नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. असाच एक धक्कादायक निकाल जालना लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळाला. गेल्या २५ वर्षांपासून जालन्याचं नेतृत्व करणारे रावसाहेब दानवे षटकार ठोकू शकले नाहीत. काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांनी जालन्यात रावसाहेब दानवे यांचा पराभव केला. कल्याण काळे यांना ६ लाख ७ हजार मतं मिळाली तर दानवे यांना ४ लाख ९७ हजार मतं मिळाली. काळे यांनी १ लाख १० हजार मतांनी दानवे यांचा पराभव केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनोज जरांगे पाटील यांनी ज्या आंतरवाली सराटी गावातून मराठा आरक्षणासाठीच्या राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात केली ते गाव याच मतदारसंघात येतं. या मतदारसंघात अपक्ष उमेदवार आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनातील कार्यकर्ते मंगेश साबळे यांनी तब्बल १ लाख ५५ हजार मतं मिळवली. मराठा मतदारांनी त्यांची मतं साबळेंच्या झोळीत टाकली, परिणामी भाजपाचं नुकसान झाल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. या लोकसभा मतदारसंघातील सिल्लोड आणि पैठण हे दोन विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटाच्या ताब्यात आहेत. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी दानवेंसाठी पुरेसा प्रचार केला नसल्याचं सांगितलं जात आहे. ही गोष्ट सिल्लोडचे विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांनीदेखील मान्य केली आहे.

अब्दुल सत्तार यांनी आज नवनिर्वाचित खासदार अब्दुल सत्तार यांची भेट घेतली. दोघेही हसतमुखाने एकमेकांशी गप्पा मारत होते. तसेच दोघांनी मिळून प्रसारमाध्यमांशी देखील बातचीत केली. यावेळी अब्दुल सत्तार यांना विचारण्यात आलं की, तुमचे उमेदवार (रावसाहेब दानवे) पराभूत झाले आहेत. तुम्ही विरोधकांच्या उमेदवाराबरोबर गप्पागोष्टी करताय, हसताय, याचं कारण काय? यावर सत्तार म्हणाले, “मैं बेहद, बेवजह हसते रहता हूँ, ऐसा हसता हूँ के आधे दुश्मनो कों ऐसेही मारता हूं.”

हे ही वाचा >> “भाजपात सारं काही आलबेल नाही”, लोकसभेच्या निकालानंतर केंद्रीय मंत्र्याने दाखवला आरसा; अपयशाचं कारण सांगत म्हणाले…

अब्दुल सत्तार म्हणाले, “मी माझ्या पूर्ण ताकदीने रावसाहेब दानवे यांचा प्रचार केला. त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, जनतेच्या मनात काहीतरी वेगळं होतं आणि आमच्या काही कार्यकर्त्यांच्या मनात देखील काहीतरी वेगळं होतं, ही गोष्ट आज मी सर्वांसमोर कबूल करतो. आमच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या होत्या. मी २०१९ सालच्या निवडणुकीच्या परिणामांबद्दल बोलतोय. मी रावसाहेब दानवे यांना निवडून आणण्यासाठी युतीचा धर्म पाळला. त्यांच्या प्रचारासाठी मी एकट्याने १७ सभा घेतल्या. मी जनतेला विनंती केली की रावसाहेब दानवे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. परंतु, लोकांची मानसिकता मात्र कल्याण काळे यांच्याबरोबर होती. त्यांनी मतांच्या रूपात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मतदारांनी आपली मतं कल्याण काळे यांच्या झोळीत टाकली आहेत. तुम्ही वृत्तवाहिन्यांनी जे निवडणुकांचे एक्झिट पोल दाखवले, त्यामध्ये दानवे विजयी होतील असं सांगितलं होतं. मात्र जनता जनार्दनाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. त्यांनी कल्याण काळे यांना निवडलं.”

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abdul sattar admits shiv sena shinde faction few workers did not campaign for raosaheb danve asc
Show comments