जालना लोकसभा मतदारसंघात महायुतीचे (भाजपा) उमेदवार रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला आहे. सलग पाच वेळा जालन्याचे खासदार राहिलेले दानवे विजयी षटकार ठोकू शकले नाहीत. महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे (काँग्रेस) यांनी जालन्यात रावसाहेब दानवे यांचा १ लाख १० हजार मतांनी पराभव केला आहे. जालन्याच्या लोकसभा निवडणुकीत कल्याण काळे यांना ६ लाख ७ हजार मतं मिळाली तर दानवे यांना ४ लाख ९७ हजार मतं मिळाली आहेत. या लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा क्षेत्र येतात. यापैकी तीन मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात आहेत. तर दोन मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार आहेत. केवळ जालना विधानसभेत काँग्रेसचे कैलास गोरंट्याल हे मविआचे आमदार आहेत. तरीदेखील जालना लोकसभेत रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला आहे. या मतदारसंघतील महायुतीच्या काही कार्यकर्त्यांनी दानवे यांच्यासाठी प्रचार न केल्यामुळे दानवे यांचा पराभव झाल्याचं सिल्लोडचे आमदार आणि शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी कबूल केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, रावसाहेब दानवे पराभूत झाले तर मी माझी टोपी उतरवेन असा शब्द अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांसमोर दिला होता. आता दानवे पराभूत झाल्यामुळे सत्तार टोपी कधी काढणार? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. यावर सत्तार म्हणाले, “एक भव्य कार्यक्रम आयोजित करून आजी-माजी खासदारांसमक्ष, एक लाख लोकांच्या उपस्थितीत मी टोपी उतरवणार आहे.”

अब्दुल सत्तार म्हणाले, ज्या दिवशी रावसाहेब दानवे यांचा पराभव होईल, त्या दिवशी मी टोपी काढेन, असं मी म्हटलं होतं. परंतु, आता टोपी काढायची वेळ आली आहे. आता मी रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे या दोघांनाही निमंत्रित करणार आहे. विद्यमान आणि माजी असे दोन्ही खासदार माझे मित्र आहेत. या दोघांबरोबर एका भव्य कार्यक्रमात मी माझी टोपी काढेन. नवनिर्वाचित खासदार कल्याण काळे हे माझे मित्र आहेत. रावसाहेब दानवे देखील माझे मित्र आहेत. ते विजयी होतील असं मला वाटलं होतं. परंतु, जनतेने कल्याण काळे यांना निवडलं आहे. आता कल्याण काळे आमच्या दोन्ही जिल्ह्यांचं (जालना आणि छत्रपती संभाजीनगर) नेतृत्व करणार आहेत. एक अभ्यासू व्यक्ती दिल्लीत जात आहे, याचा आम्हाला आनंद आहे. जिल्ह्याला त्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल, अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. मी त्यांच्याविरोधात असलो तरी जो निवडून आला आहे त्याला शुभेच्छा द्यायला हव्यात. त्याचबरोबर त्यांनी मतदारसंघासाठी कामं करावीत अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो.

हे ही वाचा >> “आमच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी…”, रावसाहेब दानवेंच्या पराभवावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “२०१९ मध्ये…”

सत्तार म्हणाले, मी टोपी काढण्याचा भव्य कार्यक्रम आयोजित करणार आहे. एक लाख लोकांच्या समोर टोपी काढणार आहे. हा कार्यक्रम औरंगाबादमध्ये होईल. जालना आणि औरंगाबादमधील लोक त्या कार्यक्रमाला येतील. त्या कार्यक्रमात कल्याण काळेंच्या डोक्यावर टोपी असेल आणि आमच्या डोक्यावर टोपी नसेल. रावसाहेब दानवे, कल्याण काळे आणि एक लाख लोकांच्या साक्षीने मी माझी टोपी काढणार आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abdul sattar will tak off his hat as raosaheb danve lost jalna lok sabha election 2024 asc
Show comments