केवळ अभिनय करीत कौतुक करून घेण्याचा काळ मी आता मागे टाकलाय. अर्थात हा ‘सोपा पेपर’ मला ताजंतवानं करतो हे मान्य. पण ‘सुखाचा जीव दु:खात घालायची, दिग्दर्शनाची आव्हानं पेलण्याची चटक लागली आहे. ती सुटणार नाही हे त्याहूनही खरं. नवी स्वप्नं पाहायला, नवी आव्हानं पेलायला मी सतत तयार आहेच. स्वत:ला सतत आव्हानं देत राहणं – स्वत:ला सिद्ध करत राहणं – प्रश्न विचारत राहणं- उत्तरं शोधण्यासाठी धडपडत राहणं.. तरच आपल्या ‘असण्याला’ काही अर्थ आहे असं वाटतं..
प्रत्येकाला आयुष्याच्या विशिष्ट टप्प्यावर असं नक्की वाटून जातं, की आपण आज कुठे आहोत आणि काय वेगळं करू शकतो?.. अत्यंत मोकळेपणानं सांगते, माझ्या मनात जेव्हा हा विचार आला तेव्हा मी घाबरले! स्वत:ला सांगू लागले, ‘‘बरं चाललंय की तुझं! इतक्या लहानपणी ‘स्वामी’तल्या रमाची भूमिका मिळाली – उदंड कौतुक झालं, काहीही न करता आपसूक हिंदी मालिकांत प्रवेश झाला. ‘श्रीकांत’, ‘ग्रेट मराठा’, ‘मीरा’, ‘द्रौपदी’सारख्या पीरियड ड्रामा आणि ‘हसरते’, ‘चट्टान’, ‘टीचर’, ‘स्पर्श’, ‘सोनपरी’सारख्या वीसहून अधिक मालिकांत प्रमुख भूमिका – मराठी विश्वात ‘अवंतिका’, ‘राजा शिवछत्रपती’, ‘गुंतता हृदय हे’, ‘दावत’सारख्या यशस्वी मालिका- ‘थांग’, ‘तुझ्या माझ्यात’, ‘यलो’सारखे मोजके परंतु वेगळे चित्रपट – पाठिंबा देणारं, कौतुक करणारं कुटुंब आहे. आता आणखी काय हवंय? आता हे आणि असंच चालू ठेवायला काहीच हरकत नाही. रसिकांचं भरपूर प्रेम, सन्मान, पारितोषिकं, पैसा, समाधान- आपल्या तत्त्वात बसेल असं आणि तरीही भरपूर असं काम किती जणींना करायला मिळतं? समाधानी राहायला शिक की जरा!’’
स्थळ – विश्रामबाग वाडा, पुणे. प्रमुख पात्र- मृणाल देव. (तेव्हाची) ‘स्वामी’ या सुप्रसिद्ध कादंबरीवर आधारित गजानन जागीरदार दिग्दर्शित मालिकेत ‘रमा’च्या प्रमुख भूमिकेत. बाबासाहेब पुरंदरे यांनी पसंत केलेल्या अस्सल खानदानी पैठणीत, खरे दागिने घालून घट्ट बांधलेल्या खोप्यातली मी मला जशीच्या तशी आठवते. आजूबाजूला अनेक माणसं तरीही परिचयातलं कुणीच नाही. काही वीस- बावीस वर्षांचे गोटे केलेले तरुण वेगवेगळी कामं करताहेत. त्यातल्या काहींनी प्रमुख भूमिकांसाठी लूक टेस्टदेखील केली होती. मात्र रवींद्र मंकणी या प्रथितयश कलाकाराने बाजी मारल्यामुळे ‘माधवराव पेशवे’ साकारायची संधी गेल्याचं शल्य प्रत्येकाच्या चेहऱ्यावर.. दया डोंगरे, श्रीकांत मोघे, बाळ कर्वे, सुधीर दळवी- अनेक मातब्बर कलावंत आपापल्या भूमिकांची स्क्रिप्टस् घेऊन संवाद पाठ करताहेत. पहिल्यांदाच हा सारा अनुभव घेण्याच्या दडपणाखालची मी.. सोळा- सतरा वर्षांची.. धडधडत्या हृदयानं चुळबुळ करत बसलेली. पहिला दिवस गेला.. दुसराही तसाच गेला.. संपूर्ण तयार होऊन बसलेल्या मला कुणीच बोलवेना. ना हातात स्क्रिप्ट ना माझ्याकडे कुणाचं लक्ष! तशीच कंटाळून रात्री घरी गेले आणि हमसून हमसून रडू लागले. सगळे विचारत होते, पण काहीच सांगता येईना..
