तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळजवळ स्पष्ट झाले आहेत. तेलंगणा वगळता उर्वरित तिन्ही राज्यांत भाजपाने बाजी मारली आहे. तर तेलंगणा राज्यात काँग्रेस पक्षाचे सरकार स्थापन होऊ शकते. मिझोराम आणि वरील चार राज्यांची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मतदानोत्तर चाचण्यांत मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार येईल, असे सांगितले जात होते. प्रत्यक्ष मात्र तेलंगणा वगळता अन्य तिन्ही राज्यांत काँग्रेस पिछाडीवर आहे. असे असतानाच येत्या बुधवारी (६ डिसेंबर) विरोधकांच्या इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी आम आदमी पार्टीने मोठा दावा केला आहे.
“आम आदमी पार्टी उत्तर भारतातील सर्वांत मोठा विरोधी पक्ष”
आमचा आम आदमी पार्टी हा पक्ष उत्तर भारतातील सर्वांत मोठा विरोधी पक्ष ठरला आहे, असे आपचे नेते जास्मीन शाह ट्विटरद्वारे म्हणाले. “आजच्या निकालानंतर आम आदमी पार्टी उत्तर भारतातील सर्वांत मोठा विरोधी पक्ष म्हणून उदयास आला आहे. आमच्या पक्षाची पंजाब आणि दिल्ली या दोन राज्यांत सत्तादेखील आहे,” असे शाह म्हणाले आहेत.
जागावाटपासाठी काँग्रेसची ताकद कमी झाली?
तीन राज्यांचा निकाल काँग्रेससाठी मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. असे असतानाच विरोधकांच्या इंडिया या आघाडीने बुधवारी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. २०२४ सालच्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जवळपास २८ विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. हे विरोधी पक्ष एकत्र आले असले तरी त्यांच्यात अद्याप जागावाटप झालेले नाही. पाच राज्यांच्या निवडणुकीमुळेच जागावाटपाची चर्चा थांबली होती. या पाच राज्यांत विजयी कामगिरी करून जास्तीत जास्त जागांवर दावा करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता. आता तीन राज्यांत काँग्रेसचा पराभव झाला आहे. त्यामुळे जागावाटपासाठी काँग्रेसची ताकद कमी झालेली आहे. असे असतानाच आता येत्या बुधवारी विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक होत आहे.
घटकपक्षांचा लोकसभा निवडणुकीसाठी जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा प्रयत्न
काँग्रेसचा तीन राज्यांतील पराभवामुळे आता इंडिया आघाडीतील इतर घटकपक्ष लोकसभा निवडणुकीसाठी जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा प्रयत्न करतील. त्याचाच एक भाग म्हणून की काय, बुधवारच्या बैठकीआधीच आप पक्षाने आम्ही उत्तर भारतातील सर्वांत मोठा विरोधी पक्ष आहोत, असा दावा केला आहे.
“आम्ही या निकालाचीच वाट पाहत होतो”
याबात आपच्या एका नेत्याने प्रतिक्रिया दिली. “प्रत्येकजण या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची काय स्थिती असेल, याची वाट पाहत होता. काँग्रेसचा छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये विजय होईल असे सांगितले जात होते. या विजयामुळे काँग्रेसची ताकद निश्चितच वाढली असती. मात्र आजच्या निकालामुळे या स्थितीत बदल होण्याची शक्यता आहे,” असे आम आदमी पार्टीच्या नेत्याने म्हटले. आमच्यातील युती टिकली तर आता काँग्रेसला २०२४ सालच्या निवडणुकीत तडजोड करावी लागेल, असेही या नेत्याने सांगितले.
आप दिल्लीमध्ये ७ पैकी ५ जागा मागणार?
दरम्यान, काँग्रेसचा मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांत पराभव झाल्यामुळे आता इंडिया आघाडीतील घटकपक्ष लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागांसाठी मागणी करतील. आपदेखील दिल्लीमध्ये सातपैकी एकूण ५ जागा मागण्याची शक्यता आहे. याबाबत काँग्रेस पक्षातील एका नेत्याने प्रतिक्रिया दिली. “काँग्रेसने कमीत कमी दोन राज्ये जिंकली असती तर दिल्लीमध्ये ४ ते ५ जागा मागता आल्या असत्या. मात्र आता स्थिती वेगळी आहे. असे असले तरी आप पक्षाचे काही नेते सध्यात तुरुंगात आहेत. या नेत्यांवर मद्यघोटाळ्याचे आरोप आहेत. आप पक्षदेखील दिल्लीमध्ये चांगल्या स्थितीत नाही,” असे काँग्रेसच्या नेत्याने म्हटले.
दरम्यान, काँग्रेसची छत्तीसगड आणि राजस्थान या दोन्ही राज्यांत सत्ता होती. मात्र काँग्रेसला ही दोन्ही राज्ये गमवावी लागली आहेत. सध्या उत्तर भारतात हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. कर्नाटकमध्येही हा पक्ष सत्तेत आहे. बिहारमध्ये महायुतीच्या रुपात हा पक्ष सत्तेत सहभागी आहे. आता तेलंगणा राज्यात काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता आहे.