महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान होणार आहे. याबरोबरच राज्यात पुढचा मुख्यमंत्री कोण होईल, याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान, याबाबत आता शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही भाष्य केलं आहे.

आदित्य ठाकरे एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान त्यांना महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? असा प्रश्न विचारण्यात आला, यासंदर्भात बोलताना, आम्ही पदांचा विचार करत नाही. आम्हाला राज्यात आधी महाराष्ट्राच्या हिताचं सरकार आणायचं आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – Aaditya Thackeray on Supriya Sule : सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनणार का? आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले…

नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?

“माझ्या वडिलांनी म्हणजे उद्धव ठाकरेंनी मला शिकवलं की जेव्हा आपण निवडणूक लढवतो, तेव्हा मुख्यमंत्री असो किंवा इतर काही पदं असो, या पदांचा विचार करायचा नसतो, कारण ही पदे येतात आणि जातात, ही कधीच आपली नसतात. त्यामुळेच वर्षा बंगला आम्ही एका मिनिटांत सोडला होता. आम्ही पदांचा लोभ ठेवत नाही, ही पदे जनतेची सेवा करण्यासाठी असतात. आम्हाला राज्यात आधी महाराष्ट्राच्या हिताचं सरकार आणायचं आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

शिंदे गटाला केलं लक्ष्य

पुढे बोलताना आदित्य ठाकरेंनी शिवसेनेचे चिन्ह आणि नावाच्या मुद्द्यावरून शिंदे गटाला लक्ष्य केलं. “शिवसेनेचं आमचं चिन्ह आणि नाव कुणाला न देणं ही निवडणूक आयोगाची जबाबदारी होती. ती त्यांनी पार पाडली नाही. त्याविरोधात आम्ही न्यायालयात गेलो, गेल्या दोन वर्षांपासून त्याची सुनावणी सुरू आहे. पण शिवसेना कुणाची हा प्रश्नच होऊ शकत नाही, मुळात चोराने काही चोरलं तर चोर मालक होऊ शकत नाही. आजही जनतेचं प्रेम आणि निष्ठा उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहे”, अशी टीका त्यांनी केली.

“आज महाराष्ट्राची लूट सुरु आहे”

“आज महाराष्ट्राची लूट सुरु आहे. कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात महागाई, बेरोजगारी, असे असे अनेक मुद्दे आहेत.शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. एकही उद्योग महाराष्ट्रात यायला तयार नाही. कारण राज्यात राजकीय अस्थिरता आहे. ही परिस्थिती आम्हाला सुधारायची आहे”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

हेही वाचा – वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात मैदानात उतरलेले शिवसेना उमेदवार मिलिंद देवरा कोण आहेत?

लाडकी बहीण योजनेवरून केली टीका

दरम्यान, लाडकी बहीण योजनेवरूनही त्यांनी भाजपा शिंदे गटावर टीकास्र सोडलं. “लाडकी बहीण योजना केवळ नाटक आहे. भाजपा नेत्यांच्या मनात महिलांविषयी आदर नाही. हे लोक सरळ म्हणतात की, छोटे कपडे घातल्यामुळे बलात्काराच्या घटना घडतात. एकनाथ शिंदेंचे नेते वामन म्हात्रे यांनी महिला पत्रकाराला अपमानित केलं होतं, हे यांना शोभतं का? हे कधीच लाडका भाऊ होऊ शकत नाही. हे नाटक केवळ दोन तीन महिन्यांसाठी होतं. कारण ते लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पराभूत झाले होते. आता विधानसभेतही त्यांचा पराभव निश्चित आहे”, असे ते म्हणाले.