प्यारेलाल शर्मा
संगीतकार

‘‘मी आणि लक्ष्मीकांतजी आम्ही दोघं चाली करायचो व संयोजनही करायचो. मी चाल दिलेलं गाणं कोणतं आणि लक्ष्मीजींनी चाल दिलेलं गाणं कोणतं, हे सांगता येणार नाही, इतकं ते एकजीव व्हायचं. आमचे विचार एक झालेले होते. एकदा आंघोळ करताना मला एक चाल सुचली. लक्ष्मीजींनीही त्यावर काम केलं होतं. त्यांची माझी चाल एकसारखी होती. कोणी तरी आम्हाला, ‘‘तुमचं रक्तपण सारखं असेल.’’ आम्ही रक्ततपासणी केली, तो एकच निघाला, ‘बी’ पॉझिटिव्ह! वृत्तीसारखा रक्तगट! ‘ज्योत से ज्योत जगाते चलो’ म्हणत आम्ही स्वराला स्वर जोडत गेलो, त्यातून आमचा छोटासा संगीतप्रवाह जन्माला आला. संगीत हा आमचा ईश्वर आहे. तीच आमची पूजा आहे, तेच आमचं जगणं आहे..’’

Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Loksatta Chatura How to plan a New Year 2024 party at home
चतुरा: घरीच करा न्यू ईयर पार्टीची धम्माल
Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
Mechanism to assess the effects of earthquakes in 30 dams in Maharashtra
राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा
Statement of Shailesh Lodha of Taarak Mehta Ka Ooltah Chashma fame about life Pune print news
तारक मेहता का उल्टा चष्मा फेम शैलेश लोढा म्हणाले, आयुष्य म्हणजे…
Surya-Shukra Yuti 2025
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार मालामाल
agricultural pumps powered
राज्यात १.३० लाखांवर कृषिपंपांना दिवसा ‘ऊर्जा’, सौर ऊर्जेद्वारे…

मला िहदी चित्रपटाचा संगीतकार व्हायचं नव्हतं, तर येहुदी मेन्यूहीनसारखं व्हायोलिनवादक व्हायचं होतं. त्यासाठी सतराव्या वर्षी मी व्हिएन्नाला जायला निघालोही; पण लक्ष्मीजींनी (लक्ष्मीकांत कुडाळकर) मला थांबवलं आणि आम्ही ‘लक्ष्मीकांत प्यारेलाल’ या नावाने संगीत देऊ लागलो.. संगीतातला एक सुरेल अध्याय त्यातून लिहिला गेला..

आपण ठरवतो एक, पण घडतं भलतंच, तसंच झालं हे. माझ्या वडिलांना, म्हणजे पं. रामप्रसाद शर्माना (बाबाजी) सारे जण ट्रम्पेटवादक म्हणून ओळखतात. गोरखपूर- बडोदा-कोलकाता-कराची- मुंबई- पुणे- मुंबई असा प्रवास करत ते मुंबईत स्थायिक झाले. पाश्चात्त्य पद्धतीची नोटेशन करू शकणारी अगदी मोजकी माणसं त्या काळात होती, त्यापकी एक बाबाजी होते. त्यांनी त्यांच्याजवळची नोटेशनलेखनाची विद्या मुक्तहस्ताने सर्वाना दिली. माझ्या वयाच्या आठव्या वर्षी केव्हा तरी एके सकाळी आठ वाजता त्यांनी मला समोर बसवलं आणि नोटेशन कसं करायचं ते अध्र्या तासात शिकवलं. त्यानंतर, मी पुढचे तीन दिवस बारा बारा तास नोटेशन लेखनाचा सराव करू लागलो आणि त्यांनी मला व्हायोलिन शिकवायला सुरुवात केली. व्हायोलिनवादकाला भारतीय किंवा पाश्चात्त्य संगीतात मरण नाही, असं ते सांगत. त्यांनी व्हायोलिन हाती दिलं, पण वाजवायला शिकवलं ते सहा महिन्यांनी! पाश्चात्त्य पद्धतीने व्हायोलिन वाजवण्यासाठी बसायची एक पद्धत आहे. व्हायोलिनवादक डावा खांदा व डावा पाय काहीसा पुढे काढून ताठ व डौलदार बसतो. व्हायोलिन खांद्यावर जिथे ठेवायचा तो भाग कसा धरायचा, व्हायोलिन कसं पकडायचं, त्याचा बो उजव्या हाताच्या अंगठय़ाने आणि तिसऱ्या चौथ्या बोटाने कसा धरायचा या साऱ्याचं एक शास्त्र आहे. ते शास्त्र येईपर्यंत त्यांनी व्हायोलिन वाजवायला शिकवलं नाही.
