पंजाबमध्ये आम आदमी पक्षानं काँग्रेस आणि भाजपाला चारीमुंड्या चित करत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. त्यामुळे आता आपचे उमेदवार भगवंत मान हे पंजाबचे पुढील मुख्यमंत्री होतील, यावर शिक्कामोर्तब झालं आहे. अनेक मोठी नावं आजच्या निकालानंतर पराभूतांच्या यादीत समाविष्ट झाली आहेत. त्यामध्ये खुद्द मुख्यमंत्र्यांपासून ते भाजपा, बादल गट, अकाली दलापर्यंत सर्वच उमेदवार आहेत. या पार्श्वभूमीवर विजयानंतर भाषण करताना आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी आपच्या पुढील वाटचालीविषयी संकेत दिले आहेत.
“पंजाबच्या लोकांनी कमाल केली”
पंजाबच्या लोकांशी संवाद साधताना अरविंद केजरीवाल यांनी पंजाबी जनतेचे आभार मानले आहेत. “पंजाबच्या लोकांनी कमाल करून टाकली. आज पंजाबचे निकाल ही खूप मोठी क्रांती आहे. फार मोठमोठ्या खुर्च्या हलल्या आहेत पंजाबमधल्या. सुखबीरसिंग बादल हरले, कॅप्टन साहेब हरले, चन्नी साहेब हरले, प्रकाशसिंग बादल हरले, नवज्योत सिंग सिद्धू हरले, विक्रमसिंग मजिठिया हरले. भगतसिंगांनी एकदा म्हटलं होतं की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जर आपण व्यवस्था नाही बदलली, तर काहीही होणार नाही. दु:खाची बाब अशी की गेल्या ७५ वर्षांपासून या पक्षांनी आणि नेत्यांनी इंग्रजांचीच व्यवस्था ठेवली. देशाला लुटत होते. लोकांना जाणून-बुजून गरीब ठेवलं. ‘आप’नं गेल्या ७ वर्षांत ही व्यवस्था बदलली आहे. आम्ही इमानदार राजकारणाची सुरुवात केली आहे”, असं केजरीवाल म्हणाले.
“पंजाबमध्ये मोठमोठी कट-कारस्थानं केली गेली”
अरविंद केजरीवाल यांनी यावेळी विरोधकांवर देखील निशाणा साधला. “हे सगळे लोक मिळून देशाला पुढे जाण्यापासून रोखत आहेत. आपण तर या सगळ्यांसमोर फार छोटे आहोत. पंजाबमध्ये मोठमोठे कट केले गेले. रोज ऐकत होतो. सगळे आपविरोधात एकत्र आले. त्यांचा एकच हेतू होता, आप सत्तेत यायला नको. बाकी कुठलाही पक्ष चालेल. शेवटी हे सगळे एकत्र होऊन म्हणाले केजरीवाल दहशतवादी आहे. आज या निकालांच्या माध्यमातून देशाच्या जनतेनं सांगून टाकलं, केजरीवाल दहशतवादी नाही”, असं केजरीवाल यावेळी म्हणाले.
“आता असा भारत बनवायचाय, जिथे…”
दरम्यान, यावेळी केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाच्या पुढच्या वाटचालीविषयी भाष्य केलं आहे. “आज आपण सगळे नवा भारत बनवण्याचा संकल्प करुयात. जिथे द्वेषाला जागा नसेल, जिथे कुणी उपाशीपोटी झोपणार नाही, महिला सुरक्षित असतील, सगळ्यांना चांगलं शिक्षण मिळेल. आपण असा भारत बनवू, जिथून आपल्या मुलांना युक्रेनला जावं लागणार नाही. जे लोक मला टीव्हीवर बघत आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो, तुम्ही सगळ्यांनी आम आदमी पक्षात या. आधी दिल्लीत क्रांती झाली, आता पंजाबमध्ये क्रांती झाली, आता ही क्रांती पूर्ण देशात पसरेल”, असा निर्धार यावेळी केजरीवाल यांनी बोलून दाखवला.