भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात उभे राहणार असल्याची घोषणा केली आहे. महाआघाडी मोदींविरोधात आव्हान उभा करू शकत नाही म्हणून मी उभा राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना त्यांनी म्हटले. भीम आर्मीने शनिवारी वाराणसीतून एक मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीत आझाद हे स्वत: सहभागी होणार असल्याचे भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन यांनी सांगितले.

आझाद म्हणाले, मी शनिवारी वाराणसी दौऱ्यासाठी जिल्हा प्रशासनाची परवानगी मागितली आहे. मी या मतदारसंघातून निवडणूक लढत असून माझ्या प्रचाराची सुरूवात म्हणून याकडे पाहिले जाऊ शकते. आम्ही एका धार्मिक स्थळावरून सुरूवात करणार होतो. त्यासाठी आम्ही वाराणसीतील रविदास मंदिराची निवड केली आहे. आम्ही दुचाकीवर रविदास गेटपर्यंत म्हणजे सुमारे ७ किमी जाणार आहोत.

मी एक अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीला उभा राहणार आहे. देशाला दुबळा करणारा व्यक्ती उत्तर प्रदेशमधून जिंकावा असे मला वाटत नाही. मी पूर्वीच स्पष्ट केले आहे की, मायावती, अखिलेश यादव आणि मुलायमसिंह यादव हे जर या मतदारसंघातून निवडणूक लढू इच्छित नसतील तर मी वाराणसीतून उभा राहीन. मोदींविरोधात एक सशक्त उमेदवार उभा राहणे आवश्यक होते. पण तसे दिसत नव्हते. मी मोदींना सहज जिंकू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.