्तरं सापडत गेली. काहींची लवकर सापडली, काहींची उत्तरं सापडायला वेळ लागला. कधी यश मिळालं, कधी अपयश आलं. पण मी आणि माझे सहकारी धडका मारत राहिलो. मी स्वप्नं पाहिली, त्यांच्याशी शेअर केली आणि त्यांनी ती उचलून धरली, आपली मानली. कारण आम्ही सगळे मिळून आम्हा सगळ्यांसाठी, आनंदवनासाठीच विचार करत होतो. त्यातूनच बाबांनी पाहिलेलं प्रतिसृष्टीचं स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही एकेक पाऊल पुढे टाकू शकलो.

० च्या दशकाच्या सुरुवातीचा काळ म्हणजे गडचिरोलीतल्या भामरागडजवळच्या आमच्या ‘लोकबिरादरी’ प्रकल्पाच्या सुरुवातीचा. तिथलं जंगल साफ करून जागा वापरण्याजोगी करण्याबरोबरच आनंदवनातून सामानसुमान आणणं हेही मोठंच काम होतं. त्या वेळी भामरागडला कोणत्याच वस्तू मिळायच्या नाहीत. त्यामुळे बांधकामासाठी विटा-सिमेंटपासून ते स्वयंपाकाची भांडी, धान्य, कपडेलत्ते, औषधं, सगळं सगळं आनंदवनातूनच आणावं लागायचं. कुष्ठमुक्त बांधवांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळत नसल्याने सुरुवातीची काही र्वष मी स्वत: ट्रक चालवत हेमलकसाला सामान पोहोचवण्याचं काम करत होतो. आनंदवन-हेमलकसा हे अंतर जवळपास अडीचशे किलोमीटर, त्यातले शेवटचे सत्तर-ऐंशी किलोमीटर रस्ता असा नाहीच, अशी तेव्हाची परिस्थिती होती. आम्ही ट्रकमध्ये सामान घेऊन आनंदवनातून निघायचो आणि मजल-दरमजल करत हेमलकसाला पोहोचायचो. त्यात पावसाळ्यात नद्यांना पूर यायचा आणि भामरागडशी संपर्कच तुटून जायचा. कधी कधी हा आजचा चार-पाच तासांचा रस्ता पार करायला आम्हाला त्या काळी तीन-तीन दिवस लागायचे. जीप अनेकदा सामानासकट नदीमध्ये अडकून बसायची. मग खाली उतरून गाडी अक्षरश: उचलून वर काढावी लागायची. पुन्हा पुढे गेलं की आणखी एखादी नदी वाट अडवून बसलेली असायची. मग त्या नदीचं पाणी उतरेपर्यंत तिथेच मुक्काम ठोकून बसायचं. हेमलकसाचा ‘लोकबिरादरी’ प्रकल्प उभारण्यासाठी आणि तिथली घडी नीट बसवण्यासाठी आम्ही कार्यकर्त्यांनी अशा किती चकरा मारल्या असतील त्याची मोजदादच नाही.

बऱ्याचदा दिवसरात्र ट्रक चालवताना झोप यायची. त्यात, चहाला मी कधीच तोंड लावलं नव्हतं आणि कॉफी हा शब्दच जंगलातल्या टपऱ्यांत माहीत नव्हता. मग प्रवासात खूप जास्त तिखट खायला लागलो. आम्ही एक नवीन तिखट चटणी शोधून काढली होती, रेड आरडीएक्स नावाची! तिच्या अतिजहालपणामुळे तिचं नाव आरडीएक्स. प्रवासात एकदम कमी वेळात तयार व्हायची. ही चटणी मला कायम जागं ठेवायची. नंतर हे सगळं माझ्या खाण्याचा इतका महत्त्वाचा भाग बनलं की आता रोजच्या ५-६ मिरच्या आणि ‘आरडीएक्स’ खाल्याशिवाय माझं भागत नाही. कदाचित तोच तिखटपणा माझ्या बोलण्यातही आला आहे. पण कडवटपणापेक्षा तिखटपणा बरा, नाही का?