संगीत ही उपजत लाभणारी कला असली तरी तिची आराधना अत्यंत कष्टदायी असते, याची जाणीव बाबाजींनी दिली. माझ्या वयाच्या बाराव्या वर्षी बाबाजींनी गांधीजींच्या पुतळ्यासमोर, आता मी वादन करणार नाही, माझ्या जागी प्यारेलाल वाजवील, अशी शपथ घेतली. मी रणजित स्टुडिओत नोकरी करू लागलो. चंदुलाल शहा व गोहरबाईंना मी ‘धीरे से आजा रे’ सारखी गाणी गाऊन दाखवीत असे. तिथेच बाबाजींनी मला अ‍ॅन्थनी गोन्सालवीस यांच्या स्वाधीन केले. त्यांनी माझे व्हायोलिनवादनातले न्यून सरते करून घेतले. मी मग एकेका संगीतकाराकडे वाद्य्ो वाजवू लागलो. तो काळच भारलेला होता. खेमचंद प्रकाश, बुलो सी इरानी, एस्. महेंदर, हंसराज बहल, निसार बाज्मी, ज्ञान दत्त, सुधीर फडके यांच्यासोबत
सी. रामचंद्र, नौशादसाहेब, नय्यरसाहेब, शंकर जयकिशनजी, मदनमोहनजी असे नव्या दमाचे संगीतकार आले होते. अशा दिग्गजांकडे मी काम करू लागलो. या प्रवासातच माझी ओळख लक्ष्मीजींशी झाली. ते माझ्यापेक्षा तीन-साडेतीन वर्षांनी मोठे होते. मेंडोलिनवादक म्हणून त्यांचं नाव झालं होतं. रेडिओ क्लबमधील एका कार्यक्रमात त्यांच्या मेंडोलिनवादनानं लताजींचं लक्ष वेधून घेतलं आणि त्या लक्ष्मीजींची शिफारस करू लागल्या. त्या वेळी सुरेल कला केंद्र नावाची एक संस्था सांगीतिक कार्यक्रम करत असे. त्यात उषाताई व हृदयनाथ मंगेशकर आदी गात असत, लक्ष्मीजी मेंडोलिन वाजवत व मी संगीतसंयोजन करत असे. आमची दोघांची जोडी जमत गेली. एकदा बाबाजी सी. रामचंद्रना म्हणाले, ‘‘प्यारेलाललाही संधी द्या.’’ ते त्या वेळी दक्षिणेत ‘देवता’ चित्रपट करत होते. मला म्हणाले,‘‘संध्याकाळच्या ट्रेनने मद्रासला (त्यावेळचं) चल.’’ मला माहिती होतं, लक्ष्मीजीही आहेत. आम्ही भरपूर काम केलं. त्याचे प्रत्येकी सात हजार सातशे रुपये मिळाले. आमचा तरुण संगीतवाल्यांचा एक धमाल गट बनला. आमच्या दोघांबरोबर पंचम (आर. डी. बर्मन), गोरख, गणेश असे अनेक जण असायचे. वडापाव, मिसळपाव खात आम्ही संगीतावर चर्चा करायचो. भविष्यातील स्वप्नेही एकत्र पाहायचो. तेव्हाच लक्ष्मीजींनी मला व्हिएन्नाला जाण्यापासून रोखलं व आपण दोघं मिळून शंकर-जयकिशनसारखी संगीतकार जोडी होऊ या, असं म्हणाले. मी थांबलो. आमची साऱ्यांची मत्री घट्ट होती. त्याचे प्रत्यंतर म्हणजे, पंचमच्या ‘छोटे नवाब’ चे सहायक संगीतकार ‘लक्ष्मी-प्यारे’ होते, आमच्या चित्रपटात पंचम विविध वाद्य्ो वाजवायचा.

