मागील काही दिवसांपासून आम आदमी पार्टीचे अनेक नेते गुजरातमध्ये तळ ठोकून बसले आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘आप’कडून जोरदार प्रचार केला जात आहे. आज अखेर आम आदमी पार्टीने गुजरामधील मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित केला आहे. माजी पत्रकार इसुदान गढवी हे आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आज इसुदान गढवी यांच्या नावाची घोषणा केली.
नेमकी निवड कशी झाली?
गुजरातचा मुख्यमंत्री कोण असावा? यासाठी आम आदमी पार्टीने एक सर्वेक्षण घेतलं होतं. यामध्ये जवळपास १६ लाख ४८ हजार ५०० लोकांनी सहभाग घेतला. यातील ७३ टक्के लोकांनी इसुदान गढवी हे मुख्यमंत्री असावेत, अशी इच्छा व्यक्त केली. त्यानुसार आज इसुदान गढवी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. याआधी पंजाबचा मुख्यमंत्री कोण असावा? यासाठीही ‘आप’ने अशाच प्रकारचं सर्वेक्षण केलं होतं.
इसुदान गढवी यांनी गेल्यावर्षी जूनमध्ये पत्रकारिकतेला रामराम ठोकला होता. त्यानंतर त्यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. गुजरात ‘आप’चे प्रमुख गोपाल इटालिया हेही मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीसाठी शर्यतीत होते. मात्र, ७३ टक्के मतं इसुदान गढवी यांनी मिळाली आहेत. त्यानुसार जनतेचा कौल विचारात घेऊन गढवी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीसाठी घोषणा झाल्यानंतर गढवी यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली. “माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीवर विश्वास ठेवून एवढी मोठी जबाबदारी दिली, त्यासाठी आम आदमी पार्टी, अरविंद केजरीवाल आणि विशेषत: गुजरातमधील जनतेचं मन:पूर्वक धन्यवाद देतो. मी सदैव लोकांचा सेवक बनून लोकहिताची कामं करत राहील.”