देशभरामध्ये चर्चेत असणाऱ्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा बंगालच्या जनतेने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे. पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जीच मुख्यमंत्री पदी विराजमान होणार हे आता जवळजवळ निश्चित झालं आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ममता यांना निवडणुकीतील विजयासाठी शुभेच्छा दिल्यात.
ममता बॅनर्जींना गुलाबांचा गुच्छ देतानाचा स्वत:चा जुना फोटो पोस्ट करत राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा उल्लेख असणाऱ्या काही ओळी लिहीत ममतांचं अभिनंदन केलं आहे. ” पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये मिळवलेल्या लक्षणीय यशसाठी ममता बॅनर्जीचं अत्यंत मनापासून अभिनंदन. संघर्ष हा तुमच्या राजकारणाचा स्थायीभाव राहिला आहे आणि या निवडणुकीत संघर्षाची परिसीमा गाठत तुम्ही हे नेत्रदीपक यश मिळवलं. कलासक्त वृत्ती आणि सामाजिक सुधारणांची खूप मोठी परंपरा या बाबतीत महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल यांच्यात खूपच समानता आहे, आणि त्यामुळेच राज्यांची स्वायत्तता आणि प्रांतिक अस्मिता यांचं महत्व तुम्ही नक्कीच समजू शकता. राज्यांच्या स्वायत्ततेसाठीचा आग्रही आवाज तुम्ही बनाल आणि सर्वसामावेशक भूमिका घेत पश्चिम बंगालचा विकास साधाल अशी आशा मी व्यक्त करतो,” असं राज यांनी म्हटलं आहे. तसेच या पोस्टमध्ये त्यांनी, “तुम्हाला मिळालेल्या यशासाठी मी तुमचं आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं मनापासून अभिनंदन करतो”, असंही म्हटलं आहे.
#BengalElections2021 #MamtaBanerjee #Didi @MamataOfficial @AITCofficial pic.twitter.com/RKWBoSAClM
— Raj Thackeray (@RajThackeray) May 2, 2021
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अखेर नंदीग्राम मतदारसंघातून विजय मिळवला आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये पिछाडीवर असल्याने ममता बॅनर्जींचा पराभव होण्याची शंका निर्माण झाली होती. पण नंतर ममता बॅनर्जी यांनी जोरदार मुसंडी मारली आणि भाजपाचे सुवेंदू अधिकारी यांचा १२०० मतांनी पराभव केला.
दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व जागांचे कल हाती आले आहेत. सध्या सत्तेत असणाऱ्या ममता बॅनर्जींच्या तृणमूलला स्पष्ट बहुमत मिळतानाचे चित्र दिसत आहे. तृणमूल काँग्रेसने १९४ जागांवर आघाडी घेतली असून भाजपा मात्र १०० च्या आतच रोखली जाण्याची शक्यता आहे. भाजपा ९३ जागांवर आघाडीवर आहे. याच पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी भाजपाचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र पक्षाचा पराभव झाल्यास प्रदेशाध्यक्ष म्हणून ती आपली जबाबदारी असेल असं म्हटलं आहे.