भाजपाच्या राम नाईकांचा दणदणीत पराभव केलेला अभिनेता गोविंदा आज शिंदेंच्या शिवसेनेत आला आहे. काही वेळापूर्वीच गोविंदाने हाती भगवा झेंडा घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदाचं स्वागत केलं. आज वर्षा बंगल्यावर महत्त्वाचे प्रवेश झाले आहेत. त्याची सुरुवात गोविंदाच्या पक्ष प्रवेशाने झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी गोविंदाचं स्वागत केलं आहे. मागील काही दिवसांपासून अभिनेता गोविंदा हा राजकारणात पुन्हा प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आज गोविंदाने शिवसेनेत प्रवेश केला आहे. राम नाईक यांचा पराभव करणारा गोविंदा आता शिंदेंच्या शिवसेनेत आला आहे.

एकनाथ शिंदेंनी काय म्हटलं आहे?

आज शिवजयंतीच्या अत्यंत पवित्र दिनी आपले सगळ्यांचे लाडके आणि लोकप्रिय अभिनेते गोविंदाजी हे शिवसेनेत आले आहेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. डाऊन टू अर्थ असलेले आणि सगळ्यांना आवडणारे गोविंदा शिवसेनेत आले आहेत. सगळ्याच समाजात लोकप्रिय असलेले गोविंदा यांचं मी स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छाही देतो. असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे गोविंदाने?

“मी आज या पक्षात आलो आहे. १४ वर्षांचा वनवास संपला आहे आणि रामराज्यात आलो आहे असं मला वाटतं आहे. जी जबाबदारी मला दिली जाईल ती प्रामाणिकपणे पार पाडेन असं गोविंदाने म्हटलं आहे. आजच्या दिवशी मी पक्षात प्रवेश करणे ही मला वाटतं की देवाची कृपा आहे आणि प्रेरणा आहे. मी २००४ ते २००९ या कालावधीत राजकारणात होतो. त्यानंतर बाहेर पडलो. मला वाटलं होतं मी या बाजूला काही दिसणार नाही. पण २०१० ते २०२४ या १४ वर्षांच्या वनवासानंतर नवी सुरुवात करतो आहे. मी पुन्हा राजकारणात आलो आहे, शिवसेनेत आलो आहे.”

Govinda Joins Shivsena
गोविंदाचा शिवसेनेत प्रवेश (फोटो-गणेश शिर्सेकर, एक्स्प्रेस)

आणखी काय म्हटलं आहे गोविंदाने?

मागची दहा ते पंधरा वर्षे देवाचं स्मरण करुनच मी माझी कामं करत होतो. कारण मी सिनेमा क्षेत्र आणि राजकारण यापासून लांब जात होतो. मी एकनाथ शिंदे यांचे धन्यवाद देतो. जी जबाबदारी मला दिली जाईल ती मी पार पाडेन. कला आणि संस्कृती यासाठी जी सेवा करायची आहे ती मी करेन. विरारपासून मी बाहेर पडलो आणि जगात पोहचलो. मला कला आणि संस्कृतीसाठी काम करायला आवडेल. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आपल्या देशात चित्रपट असो किंवा चित्रकूट असो ते कला आणि संस्कृतीचंच प्रतीक आहे.

जयंत पाटील यांच्या टीकेला उत्तर

जयंत पाटील यांनी गोविंदाबाबत एक वक्तव्य केलं की चांगला कलाकार तरी घ्यायचा त्याबाबत विचारलं असता एकनाथ शिंदे म्हणाले जयंत पाटील यांच्यापेक्षा चांगले कलावंत आहेत गोविंदा. एका कलाकाराचा अपमान करणं म्हणजे संपूर्ण सिनेसृष्टीचा अपमान करणं आहे. याचं उत्तर त्यांना मिळेल असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.