तिसऱ्या दिवशी मात्र दुपारनंतर पपांचा (दिग्दर्शक- गजानन जागीरदार) निरोप आला. एका मोठय़ा महालात एक झिरझिरीत पडद्यामागे मला बसवलं आणि माईकवरून सूचना द्यायला सुरवात केली, ‘डावीकडे घाबरून बघ’, ‘उजवीकडे बघून पदर नीट कर’, ‘हलकेच हस’, ‘मान खाली घाल-डोळ्यात पाणी येऊ दे- आलं की वर बघ’ (डोळ्यात पाणी कसलं येऊ दे? इथे आपोआप अश्रूंच्या धाराच येत होत्या) – हे सारं अवघ्या तीन चार मिनिटांत आटपलं आणि ते म्हणाले, ‘‘पळा आता घरी!’’ मी घरी आले ती आता जन्मात अॅक्टिंग करणार नाही अशी प्रतिज्ञा करूनच! रमाच्या भूमिकेसाठी चर्चेत असणाऱ्या कुणा प्रथितयश अभिनेत्रीला घेऊन शूटिंग पार पडल्याची माझी खात्रीच झाली होती. मला वाईट वाटू नये म्हणून माझे दोन-चार मिनिटांचे चित्रीकरण झाले आहे हे गृहीतच धरलं मी! खूप दु:खी झाले. आठवडय़ाभराने जेव्हा पपांचा फोन आला तेव्हा मी मनाची पूर्ण तयारी केली होती. आई बाबांबरोबर स्टुडिओत पोहोचले आणि चक्क आम्हाला पहिला एपिसोडच दाखवला त्यांनी, आणि त्याच क्षणी मला लख्ख साक्षात्कार झाला, हे माध्यम दिग्दर्शकाचं आहे. आपण काय चित्रित करतो अणि त्याचा काय वापर होणार आहे हे केवळ त्यालाच कळत असतं. वेगवेगळ्या भावना दर्शवणाऱ्या माझ्या त्या ५-६ क्लोज अप्सचा त्यांनी एवढा अप्रतिम वापर करून घेतला होता की इतर कुणाहीपेक्षा माझंच कौतुक झालं- अपरंपार.. खरं तर मी काहीच न करता! कॅमेऱ्यामागच्या विश्वाची जादू मला पदार्पणाच्या दिवशीच उमगली आणि ते आकर्षण आजही कायम आहे!
स्थळ- ‘गुंतता हृदय हे’ या झी वाहिनीवरचा
श्रीरंग गोडबोले निर्मित मालिकेचा सेट. पुलाखालनं बरचं पाणी वाहून गेलेलं.. आता मृणाल कुलकर्णी ही एक नावारूपाला आलेली अभिनेत्री! बासू चॅटर्जी, वेद राही, रवी राय, अजय सिन्हा, संजय सूरकर, जब्बार पटेल अशा अनेक नामवंत लेखक, दिग्दर्शकांबरोबर बरंच काम करून झालेलं. आज या सेटवर स्क्रिप्टची वाट पाहाणं चाललंय.