मी नेहमीच म्हणतो की माझ्या तोंडाचं सॉफ्टवेअर खराब आहे. मला फार कमी वेळा सुसंगतपणे बोलता येतं. त्यामुळे फार कमी लोकं माझं अंतरंग ओळखू शकली. बहुतांश वेळा माझ्या बोलण्यामुळे गैरसमजच होतात. मी जेव्हा म्हणतो की ‘मला आनंदवन संपवायचे आहे’, तेव्हा माझ्यावर खूप टीका होते. पण मला विचारायला आवडेल की ज्या समाजात आनंदवनासारख्या ‘सामाजिक तुरुंगा’ची वेगळी गरजच उरणार नाही, अशा सहृदय समाजाचे स्वप्न जर मी पाहत असेन तर माझं काय चुकलं?

मला वाटतं, आनंदवन हे ‘एकलव्य विद्यापीठ’ आहे. कौरव आणि पांडवांना शिकवायला एक से बढकर एक गुरुजन होते; पण एकलव्य एकटा होता. एकलव्याचं तत्त्व होतं – ‘स्वयंशिक्षा’ आणि ‘स्वयंप्रज्ञा’. त्याच तत्त्वाने आनंदवनात आजवर अनेक एकलव्य तयार झाले, पण या एकलव्यांचा केवळ अंगठाच नाही तर सगळीच बोटं कलम करून टाकली होती नियतीने, पण त्या बोटं नसलेल्या हातांनी खूप मोठी करामत करून दाखवली.

आतासुद्धा मी पूर्णवेळ माझ्या कामातच असतो. कारण मला दुसरं काही करताच येत नाही. मी माझ्या परिवाराला कधीच वेळ देऊ  शकलो नाही. भारतीने मुलांसाठी आई आणि बाप या दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे पार पडल्या. मुलांचं बालपण, त्यांचं मोठं होणं हे मी फारसं अनुभवू शकलो नाही. पण आता मात्र मी ती सगळी कसर माझ्या अस्मि, रावी आणि शर्विल या तीन नातवंडांमध्ये भरून काढतो. आजही माझं पत्रलेखन चालूच आहे. आजही माझ्या बाजूला १०० प्रकारची, विविध रंगांची, आकारांची पेनं असतात. माझ्या पेनांबाबत मी खूप पझेसिव्ह आहे, मी कधी कुणाला हात लावू दिला नाही. पण आता हे तिघे मला न जुमानता माझी पेनं घेऊन पळतात, माझ्या सगळ्या वस्तूंवर हक्क गाजवतात आणि मला काहीही बोलता येत नाही. भारती म्हणते की, आजोबा झाल्यावर तू बदललास. खरं आहे तिचं, माझ्यासारख्या एकलकोंडय़ा, कार्यमग्न व्यवस्थापकाचा नातवंडांनी एक साधासुधा आजोबा करून मला ‘माणसात’ आणलं. आता या तिघांबरोबर मी माझं आणि माझ्या मुलाचंदेखील बालपण जगून घेतो आहे.

आता संस्थेचा कारभार पुढची पिढी हाताळते आहे. बाबांचीच नाही तर कार्यकर्त्यांचीसुद्धा तिसरी पिढी ‘आनंदवन’, ‘सोमनाथ’,‘लोकबिरादरी’त कार्यरत आहे. या पिढीची आव्हानं वेगळी आणि त्यांना सामोरं  जाण्याची पद्धतही वेगळी. शेवटी इतकंच म्हणेन की, आनंदवनाचं हे बीज देशात जिथे गरज असेल तिथे जाऊन पडावं, रुजावं आणि त्यातून उत्तरांच्या दिशेने प्रवास सुरू व्हावा. तसं होणं हीच ताई-बाबांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने झालेली वाटचाल असेल!

डॉ. विकास आमटे

सामाजिक कार्यकर्ते

आनंदवन, ता. वरोरा, जि. चंद्रपूर, महाराष्ट्र भ्रमणध्वनी: ९८२२४६६७३४

vikasamte@anandwan.in