पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासहीत केंद्रातील अनेक मंत्र्यांच्या निवडणूक प्रचारानंतरही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाला विजय मिळवून दिला आहे. पश्चिम बंगालमध्ये सलग तिसऱ्यांना ममतांच्या नेतृत्वाखाली तृणमूलने विधानसभा निवडणूक जिंकल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत तृणमूल काँग्रेसने विजयासाठी आवश्यक असणारा बहुमताचा आकडा गाठलाय. तर भाजपाची घौडदौड १०० जागांच्या आतच राहणार असल्याचं स्पष्ट होत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कडवे टीकाकार आणि माजी केंद्रीय मंत्री तसेच सध्या तृणमूल काँग्रेसचे उपाध्यक्ष असणाऱ्या यशवंत सिन्हा यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालमधील पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि अमित शाह यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी सिन्हा यांनी केलीय.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, पश्चिम बंगालमध्ये भाजापचा पराभव निश्चित झाल्यानंतर सिन्हा यांनी हा निकाल दुरोगामी परिणाम करणार असेल असं म्हटलं आहे. या निकालाचा परिणाम उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकांवरही होणार असल्याचं भाकीत सिन्हा यांनी व्यक्त केलं आहे.

१३ मार्च २०२१ रोजी, कोलकाता येथे तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतरही सिन्हा यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका केली होती. या दोघांमुळेच लोकशाही धोक्यात आली आहे. म्हणून मोदी सरकार २०२४ मध्ये पराभूत झाले तरच देश वाचेल, अशी टीका सिन्हा यांनी केली होती. ‘‘मोदी सरकारला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत करायचे असेल तर पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक महत्त्वाची आहे. या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला बहुमत मिळणे आवश्यक आहे,’ असंही सिन्हा यांनी स्पष्ट केलं होतं.’

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात अर्थमंत्री असलेल्या यशवंत सिन्हा यांनी पक्षनेतृत्वाशी मतभेद झाल्याने २०१८ मध्ये भाजपला राम राम ठोकला होता. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात सिन्हा एक वजनदार नेते होते. त्यांचे पुत्र जयंत सिन्हा हे भाजपचे झारखंडमधील हजारीबाग येथील खासदार आहेत.