सतीश राजवाडे या गुणी दिग्दर्शकाबरोबर मी कसल्याशा विषयावर चर्चा करतेय. मनात चलबिचल चालू आहे.. एका क्षणी धाडकन् पेपर- पेन घेऊन मी लिहायला सुरवात करते. दिग्दर्शक म्हणून माझ्या पहिल्या चित्रपटाची कथा- ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं!’ कित्येक दिवस मनात घोळणारा विषय. दोन स्त्रीकेंद्रित मासिकांचं संपादन करताना, लग्न, घटस्फोट, कुटुंबसंस्था, स्त्रीपुरुष संबंध यावर लिहीत होतेच. निमित्तानिमित्तानं चर्चा, थोडं कायदेविषयक संशोधनही तयार होतं. तात्कालिक निमित्त झालं, माझ्या बाबांनी गमतीगमतीत सांगितलेलं एक संस्कृत सुभाषित-
‘कन्या वरयते रुपम्,
माता वित्तम् पिता श्रुतम्
बांधव: कुलमिच्छन्ति
मिष्ठान्नमितरेजना:
ज्या लग्नसंस्थेबद्दल आपण इतक्या सहजतेने मेसेजेस पाठवतो, ‘नवरा’ आणि ‘बायको’ यांच्यावरून हास्य विनोद करतो- या ‘संस्थेबद्दल’ समाजाला काय वाटतं? ‘मिष्ठान्नमितरेजना:’?
पुण्यासारख्या शहरात, म्हात्रे पुलाजवळ लग्नसमारंभासाठीची सभागृहं- लॉन असणारा एक अख्खा रस्ता आहे. एके दिवशी तिथून जात असताना दिसलं की प्रत्येक ठिकाण माणसांनी ओसंडून वाहतंय. अप्रतिम सजावट, आतषबाजी, रोषणाई, मेजवान्या. मनात आलं, आज एका दिवसात किती कोटी रुपये या रस्त्यावर खर्च होताहेत! हा खर्च, ही हौसमौज, देणं घेणं- मानपान- उद्या या वर-वधूंचा संसार सुरू होईल आणि कालांतरानं यातला फक्त ‘खर्च’ हाच भाग लक्षात राहील. एकमेकांच्या सोबतीने सुरू होईल तो सहवास- प्रवास म्हणजे लग्न. बाकी केवळ समारंभ! समारंभावर एवढा खर्च आणि नात्यावर?
प्रत्येक पिढीचा ‘लग्न’ आणि ‘प्रेम’ यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो- लग्न करायचं आणि टिकवायचं असं म्हणणारी एक पिढी- तर इतक्या मित्रांपैकी नक्की लग्न कुणाशी करायचं हे न ठरवता येणारी दुसरी. मुलं नसती तर कदाचित..असं अनेकदा मनात येऊ गेलेली विवाहित पिढी एका बाजूला तर दूरचित्रवाणी मालिकांमधले अजब नातेसंबंध बघत लहानाची मोठी होणारी चिमुरडी दुसऱ्या बाजूला.. माझी मैत्रीण मनीषा कोर्डेने कथेला उत्तम आकार दिला. अत्यंत खुसखुशीत संवाद लिहिले- आणि मग मात्र धडकी भरली. आपल्याला अभिनय करायचाय की दिग्दर्शन! बरेच दिवस निर्णय होईना- दरम्यान सचिन खेडेकर, पल्लवी जोशी, मोहन आगाशे, मिलिंद इंगळे, किशोर कदम, सुनील बर्वे, स्मिता तळवलकर, सुहास जोशी, सर्वाशी बोलणं होत होतं- एका वेगळ्या भूमिकेतून या साऱ्यांशी बोलताना गंमतही वाटायची- दडपणही यायचं. पण स्क्रिप्ट वाचल्यावर सर्वानी एक अवघड विषयाला सुंदर पद्धतीने हात घातल्याबद्दल मनापासून अभिनंदन केलं. आपापल्या कुटुंबातल्या, मित्रपरिवाराच्या कहाण्याही मोकळेपणानं सांगितल्या. स्क्रिप्ट आणखी चांगलं झालं..
