Karnataka Vidhan Sabha Election Results 2023 : कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळालं आहे. त्यामुळे भाजपाचा दारुण पराभव झाल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. कर्नाटक निवडणूक निकालावरून आता अनेक प्रतिक्रियाही समोर येऊ लागल्या आहेत. कोणी काँग्रेसच्या यशामागे भारत जोडोला श्रेय देत आहे तर कोणी विरोधकांच्या एकजुटीचा गौरव करत आहे. देशभरातील विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपाच्या पराभवावर टीका केली आहे. तसंच, सध्या भारताला नव्या सकारात्मक विचारांची गरज असल्याने कर्नाटकमधील काँग्रेसचा विजय हा जनादेश असल्याचं म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेडा म्हणाले की, “निवडणुकींचा निकालांचा परिणाम एका रात्रीत येत नसतो. याची सुरुवात भारत जोडो यात्रेपासून झाली होती. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदींना हनुमानच्या भक्तानी कडवे उत्तर दिले आहे. बजरंग दलाची तुलना बजरंग बलीशी केल्यावर असंच होणार”, असंही पवन खेडा म्हणाले.

भाजपमुक्त दक्षिण भारत – भुपेश बघेल

“कर्नाटकचा निकाल अपेक्षेप्रमाणे लागला आहे. मोदींचा चेहरा घेऊन ही निवडणूक भाजपाने लढवली होती. त्यामुळे हा मोदींचा पराभव आहे. भ्रष्टाचारांच्या डोक्यावर बजरंगबलीची गदा पडली आहे”, अशी प्रतिक्रिया छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी दिली. तसंच, “जे काँग्रेसमुक्त भारताची घोषणा करत होते ते आता दक्षिण भारतातून मुक्त झाले आहेत, असंही ते म्हणाले.

जातीय राजकारणा नाकारून विकासाचे राजकारण निवडले – अशोक गेहलोत

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत जे वातावरण कर्नाटकात पाहायला मिळाले. त्याचाच परिणाम आ कर्नाटकच्या निवडणुकीच्या निकालात दिसून येत आहे. सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस नेत्यांनी जोरदार प्रचार केला होता. कर्नाटकने जातीयवादी राजकारण नाकारून विकासाचे राजकारण निवडले आहे. याचीच पुनरावृत्ती आगामी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीतही होणार आहे, अशी प्रतिक्रिया राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्वीट करून दिली.

भाजपाला जनादेश मिळाला – अखिलेश यादव

कर्नाटकचा संदेश असा आहे की भाजपाच्या नकारात्मक, सांप्रदायिक, भ्रष्ट, श्रीमंताभिमुख, महिला युवकविरोधाी, समाजविभाजन, खोटा प्रचार, व्यक्तिवादी राजकारणाचा अंत सुरू झाला आहे. हा नव्या सकारात्मक भारताचा महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि वैमनस्यविरुद्ध असेला जनादेश आहे, असं ट्वीट सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केलं आहे.

पंतप्रधानांचा पराभव स्पष्ट – जयराम रमेश

“कर्नाटक निवडणुकीचे निकाल जसजसे स्पष्ट होत आहेत, तसतसे काँग्रेसचा विजय आणि पंतप्रधानांचा पराभव स्पष्ट होत आहे. उदरनिर्वाह, अन्न सुरक्षा, महागाई, शेतकऱ्यांचे हाल, वीजपुरवठा, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या स्थानिक प्रश्नांवर काँग्रेसने निवडणूक लढवली होती. परंतु, पंतप्रधानांनी फूट पाडणारी रणनीती स्वीकारून ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला”, असं ट्वीट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केलं.

ही तर सुरुवात – ममता बॅनर्जी

“मी कर्नाटकच्या मतदारांना, जनतेला सलाम करते. तसेच निवडणुकीत विजयी होणाऱ्या उमेदवारांनाही मी सलाम करते. अगदी एच. डी. कुमारस्वामी यांनीही चांगली कामगिरी केली. आता छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या निवडणुका येत आहेत. मला वाटतं आता भाजपाचा या दोन्ही राज्यात पराभव होईल. ही २०२४ ची सुरुवात आहे. आता भाजपाला आगामी लोकसभा निवडणुकीत अगदी १०० जागा मिळतील असंही वाटत नाही, अशी प्रतिक्रिया पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली.

“कर्नाटकच्या निकालामुळे देशाला आनंद झाला आहे. या निकालाकडे संपूर्ण देश पाहत होता. कर्नाटकातील निकाल जो काही लागणार होता तो २०२४ साली दिल्लीचा दरवाजा कोणासाठी उघडला जाईल याचा फैसला होता. लोकमानस आणि जनमानस आज कळणार होता”, असं ठाकरे गटाचे खासदार सजंय राऊत म्हणाले. ते पुढे म्हणाले की, “आज देशात दोन निकाल लागले आहेत. कर्नाटकात लागला आहे. तर, उत्तर प्रदेशमध्ये नगरपालिका आणि पंचायतीमध्ये भाजपाला यश मिळाले आहे. पण ते योगी आदित्यनाथ यांचं यश आहे. परंतु, कर्नाकटातील काँग्रेसचा विजय हा मोदी आणि शहाांचा दारुण पराभव आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After comparing bajrang dal to bajrang bali the oppositions criticism of the bjp after its defeat in karnataka sgk
Show comments