आम आदमी पक्षाने आज रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘आप’चे रामराज्य’ हे संकेतस्थळ लाँच केले आहे. या संकेतस्थळावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची १० तत्त्वे दिले आहेत. दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाच्या सरकारने मागील ९ वर्षामध्ये केलेल्या कामाचा तपशील आणि पंजाबमध्ये दोन वर्षात केलेल्या कामाचा तपशील या संकेतस्थळावर देण्यात आला आहे.
‘आप’चे रामराज्य’ (aapkaramrajya) या संकेतस्थळाचे उद्घाटन करताना आप नेते संजय सिंह म्हणाले, “अरविंद केजरीवाल यांच्या रामराज्याच्या संकल्पनेमध्ये लहान-मोठा अशा पद्धतीचा कोणताही भेदभाव नाही. फक्त आणि फक्त जनहिताची कामे करण्याचा विचार आहे. आज अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आप सरकार करत असलेल्या कामाची दखल संपूर्ण जग घेत आहे.”
हेही वाचा : नरेंद्र मोदींची पोस्ट चर्चेत! “अपयशाने खचून जायचं नसतं, भारतात संधींची कमतरता नाही”
“अरविंद केजरीवाल यांनी अद्भुत असे काम केले आहे. आज पहिली अशी रामनवमी आहे की, या रामनवमीला अरविंद केजरीवाल आमच्यासोबत नाहीत. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या १० वर्षात आम्ही दिल्लीमध्ये नाही तर पंजाबमध्येही सरकार स्थापन केले. असे कार्य केले आहे की, त्याचे उदाहरण म्हणून संपूर्ण जग पाहत आहे. अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने बांधलेली शाळा पाहण्यासाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी येतात”, असे संजय सिंह म्हणाले.
जाहीरनाम्यात रामराज्याची झलक दिसणार का?
आम आदमी पक्षाच्या जाहीरनाम्यात रामराज्याची झलक दिसणार का? यावर संजय सिंह म्हणाले, “फक्त जाहीरनाम्यात नाही तर ९ वर्षांच्या कामात झलक दिसते आहे”, असे ते म्हणाले. यावर मंत्री आतिशी म्हणाल्या, “भाजपाचा जाहीरनामा बघा म्हणजे तुम्हाला फरक जाणवेल. कारण भाजपाची आश्वासने जाहीरनाम्यातून गायब झाली आहेत. मात्र, दुसरीकडे केजरीवाल आहेत, ते कामाचा तपशील संपूर्ण दिल्लीकरांसमोर मांडत आहेत.”