निर्माता चांगला भेटला. दणक्यात मुहूर्त झाला. खुद्द हेमामालिनींच्या हस्ते- दिग्दर्शन मी करणार हे ठरलं होतं तोपर्यंत.. त्यातली इतकी चांगली भूमिका दुसऱ्याला देणार? असं म्हणत नवरा आणि मुलगा दोघंही हटून बसले. हो नाही करता करता मी त्यातली भूमिका करायला तयारही झाले. अभिनय हा भाग सोपा होता. लेखनापासून सुरुवात केल्याने काय आणि कसं शूट करायचंय हे पक्क होतंच. अमलेंदू चौधरीसारखा मित्र कॅमेरामन होता. अंकुर टेक्निकल बाजू समर्थपणे सांभाळत होताच. दोनच दिवसात- अनेक अडचणी आल्या तरीही साठ लोकांच्या मदतीने शूटिंग उत्तम सुरू झालं- बघता बघता शेडय़ूल संपलं आणि शेवटच्या दिवशी चांगला रट्टा बसला. रात्री उशिरा कळलं की फायनान्सर अडचणीत आहे-दवाखान्यात. मृत्युशय्येवरच जवळजवळ! एकदम हातापायातलं बळच गेलं- निम्म्याहून जास्त चित्रपट शूट झालेला आणि एकाही कलाकार, तंत्रज्ञाला साइनिंग अमाउंट वगळता पैसेच दिले नव्हते.
सुरक्षित आणि कौतुकाचं आयुष्य काढलेल्या, अभिनेत्री म्हणून केवळ प्रेमच मिळालेल्या मला, बसलेला हा पहिला मोठा धक्का. का मी या फंदात पडले, असं हजारवेळा वाटून गेलं.. अर्धवट प्रोजेक्टला कुणी हात लावेना- ‘मृणाल दिग्दर्शन करतेय’ म्हणून अनेकांच्या वर गेलेल्या, वक्र झालेल्या भुवया आठवल्या, ‘गॉड अलाऊज् यू टर्न’ असं म्हणत सोयीस्कर पळवाट काढावीशी तर रोज वाटली.. या काळात मी खूप काही शिकले- स्वत:बद्दल – जगाबद्दलही! मनुष्यस्वभाव काळायला जगातलं कोणतंही पुस्तक उपलब्ध नाही.. तो अनुभवातूनच कळतो- पूर्वजांनी लिहून ठेवलेल्या म्हणीचं, वाक् प्रचारांचं फार कौतुक वाटलं.
अगदी ‘जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही’ या ओळीचा अर्थ फार चाग्ांला कळला. अपेक्षित धक्क्याला तोंड देण्याची आपल्यात शक्तीच नाही आहे, याचा साक्षात्कार झाला! खूप वाईट वाटलं. असं घडल्याचं तर वाटलंच, पण स्वत:च्या सुरक्षित आयुष्याबद्दलही वाटलं. सगळं सोडून द्यावं- स्वत:ला कोषात बंद करावं असंही.. मग मात्र संघर्ष सुरू झाला आयुष्यात पहिल्यांदाच. जर मी मनात आणलं असतं तर स्वत:च्या खात्यातून सर्वाचे पैसे चुकते करू शकलेच असते, पण स्मिताताईनं (तळवलकर) उत्तम सल्ला दिला. ठाम राहायला शिकवलं. सगळ्या टीमनं एका शब्दानं विचारलं नाही. धीर दिला आणि सारी जुळवाजुळव करून चित्रपट तयार झाला. प्रदर्शनाची तारीखही जाहीर झाली. आणि हाय रे दुर्दैवा! त्याच तारखेला इतर पाच मराठी चित्रपट आणि एक मोठा हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार असं कळलं. प्रत्येक दिवशी एक नवा धक्का!
मात्र ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं’ने सारे धक्के पचवत उत्तम यश मिळवलं. अनेक पारितोषिकंही! तेव्हा असं लक्षात आलं, की आपल्या वाटय़ाचा हा पांढरपेशा चिमुकला संघर्ष आपण पार केला की! कित्येकांच्या वाटय़ाला येणारे अडचणींचे डोंगर आपल्या आयुष्यात नाहीत हे खरं, पण आपल्या अनेक समवयीन लोकांपेक्षा हे वेगळं काहीतरी करता आलं की आपल्याला. नॉट बॅड अॅट ऑल!
