भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी गांधीनगर मतदरासंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरण्याआधी अमित शाह यांनी शक्तीप्रदर्शन केलं. विजय संकल्प सभेच्या माध्यमातून अमित शाह लोकांशी संवाद साधला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अमित शाह यांनी सभेला सुरुवात केली. या सभेला एनडीए घटकपक्षांचे सर्व नेते उपस्थित होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील हजेरी लावली. त्यानंतर चार किमीचा भव्य रोड शो करण्यात आला.

नरेंद्र मोदींच्या हातीच देश सुरक्षित राहू शकतो – अमित शाह

‘आता आमची मने जुळली आहेत’, अमित शाह यांच्या प्रचारसभेत उद्धव ठाकरेंची हजेरी

दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी झालेली एक घटना सध्या चर्चेत आहे. अमित शाह यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपल्या नातीला उचलून घेतलं. त्यांच्या नातीने पांढऱ्या रंगाची टोपी घातली होती. अमित शाह यांनी तिची टोपी काढून भाजपाची टोपी घालण्याचा प्रयत्न केला. पण नातीने ती टोपी घालण्यास नकार दिला. अमित शाह यांनी वारंवार प्रयत्न करुनही ती टोपी घालत नव्हती. शेवटी आपली पांढरी टोपीच तिने घातली. विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही हा व्हिडीओ ट्विट केला आहे.

अमित शाह यांनी उमेदवारी अर्ज भरला त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांच्यासह शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेही हजर होते. अमित शाह गांधीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. गांधीनगर हा भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचा मतदारसंघ असून यावेळी अमित शाह यांना येथून उमेदवारी देण्यात आली आहे.
यावेळी बोलताना अमित शाह यांनी देशाचं नेतृत्व कोण करणार या एकाच मुद्द्यावर ही निवडणूक लढली जाणार असल्याचं सांगितलं. संपूर्ण देशभरातून फक्त नरेंद्र मोदींचंच नाव ऐकू येतं असून पाच वर्षात इतका विश्वास कसा काय निर्माण झाला ? ७० वर्ष देश ज्या नेतृत्वाची वाट पाहत होता ते नेतृत्व नरेंद्र मोदींच्या रुपात मिळालं आहे असं अमित शाह यांनी म्हटलं.

अमित शाह यांनी यावेळी मतदारांना गुजरातला संपूर्ण 26 जागा जिंकून देण्याचं आवाहन केलं. पूर्ण बहुमताच्या सरकारचा संकल्प करा असंही त्यांनी सांगितलं. अमित शाह यांनी एअर स्ट्राइक, सर्जिकल स्ट्राइकचा उल्लेख करत सांगितलं की, ‘देशासमोर आज प्रश्न आहे की देशाला सुरक्षा कोण देऊ शकतं…देशाला सुरक्षा एकच व्यक्ती, एकच पक्ष देऊ शकतो ते म्हणजे नरेंद्र मोदी, भाजपा आणि एनडीएचं सरकार’.

Story img Loader