पंजाबमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक प्रचारसभेत बोलताना आज(रविवार) काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आम आदमी पार्टीवर निशाणा साधला. “आम आदमी पार्टीचा उदय राष्ट्रीय स्वयंसेवक संघातूनच झाला आहे.” असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.
पंजाबमधील कोटकपुरा येथे ‘नवी सोच नवा पंजाब’ या रॅलीत प्रियंका गांधी बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या की, “अरविंद केजरीवाल यांचे नेतृत्व असलेली आम आदमी पार्टी ही आरएसएस मधूनच निघालेली आहे. आम आदमी पार्टीने दिल्लीत शैक्षणिक आणि आरोग्य संस्थांच्या नावावर काहीच केलेले नाही. राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांबद्दल सत्य जाणून घेणे महत्वाचे आहे.”
तसेच,“आमचे येथे(पंजाब) पाच वर्षांपासून सरकार आहे. हे खरे आहे की, मागील सरकारमध्ये काही उणिवा होत्या. कारण अनेक नेते मध्येच भटकले.” तर, माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे नाव न घेता त्यांनी निशाणा साधतत म्हटले की, “पंजाबमधून आधीचे काँग्रेसचे सरकार चालणे बंद झाले होते. त्या सरकारचे संपूर्ण नियंत्रण दिल्लीतून होत होते. दिल्लीत पंजाब सरकारचे नियंत्रण काँग्रेस नाही तर भाजप करत होती.” असंही यावेळी प्रियंका गांधी यांनी म्हटलं.
छुपी युती सर्वांसमोर आली –
या वेळी प्रियंका गांधी म्हणाल्या की, ती जी लपलेली युती होती ती सर्वांसमोर आली, त्यामुळे आम्हाला सरकार बदलावं लागलं आणि आम्हाला चरणजीत सिंह यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घ्यावा लागला.