आम्ही पहिलं संगीत सहायकाचं काम केलं ते कल्याणजी-आनंदजी यांच्या राज कपूर अभिनीत ‘छलियाँ’साठी. सुंदर अनुभव होता तो. त्यानंतर आमची जोडी कामाला लागली. शंकर-जयकिशन व ओ. पी. नय्यर सोडून सर्वासाठी आम्ही काम केलं. त्याचं कारण त्या दोघांकडे सेबेस्टिअन नावाचे साहाय्यक होते व ते अद्भुत बारकाव्याने काम करायचे. शंकर-जयकिशन यांच्या ऑर्केस्ट्राचं आम्हाला आकर्षण होतं. आम्ही त्यांचा खूप अभ्यास केला. मी उत्तम संगीतसंयोजक होतो, लक्ष्मीजी उत्तम चाली बांधायचे. आम्ही दोघं चाली करायचो व संयोजनही करायचो. मी चाल दिलेलं गाणं कोणतं आणि लक्ष्मीजींनी चाल दिलेलं गाणं कोणतं, हे सांगता येणार नाही, इतकं ते एकजीव व्हायचं. आमचे विचार एक झालेले होते. गाणं कोणतं, ते आठवत नाही, पण आंघोळ करताना मी त्याला चाल दिली व लक्ष्मीजींकडे गेलो. त्यांनीही त्यावर काम केलं होतं; त्यांची माझी चाल एकसारखी होती. कोणी तरी आम्हाला म्हणालं, ‘तुमचं रक्तपण सारखं असेल.’ आम्ही रक्ततपासणी केली, तर आमचा रक्तगट पण एकच- ‘बी पॉझिटिव्ह! वृत्तीसारखा रक्तगट!
आमचा प्रदíशत झालेला पहिला चित्रपट म्हणजे ‘पारसमणी.’ त्याला प्रचंड यश मिळालं. नंतर ‘दोस्ती’ आला. त्याचंही संगीत छान झालं होतं. लक्ष्मीजी म्हणाले, ‘फिल्मफेअर’साठी आपल्याला नामांकन तरी मिळायला हवं.’’ त्या वेळी कसले जबरदस्त चित्रपट समोर होते. शंकर जयकिशन यांचा ‘संगम’, मदन मोहनजींचा ‘वह कौन थी’, नौशादसाहेबांचा ‘लीडर’. आम्ही काय केलं, खिशातून पंचवीस पंचवीस हजार रुपये काढले, सव्वा लाख रुपयांचं कर्ज काढलं, असे पावणेदोन लाखांचे ‘फिल्मफेअर’ विकत घेतले आणि त्यातल्या कूपनांवर संगीत विभागासाठी ‘दोस्ती’चं नाव लिहून पाठवून दिलं. आमचं नामांकन तर आलं. पण आम्ही तोकडे पडणार हे माहिती होतं. म्हणून आम्ही आमच्या कामात गढून गेलो. त्या वेळी आम्ही सांताक्रूझला एक फ्लॅट भाडय़ानं घेतलेला होता. रात्री उशिरापर्यंत आमच्या बठका चालायच्या. त्यामुळे उशिरा उठायचो. एके सकाळी नऊ वाजता फ्लॅटच्या खिडकीवर कोणी तरी जोरजोरात थाप दिली, ‘‘अरे, गाढवांनो, झोपताय काय उठा, तुम्हाला फिल्मफेअर मिळालंय.’’ ते सी. रामचंद्र होते. त्यांच्यासारखा मोठा संगीतकार आमचं कौतुक करायला घरी आला होता. फार मोठी गोष्ट होती.
