कल्याणमध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा झाली आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर लढत आहेत. अशात बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी कल्याण लोकसभा मतदार संघातून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची घोषणा केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याणमध्ये विकास झालेला नाही

अभिजीत बिचुकले म्हणाले की कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांनी कितीही ओरडून सांगितले की विकास झाला मात्र या अडीच वर्षांत काहीही विकास झालेला नाही त्यापू्र्वी त्यांना विकास केला असेल त्यात दुमत नाही. मागील अडीच वर्षांत श्रीकांत शिंदे विरुद्ध आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे एवढ्याच लढाया होत आहेत अशी प्रतिक्रिया अभिजीत बिचुकले यांनी दिली आहे.

हे पण वाचा- ‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचकुलेंना मिळाली डॉक्टरेट पदवी! म्हणाले, “माझं योगदान…”

काय म्हटलंय बिचुकलेंनी?

कल्याण लोकसभेतून अर्ज भरणार आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना भूलथापा देत आहेत असं मला वाटतं. मी अधिकारवाणीने हे बोलतो आहे. श्रीकांत शिंदेंनी विकास झाला हे वारंवार सांगितलं आहे. पण तो त्यांनी कदाचित पूर्वी केला असेल. मी ते नाकारत नाही. मात्र सध्या त्यांनी विकास केलेला नाही. अडीच वर्षांत आदित्य ठाकरे विरुद्ध श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे याच लढाया लढल्या. बाकी लोकांची कामं होत नाहीयेत. संसदेला बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्या असं पत्र मी नरेंद्र मोदींना लिहिलं होतं. नरेंद्र मोदी छोट्या छोट्या लोकांना भेटतात. मात्र बाबासाहेबांचं नाव संसदेला देण्यास यांचा नकार आहे का? हा माझा प्रश्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काहीही उत्तर दिलेलं नाही. अटल सेतू हे नाव देण्याआधीही मी त्या सेतूला माँसाहेब जिजाऊंचं द्या अशी मागणी केली होती मात्र ते नावही देण्यात आलं नाही असंही बिचुकलेंनी म्हटलं आहे.

अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाचं काय झालं?

अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक उभारलं जाणार होतं. त्या समुद्रातल्या स्मारकाचं काय झालं? उदयनराजेंना तुम्ही तिकिट दिलंय. त्यांना छत्रपती असल्याचा अभिमान असल्याचं वाटत नाही. याच सगळ्या कारणांसाठी मी आता कल्याणमधून श्रीकांत शिंदेंविरोधात माझी उमेदवारी घोषित करतो आहे असं अभिजित बिचुकलेंनी म्हटलं आहे. याच अभिजित बिचुकलेंनी एप्रिल महिन्यात साताऱ्यातून उदयनराजेंच्या विरोधात लढण्याची घोषणा केली होती.

एप्रिल महिन्यात काय म्हणाले होते बिचुकले?

“कुठला पक्ष, कुठले नेते, कोण कुणाचे कार्यकर्ते, सतरंज्या उचलणारे आहेत याचं मला काही घेणंदेणं नाही. २००४, २००९, २०१४, २०१९ या चार निवडणुका मी लढवल्या आहेत. माझं अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न केला. साताऱ्याच्या जनतेने २००९ मध्ये मला १२ हजारांहून जास्त मतदान केलं होतं. आताही तसंच मतदान होईल असं मला वाटतं. छत्रपती शिवरायांचे वैचारिक वारस म्हणून आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान टिकवायचं आहे. असं अभिजित बिचुकलेंनी म्हटलं होतं.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhijit bichukle will contest loksabha election from kalyan against shreekant shinde scj