२१ जून २०१२ ‘प्रेम’.. प्रदर्शित होऊन तीन महिने झाले आणि माझा फोन खणखणला. माझ्या निर्मात्याला माझ्याचबरोबर नवा चित्रपट बनवायचा होता. फारच सुखद धक्का होता, मात्र परत एकदा ‘सुखाचा जीव दु:खात’ घालण्याची माझी मानसिक तयारी व्हायची होती. चित्रपट निर्मितीत ‘पडद्यावर’ दिसतं त्याच्या कैक पटीने नाटय़ ‘पडद्यामागे’ घडतं याची उत्तम तोंडओळख झाली होती. थोडी धीटही झाले होते. मनात अनेक वर्षे रेंगाळत असलेला विषय माझ्या टीमला ऐकवला. ‘रमा- माधव’ एका स्त्रीच्या नजरेतून चित्रित झालेली ऐतिहासिक प्रेमकहाणी- आता आठवलं की गंमत वाटते..
सगळे खूप उत्साहित झाले होते, पण ‘ऐतिहासिक’ला अडखळत होते. पण एव्हाना आमचा मुलगा विराजस ‘व्हिसलिंग वूड्स’मध्ये दिग्दर्शनाचा अभ्यास करत होता. त्याने अगदी लावूनच धरलं.. जेम्स फॉर्बज् या इंग्रज प्रवाशाने रमाबाईंना सती जाताना प्रत्यक्ष पाहिले होते. ग्रँड डफच्या इतिहासातही त्याचे यथार्थ वर्णन आहे. ते वाचून विराजस, अर्जुन, दिग्पाल हे अतिशय भारावून गेले. आणि माझ्या या मस्त तरुण टीमबरोबर माझा इतिहासाचा अभ्यास जोरात चालू झाला. सात महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर पटकथेचं वाचन झालं. नऊ वर्षांची सामान्य घरातली रमा प्रथम शनिवारवाडय़ात पाऊल ठेवते. अत्यंत श्रीमंत, थोरामोठय़ांच्या घरातलं एकेक स्त्री रूप पाहते, अनुभवते. करारी गोपिकाबाई, दु:खी पार्वतीबाई, परिस्थितीने कटू बनलेली आनंदीबाई ही सारी नाती तिच्या मनावर खोल परिणाम करतात. पतीरूपात मिळालेला सवंगडी तिच्या वाटय़ाला येतच नाही फारसा. माधवराव पेशव्यांचा तापट स्वभाव, त्यांच्यावर अकाली आलेल्या जबाबदाऱ्या, भाऊबंदकी, युद्ध आणि तारुण्यात आलेलं गंभीर आजारपण- मात्र एखादं माणूस आयुष्यात येतं ते असं येतं, आपल्यात असं भिनून जातं की त्याच्या साऱ्या आठवणी त्याच्या ‘असण्याच्या’ असतात- भेटीचा आनंद, निरोपाची वेदना आणि प्रेमाच्या अपूर्णतेचा शोक या तीनही गोष्टी म्हणजे रमा- माधव यांची प्रेमकहाणी.. हुरहुर लावणारी..
हा चित्रपट माझ्यासाठी एक स्वप्न होतं. माझ्या आयुष्याशी अनेकार्थानं जोडलेला हा विषय. अनेक वर्षांपूर्वी मी अभिनित केलेल्या व्यक्तिरेखेला अनेक पैलू पाडीत तरीही इतिहासाची एकही चूक न करता- आजच्या प्रेक्षकाला भावेल अशी प्रेमकथा मांडणं हे खरोखरच एक आव्हान होतं. पटकथा पक्की झाली. मनस्विनी लता रवींद्र या गुणी लेखिकेने छोटय़ा रमा माधवांचे संवाद इतके मस्त लिहिले की हळूहळू मजा येऊ लागली. श्रीराम साठेलिखित अप्रतिम गं्रथ ‘पेशवे’ हा आमची ‘गीता’च बनला होता. स्क्रिप्ट तयार झालं तेव्हा पहिलं वाचन बाबासाहेब पुरंदरे यांच्यासमोर झालं. धडधडत्या हृदयानं. संपूर्ण वाचून झालं.. तोपर्यंत ते एकही शब्द बोलले नाहीत. पूर्ण एकाग्रता! मग माझ्यासाठी लाखमोलाचा असा एकच शब्द उच्चारला.. ‘बिनचूक!’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी मला मुळीच धास्ती वाटली नाही- खूप समरप्रसंग आले तरीही.. अगदी शनिवारवाडय़ाच्या शूटिंगच्या परवानगीसाठी थेट दिल्लीपर्यंत अथक कष्ट घ्यावे लागले तेव्हाही नाही आणि लढाई चित्रीकरणासाठी सव्वाशे घोडे जमवताना अगदी ‘नाकीनऊ आले’ तेव्हाही नाही.