त्यानंतर मात्र आमची गाडी भरधाव वेगानं धावू लागली. वर्षांला १२-१५ कधी कधी २४-२५ चित्रपट आम्ही केले. लक्ष्मीजींनी ‘पारसमणी’ बांधला, तर मी त्यांना म्हणालो, म्युझिक रूम रस्त्याच्या बाजूला हवी, त्याला लागून आपलं कार्यालय हवं.’’ त्यांनी तसंच केलं. रविवार सोडून रोज आम्ही सकाळी अकरा ते रात्री साडेदहा वाजेपर्यंत काम करायचो. चाळीस र्वष आमचा हा दिनक्रम असे. संगीताच्या वेळी फक्त संगीत, दुसरं काही नाही. त्यामुळे सुमारे सव्वासहाशे चित्रपटांचं संगीत आमच्याकडून घडलं. लोक विचारतात, ‘चाल सुचते कशी.’ काय सांगू ? तो क्षण विजेचा असतो. तो शब्दात नाही पकडता येत. पण काही वेळा बाह्य़ गोष्टी चाल सुचण्याला प्रेरक ठरतात. ‘मेरा गाव, मेरा देश’ नावाच्या चित्रपटात एक प्रसंग असा होता की धर्मेद्र, आशा पारेख यांना डाकूंनी बांधलंय व विनोद खन्ना सरदार आहे. शूटिंगसाठी या सर्वाच्या तारखा घेऊन ठेवल्या होत्या. दुसऱ्या दिवशी शूटिंग होतं आणि गाणं,चाल तयार नव्हती. अचानक, त्या चित्रपटातला एक संवाद, लक्ष्मीजींना प्रेरणा देऊन गेला, ‘मार दिया जाय, के छोड दिया जाय’ पुढची ओळ त्यांना सुचली, ‘बोल, तेरे साथ क्या सुलुख किया जाय.’ त्यापुढच्या ओळी लिहिल्या गेल्या, चाल झाली व गाणं रेकॉर्डही झालं! त्यानंतर अशी अनेक गाणी बनत गेली. अर्थात, हे काही महान गाणं नाही, पण लोकप्रिय नक्की आहे. आम्हाला नावीन्याची आवड आहे. आम्हाला पुनरावृत्ती आवडत नाही. आम्ही, ‘आन मिलो सजना’ मध्ये संवादगीत (अच्छा, तो हम चलते है) आणलं, त्यानंतर तसा ट्रेण्ड सुरू झाला. आम्ही गाण्यात प्रारंभीच्या सुरावटीनंतर, असा एखादा नवा दिलखेचक तुकडा देण्याचा प्रयत्न करतो की, तो लोकांच्या तोंडी त्या गाण्याबरोबरचा अविभाज्य घटक बनेल. ‘परदा है परदा’ ही कव्वाली किंवा ‘हाय हाय ये मजबुरी’ हे गाणं ऐका. ‘परदा है’ च्या मुखडय़ानंतर लगेच क्लेरोनेट व व्हायोलिनचा असा काही तुकडा बनला की तो गुणगुणलाच जातो. ‘हाय हाय ये मजबुरी’च्या मुखडय़ानंतर बासरीचा तुकडा डोक्यात ‘टँ ड्याण टँ’ असा येतोच. आम्ही जेव्हा आमच्या म्युझिक रूममध्ये विचार करत असू, तेव्हा या साऱ्या गोष्टींचा विचार सतत चालू असायचा.
‘शागीर्द’च्या ‘वो है जरा, खफा खफा’ या गाण्याच्या वेळी सकाळी अकरा वाजता ठरल्याप्रमाणे रफीसाहेब, लताजी, म्युझिशियन सारे पोचले. पण लक्ष्मीजी मात्र आले नव्हते. आम्ही त्यांची वाट पाहत होतो. अडीचच्या सुमारास ते पोचले. आल्या आल्या म्हणाले, ‘‘सकाळी निघता निघता, आमची कामवाली बाई आली. तिच्या बोलण्याला छान हेल होता. काम करता करता ती बडबडत होती, आता मी काय करू? अय्या, आता मी काय करू? मी तिचं बोलणं ऐकत होतो. तिचं ऐकून, माझ्या मनात कल्पना आली, तिच्या त्या हेलावर आधारित रचना करू या. बघा कशी वाटते?’’ त्यांनी शब्द लिहून आणले होते, ‘दिलविल प्यार व्यार, मैं का जानू रे.. अय्या.’ ती ओळ त्यांनी गाऊन दाखवली, लताजींनाही ती आवडली. त्याच्यावर ‘अय्या’ म्हणत त्या छान गायल्याही. तेही गाणं हिट झालं.
