विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार येईल आणि भाजपाचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असं भाकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना वर्तवलं होतं. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. यावरून विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटत आहेत. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही यावरून राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीकास्र सोडलं आहे.
नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
आदित्य ठाकरे यांनी सोमवारी रात्री माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. तसेच त्यांनी नाव न घेता राज ठाकरे यांना लक्ष्य केलं. “मिंधे गट असो किंवा फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस असो, हे सगळे महाराष्ट्राविरोधी काम करत आहेत”, असं ते म्हणाले.
“भाजपाचा मुख्यमंत्री बसावा असं स्वप्न बघणारे महाराष्ट्र द्रोही”
पुढे बोलताना, “प्रत्येक पक्षाने हे स्पष्ट करावं की ते कोणाच्या बाजुने आहेत. आम्ही महाराष्ट्र् प्रेमी लोक आहोत. आम्ही या महाराष्ट्राच्या मातीशी निष्ठावान आहोत. मात्र भाजपा महाराष्ट्र लुटायला निघाली आहे, राज्यात त्यांचा मुख्यमंत्री बसावा, हे ज्यांचं कुणाचे स्वप्न आहे, ते लोक महाराष्ट्र द्रोही आहेत”, अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली.
राज ठाकरेंनी नेमकं काय म्हटलं होतं?
दरम्यान, राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच एबीपी माझाच्या एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केलं होतं. यावेळी त्यांना महाराष्ट्रात कुणाची सत्ता येईल आणि पुढचा मुख्यमंत्री कोण होईल, असा प्रश्न विचारण्यात आला होता. याबाबत बोलताना, “मला वाटतं, की राज्यात महायुतीचं सरकार येईल आणि पुढचा मुख्यमंत्री भाजपाचा होईल. जेव्हा २०२९ मध्ये तुम्ही मला हा प्रश्न विचाराल, तेव्हा मी सांगेन की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुख्यमंत्री होईल. माझी ही गोष्ट आपण लिहून ठेवा.” असे ते म्हणाले होते. तसेच महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? असं विचारलं असता, “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असं वाटतं, ते नक्कीच मुख्यमंत्री होऊ शकतात” असं त्यांनी सांगितलं होतं.