अत्यंत प्रामाणिकपणे आणि मन:पूर्वकतेने मला माझ्या पुण्यात घडलेल्या, शनिवारवाडय़ाच्या आजही दिमाखात उभ्या असलेल्या भव्य तटाबुरुजांनी पाहिलेल्या, आपल्या सर्वाच्या पूर्वजांनी ऐकलेल्या आणि
रणजित देसाईंनी आपल्या सिद्धहस्त लेखणीने आधीच अजरामर करून ठेवलेल्या त्या अप्रतिम प्रेमकहाणीला एका वेगळ्या रूपात आजच्या प्रेक्षकांपर्यंत आणायचं होतं.. बस्!
नितिन दादा (देसाई), सुधीर मोघे, आनंद मोडक, नरेंद्र भिडे, राजीव जैन, सरोज खान, रवी दिवाण- या साऱ्यांना माझी धडपड भिडली होती खास! मराठी चित्रपटाच्या बजेटमध्ये राहूनही हा चित्रपट सर्वागसुंदर बनवण्यासाठी त्यांनीही हात न राखता मला सर्वतोपरी मदत केली. आपापल्या कलेचा परीसस्पर्श माझ्या या चित्रपटाला दिला. लेखनापासून पडद्यावर चित्रपट येईपर्यंत दिग्दर्शकाला शेकडो अग्निदिव्यातून पार पडावं लागतंच. ‘रमा माधव’सारखं भव्य ऐतिहासिक स्वप्न पाहताना तर फारच हिंमत लागते- ती माझ्यात कुठून आली हे मला आजतागायत कळलेलं नाही. मात्र या चित्रपटानं प्रेक्षकांच्या हृदयात एक विशेष स्थान मिळवलं. आलोक राजवाडे-
पर्ण पेठेसह प्रसाद ओक, सोनाली कुलकर्णी, अमोल कोल्हे, श्रुती मराठे- छोटी श्रुती कार्लेकर आणि अर्थातच रवींद्र मंकणी – साऱ्या कलाकारांनी जीव ओतून काम केलं.
बाविसाव्या वर्षी रमाबाई ज्या धीरोदात्तपणे माधवरावांबरोबर शांत चित्ताने सती जातात, स्वत:च्या हाताने चितेला अग्नी देतात- हा प्रसंग चित्रपटात असावा अशी आम्हा सर्वाची खूपच इच्छा होती. पेशवे घराण्यात सतीची प्रथा नसतानाही स्वेच्छेने केलेलं हे सहगमन- या ‘रमा’च्या प्रेमात आमची टीम आकंठ बुडालेली होती. मात्र माध्यम हाताळताना सामाजिक भान ठेवावं लागतंच- मनावर दगड ठेवून – परंतु मन:पूर्वकतेने खूप तरल- काव्यात्म असा शेवट केला आणि प्रेक्षकांनीही त्याला भरभरून प्रतिसाद दिला.