आम्ही नेहमी आमच्याच अटींवर काम केलं. दुसऱ्या कोणी चाल आणून दिली व आम्ही ती केली असं झालं नाही. ‘बॉबी’च्या वेळी राज कपूरजी खिशात एक चाल घेऊन आले होते. त्यांना संगीताचं अद्भुत ज्ञान होतं. लक्ष्मीजी काही बोलू शकले नाहीत. पण मी स्पष्टपणे राजजींना सांगितलं की, ‘‘आम्ही अशा प्रकारे संगीत करू शकत नाही.’’ ते रागावले नाहीत, खूश झाले. आम्ही त्यांना म्हणालो की, ‘‘आज तुम्ही आमच्याकडे आलात, पुढच्या वेळी आम्ही तुमच्याकडे आमची चाल घेऊन येऊ.’’ काही दिवसांनी आम्ही, त्यांच्याकडे चाल घेऊन गेलो. पहिल्या चालीलाच त्यांनी मान्यता दिली. ते गाणं होतं, ‘‘ मैं शायर तो नहीं.’’ खिशातून त्यांनी सोन्याचं नाणं काढलं व आम्हाला भेट दिलं. त्यांना चाल पहिल्या फटक्यात पसंत पडे. तर, एल्. व्ही. प्रसादना पाच पाच चाली ऐकवायला लागत व शेवटी ते म्हणत, सर्व छान आहेत. तुम्हाला हवी ती ठेवा. आम्ही निर्माता-दिग्दर्शकाला आमच्या कामात ढवळाढवळ करू देत नाही. त्यांचं मत महत्त्वाचं मानतो, पण अंतिम शब्द आमचाच असायला हवा. पण काही वेळा, काही मित्रांचं ऐकावं लागतं. बच्चनसाहेबांनी ‘हम’च्या वेळी एक चाल आणून दिली व म्हणाले, ‘‘या चालीवर एक गाणं करा.’’ त्या वेळी आम्ही ‘जुम्मा चुम्मा’ हे गाणं केलं. तसे प्रसंग फारसे आले नाहीत व ते येऊही दिले नाहीत. कलाकाराचं सार्वभौम स्वातंत्र्य जपलंच पाहिजे. आम्ही अनुकरणही कोणाचं केलं नाही. शंकर-जयकिशन आमचे आदर्श होते, पण त्यांची छाया आमच्या संगीतावर नाही.
राजजींच्या ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ची गाणी उत्तम बनली होती. त्याच्या शीर्षक गीतामध्ये आम्ही १५०हून अधिक वादक वापरले होते. ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’च्या रेकॉìडगच्यावेळी ताडदेवच्या मिनू कात्रक स्टुडिओत बाहेपर्यंत वादक बसले होते. आम्ही पडदे लावले होते. सकाळी ९ ते रात्री ११ पर्यंत रेकॉìडग सुरू होतं. त्यात वापरलेल्या घंटा या ‘नवरंग’मध्ये व्ही. शांतारामजींनी वापरलेल्या घंटा होत्या, त्या मी स्वत: जाऊन आणल्या होत्या. त्या उंच स्टुलावर लोखंडी कांबीला अडकवलेल्या स्टीलच्या हातोडीने दोन वादकांनी दोन बाजूला उभं राहून एकाच वेळी वाजवल्या होत्या. हा प्रचंड वाद्यमेळ, मी, लक्ष्मीजी, गोरख, शाम, दिलीपभाई अशा आम्ही पाच जणांनी संयोजित केलेला. तरीही ते गीत अप्रतिमरीत्या गाताना ऱ्हिद्म गटाला लताजींनी, स्वत: हाताने सूचना देत सांभाळलं होतं. त्या गीताची प्रक्रिया विसरणे अशक्य.
तर ‘जब भी जी चाहें’ हे गीत साहीर लुधियानवींनी तयार हातात ठेवलं व चाल करायला सांगितली. त्या शायरीतली सामाजिकता व अर्थ समजून घेऊन आम्ही त्याची रचना जरा वरच्या पट्टीत केली. लताजीही गाताना तीक्ष्ण स्वरात गायल्या. लताजी, रफीसाहेब, आशाताई, किशोरदा, मन्नादा यांच्यासारखे अव्वल कलाकार आमच्या गीतांसाठी आम्हाला लाभले, हा भाग्ययोग. हे सारे सर्वार्थाने आमच्यापेक्षा श्रेष्ठ होते, पण त्यांचा चांगुलपणा एवढा की चाल समजून घेतानाही, त्यांनी त्यांचं मोठेपण आम्हाला कधी जाणवू दिलं नाही.

आमच्या ‘कर्ज’चं संगीत वेगळं होतं. रफीसाहेबांना ‘दर्द ए दिल’ गायचं होतं. ते छान हळवं गाणं त्यांनी समजून घेतलं व मुखडा संपताना नेहमीच्या तबला, ढोलकीऐवजी त्यांना ड्रमचा बीट ऐकू आला. ते थांबलेच. लक्ष्मीजींना त्यांनी विचारले, ‘‘हे काय आहे.’’ आम्ही त्यांची समजूत काढली. त्यांनी आमची बाजू समजून घेतली. तालीम करून झाल्यावर, प्रत्यक्ष ध्वनिमुद्रण झाल्यावर, त्या प्रयोगासाठी त्यांनी शाबासकी दिली. याच चित्रपटाची श्रेयनामावली येताना आम्ही किशोरदांच्या आवाजात ‘पैसा यह पसा’ हे गाणं केलं. त्याची रचना लक्षपूर्वक ऐका, तीन धून एकत्र गायल्याशिवाय त्याचा मुखडा बनत नाही. हा एक वेगळा प्रयोग विचारपूर्वक केला होता. आमच्या कव्वाल्यांनाही लोकप्रियता लाभली. त्याच्यामागचं एक सूत्र आज पहिल्यांदा उलगडतो. आम्ही नेहमी मुख्य गायकासोबत प्रत्यक्ष कव्वाली गाणारे कव्वाल व कव्वालीत प्रत्यक्ष बुलबुलतरंग, क्लेरोनेट, मेंडोलिन वाजवणारे वादक दिले. त्यामुळे, त्याची श्रवणीयता वाढली. ‘सूरसंगम’च्या वेळी आम्ही राजन साजन मिश्रांना गायनासाठी निमंत्रण दिलं. शास्त्रीय संगीत गाणाऱ्या गायकांना चित्रपटाचा बंदिस्त अवकाश आवडत नाही, पण ‘सूरसंगम’मध्ये ते जमून गेलं. प्रत्येक गायकाची स्वतंत्र शैली असते. ती शैली डोळ्यांसमोर ठेवून गाणी बांधावी लागतात. मन्नादांना दिलेली गाणी बघा, ‘शाम ढले जमुना किनारे’ किंवा ‘दर्पन, झूठ ना बोले’ ही गाणी आठवा. त्यांनी त्या गाण्यांचं सोनं केलंय. किशोरदा हे तसं विनोदी रसायन मानलं जातं, पण त्यांच्या मनात कारुण्याचा झरा होता. तो ओळखून आम्ही त्यांना ‘मेरे मेहबूब कयामत होगी’ किंवा ‘मेरे नसीब में ऐ दोस्त’सारखी गाणी दिली व त्यांतून त्यांच्या अंतरीचं दु:ख बाहेर आलं.