‘रमा-माधव’ जगभरात विखुरलेल्या मराठी जनांनी आमंत्रित केला. सिंगापूर, इंग्लंड, स्वित्र्झलडसहित, अमेरिकेत अनेक ठिकाणी, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड सर्वत्र त्याचं कौतुक झालं. ऐतिहासिक चित्रपट दिग्दर्शित करणारी पहिली दिग्दर्शिका असं माझ्याबद्दल लिहिलं, बोललं गेलं. पण खरं सांगू? मला त्याचं काही भानच नव्हतं. आणि नाहीही! इतिहासावर विलक्षण प्रेम करणाऱ्या माझ्या आजोबांना गो. नी. दांडेकरांना वाहिलेली आदरांजली होती ती! मी अभिनीत केलेल्या ‘रमा’ला पुन्हा एकदा प्रेमाने भेटण्याची संधी मी घेतली फक्त! कोणत्याही प्रामाणिक प्रयत्नाला जनमानसाची साथ असतेच. या संपूर्ण प्रक्रियेत अनेकदा रडले, थकले अगदी कोलमडलेसुद्धा पण याच काळानं मला कंबर कसून नवी आव्हानं पेलण्याची शक्तीही दिली.
केवळ अभिनय करीत कौतुक करून घेण्याचा काळ मी आता मागे टाकलाय- अर्थात हा ‘सोपा पेपर’ मला ताजंतवानं करतो हे मान्य- याच महिन्यात प्रदर्शित होणारा ‘अॅन्ड जरा हटके ’ मी खूप मनापासून एन्जॉय केला हे खरंच- पण सुखाचा जीव दु:खात घालायची, दिग्दर्शनाची आव्हानं पेलण्याची चटक लागली आहे. ती सुटणार नाही हे त्याहूनही खरं. नव्या चित्रपटांची तयारी करताना मागचे सारे बरे-वाईट अनुभव गाठीशी बांधून प्रवास चालूच राहाणार आहे- नवी स्वप्नं पाहायला, नवी आव्हानं पेलायला मी सतत तयार आहेच. मात्र मनोरंजन क्षेत्राच्या बाहेरही पाऊल टाकते आहे. त्याच मन:पूर्वकतेने!
माझ्या वडिलांना लागोपाठ दोनदा ज्या रोगानं घाबरवलं – संपूर्ण कुटुंबाला हादरवलं त्या कर्करोगाच्या जागृतीसाठी मी काम सुरू केलं आहे. ‘ग्लोबल जेनेटिक अलायन्स’ या संस्थेच्या माध्यमातून! बाबा कर्करोगाच्या हल्ल्यातून सुखरूप बचावले. कारण त्यांना त्याची अचूक माहिती मिळाली – वेळेत निदान झालं आणि आधुनिक विज्ञानाचा आधार घेऊन त्यांनी या रोगाचा सामना केला. आज फ्ल्यू झाल्यासारख्या कर्करोगाच्या केसेस सर्वत्र आढळतात. वयाचाही विधिनिषेध आता राहिला नाही. त्याचा यशस्वी सामना करण्यासाठी जगभरातले शास्त्रज्ञ झटून मेहनत करत आहेत. कर्करोग रुग्णांच्या पुढच्या पिढीतही जीन्समधून हा रोग संक्रमित होण्याची शक्यता असते याची अनेकांना कल्पनाच नसते. वेळीच जर चाहूल लागली तर १०० टक्के या विळख्यातून आपण बाहेर पडू शकतो. मात्र यासाठीची जनजागृती फार कमी पडते आहे. योग्य मार्गदर्शन, वेळेत केलेल्या चाचण्या आणि अचूक औषधोपचार, समुपदेशन या साऱ्या मार्गाचा अवलंब करून हा रोग आटोक्यात आणता येईल. यासाठीची जागृती करणं हे माझं या क्षणाचं सगळ्यात मोठं ध्येय आहे.
आजवर आयुष्यात रसिकांचं खूप प्रेम मिळालं- हे प्रेम फार महत्त्वाचं – पण तितकंच महत्त्वाचं स्वत:ला सतत आव्हानं देत राहाणं- स्वत:ला सिद्ध करत राहाणं- प्रश्न विचारत राहाणं- उत्तरं शोधण्यासाठी धडपडत राहाणं- तरच आपल्या ‘असण्याला’ काही अर्थ आहे असं वाटतं. अन्यथा..
– मृणाल कुलकर्णी (अभिनेत्री-दिग्दर्शक)