आमच्याकडे वाद्य्ो वाजवणारी उत्तम कलाकार मंडळी असत. ते सगळीकडे आपापली वाद्य्ो वाजवत. पण आमच्याकडे जेव्हा ते वाजवतील तेव्हा, त्याचा नाद वेगळा यायला हवा, याची आम्ही काळजी घेत असू. इतरांच्याकडे वाजणारा दाया-बाया (तालवाद्याच्या दोन बाजू) हा आमच्याकडे आमच्याचसारखा वाजायला हवा. आमच्या कोणत्याही गाण्यात तीन ढोलक व तीन तबले ऐकू येतील. त्यापकी दोन पुढे व एक मागे असे. त्यांचा तालमेळ जमणं महत्त्वाचं असे. ‘मोरा नादान बालमा’ ऐका. त्यात अब्दुल करीमसाहेबांनी काय अप्रतिम ढोलक वाजवलाय. त्यांची थाप, लताजींच्या सुरात आपसूक मिसळून जाते. काही वेळा आम्ही २८ जणांचा ऱ्हिदम वापरलाय. ‘बडम दुख दिना’ या गाण्यात आम्ही तो वापरलाय. ‘सरगम’मधल्या ‘डफलीवाले’ गाण्यात एका वेळी १८ डफ वाजले गेले आहेत. पण त्यांचा नाद एकच येतो. संगीतकाराचं आणि ध्वनिमुद्रणकाराचं ते कौशल्य. माझे कान तर आता एवढे तयार झाले आहेत की, प्रचंड वाद्यमेळातून चुकणारा हात मला कळतोच. त्याला मी त्याक्षणी ओरडतो, पण नंतर त्याची समजूतही काढतो.
‘हिरो’मधली बासरी धून किती गाजली. पण ती धून बनतच नव्हती. मी पियानोवर बांधायचा प्रयत्न करत होतो. तेवढय़ात समोरून पान खात खात हरीजी आले. मी त्यांना त्यांची बासरी काढायला लावली आणि अध्र्या तासात ती अवीट धून बनलीसुद्धा. आम्ही ‘संत ज्ञानेश्वर’ चित्रपटाचं संगीत करत होतो. त्या वेळी प्रत्यक्ष माऊलींच्या समाधीचं दर्शन घ्यायला गेलो होतो. गोरख, लक्ष्मीजी, भरत व्यास असे सारे थेट दर्शन घेऊन आले, पण मी रांगेत उभा राहिलो. सोबत शिर्के, लाड असे वादकसोबतीही होते. रांगेतून जाताना तिथे असलेल्या जाळीपलीकडे काही स्त्रिया जात्यावर धान्य दळत होत्या व सुंदर आवाजात ओव्या गात होत्या. त्यांचं नोटेशन मी करून घेतलं. दर्शन घेऊन आल्यावर ते नोटेशन मी लक्ष्मीजींकडे दिलं. त्यांना म्हटलं, ‘‘माऊलींनी प्रसादच दिलाय, यावर काही तरी करू या.’’ त्यांना लगेच चाल स्फुरली, ती त्यांनी भरत व्यासजींकडे दिली. भरतजींनी दुसऱ्या दिवशी पहाटे गाणं लिहून दिलं, ‘ज्योत से ज्योत जगाते चलो’.
आम्ही स्वराला स्वर जोडत गेलो, त्यातून आमचा छोटासा संगीतप्रवाह जन्माला आला. संगीत हा आमचा ईश्वर आहे. वयाच्या ७६व्या वर्षीही नवं काही तरी करण्याची इच्छा आहे. एका आंतरराष्ट्रीय समूहासाठी मी ‘इंडियन समर’ नावाचं एक अंतरातल्या संगीतात्म्याला आवाहन करणारं पुस्तक लिहिलंय. नवीन सिंफनी बांधतोय. लक्ष्मीजी देहरूपाने गेले त्याला आता १८ वष्रे लोटली. पण ते माझ्या मनात असतात. त्यांच्याशी मनसंवाद सुरू असतो. सतत वाटत राहतं, आता कुठूनही लक्ष्मीजी येतील, खांद्यावर हात टाकून म्हणतील, ‘चल प्यारे, कुछ नया कर लेते हैं।’

शब्दांकन प्रा. नितीन आरेकर
nitinarekar@gmail.com
(कृतज्ञता डॉ. मृदुला दाढे-जोशी, श्रीराम जोशी)

Story img Loader