कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence – AI) वापर आता अनेक क्षेत्रामध्ये होत असताना राजकारणातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून प्रचार केला जात आहे. तेलंगणा विधानसभेत एका ३६ वर्षीय उद्यमशील तरुणाने स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरून आपल्या एआय उत्पादनाची अनोखी जाहिरात केली आहे. सिद्धार्थ चक्रवर्ती या युवकाने तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी जुबली हिल्स मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सिद्धार्थने निवडणूक प्रचारासाठी जे एआय टूल तयार केले होते, त्याचा वापर आता स्वतःच्याच प्रचारासाठी त्याने केला आहे. एआयद्वारे प्रचार होऊ शकतो, हे दाखवून देण्यासाठी त्याची शक्कल त्याला निवडणुकीत विजय मिळवून देते की नाही? हे ३ डिसेंबर रोजी कळेलच. पण या प्रयोगामुळे त्याच्या एआय उत्पादनाची मात्र सगळीकडे चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिद्धार्थ चक्रवर्तीने सांगितले की, राजकारणी लोक बॅनर आणि जाहिराती करण्यासाठी जेवढे पैसे खर्च करतात, त्यापेक्षा कमी खर्चात एक साधा चॅटबॉट राजकारण्यांना अधिक लाभ देऊ शकतो. याद्वारे मतदारांपर्यंत माहिती पोहोचवणे आणि मतदारांना नेमके काय अपेक्षित आहे, याची इत्थंभूत माहिती घेणे उमेदवारांना शक्य होईल.

हे वाचा >> विश्लेषण : अमेरिका, चीन, युरोप, भारत… ‘एआय’ नियंत्रणासाठी कोणत्या देशांमध्ये प्रयत्न सुरू?

जुबली हिल्स या विधानसभा मतदारसंघात सिद्धार्थ चक्रवर्ती यांच्यासह २० उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत. भारत राष्ट्र समिती पक्षाचे नेते आणि दोन वेळा आमदार राहिलले मंगाती गोपिनाथ आणि काँग्रेसकडून माजी क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन निवडणुकीला उभे आहेत. त्याशिवाय भाजपाकडून लंकाला दीपक रेड्डी आणि एमआयएम पक्षाकडून विद्यमान नगरसेवक मोहम्मद राशेद फराझुद्दीनदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत.

एआय टूल कशाप्रकारे प्रचार करणार?

सिद्धार्थ चक्रवर्ती यांनी प्रचारादरम्यान दाखवून दिले की, तंत्रज्ञानाचा वापर करून राजकीय प्रचार कसा केला जाऊ शकतो. एआयमुळे त्याच्यासारख्या नवशिक्या उमेदवारालाही बलाढ्य उमेदवारांच्या तुलनेत आणून ठेवले आहे, असेही चक्रवर्ती यांनी सांगितले.

सध्या एआयचा वापर हा ग्राहक तक्रार निवारण, आरोग्य आणि अन्न व पेय इंडस्ट्री सारख्या क्षेत्रात होत आहे. सिद्धार्थ चक्रवर्ती यांच्या म्हणण्यानुसार राजकीय क्षेत्रात एआयच्या वापरामुळे परिवर्तन घडू शकते. “एआयप्रती संपूर्ण जगभरात कुतूहल निर्माण झालेले आहे. नव्या ढंगात राजकीय प्रचार करण्यासाठी आम्ही कृत्रिम बुद्धिमत्तेचे उत्पादन घेऊन आलो आहोत. एआय असिस्टंट किंवा उमेदवाराचा एआय अवतार लाखो मतदारांशी एकाचवेळी संवाद साधण्यास सक्षम असेल”, असे चक्रवर्ती यांनी सांगितले.

हे वाचा >> विश्लेषण: आर्टिफिशियल इंटेलिजन्सची का वाटते सगळ्यांनाच भीती? काय आहे ब्लेचली जाहीरनामा?

चक्रवर्ती यांच्या कंपनीने तयार केलेले एआय टूलच्या माध्यमातून उमेदवाराने केलेली कामे, त्याचे ध्येय आणि आश्वासने अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी मदत होत आहे. उमेदवाराबद्दलची माहिती, निवडणुकीचे प्रतिज्ञापत्र एआय टूलच्या माध्यमातून सार्वजनिक मंचावर मांडले जाते. ज्यामुळे मतदारांना आपल्या पसंतीचा उमेदवार निवडणे शक्य होईल.

चक्रवर्ती स्वतःच निवडणुकीत का उतरले?

चक्रवर्ती यांच्या कंपनीने आठ महिन्यांपूर्वीच प्रचारासाठी एआय टूलचे निर्माण केले होते. त्यानंतर त्यांनी अनेक राजकीय पक्ष आणि नेत्यांकडे त्याची जाहिरात केली. काही उमेदवारांनी एआय टूल वापरण्याची इच्छा व्यक्त केली आणि काही जणांनी या टूलमध्ये रस दाखविला नाही. नवीन बदलाला स्वीकारण्याबाबत राजकारण्यांमध्ये थोडी साशंकता दिसून आली. त्यामुळेच सिद्धार्थ चक्रवर्ती यांनी स्वतःच निवडणुकीत उतरून सदर टूल कसे काम करू शकते, हे दाखविण्याचा प्रयत्न केला.

उमेदवाराचा क्यूआर कोड स्कॅन करून लोक सदर उमेदवाराची डिजिटल माहिती जाणून घेऊ शकतात, तसेच व्हॉट्सअपद्वारे उमेदवाराच्या संपर्कात राहू शकतात. सध्या हे टूल केवळ इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. चक्रवर्ती यांची टीम हिंदी आणि इतर भारतीय भाषांमध्ये हे टूल उपलब्ध करून देण्यासाठी काम करत आहे. एआय आधारित फोनवर संवाद साधण्यासाठीही एक टूल विकसित करण्याचा त्यांच्या टीमचा प्रयत्न आहे.

आणखी वाचा >> ChatGPT च्या OPenAI कंपनीत काम करण्याची संधी, मिळू शकतो तब्बत ३ कोटींपेक्षा अधिक पगार

सिद्धार्थ चक्रवर्ती प्रतिस्पर्धी उमेदवारांप्रमाणे रस्त्यावर उतरून प्रचार करणार नाहीत. “आम्ही फक्त डिजिटल प्रचारावर लक्ष केंद्रीत केलेले आहे. फेसबुक आणि व्हॉट्सअप ग्रुप्सच्या माध्यमातून आम्ही मतदारांच्या संपर्कात असून आमचा टूल किती प्रभावी आहे, हे यातून दाखवून द्यायचे आहे”, अशी प्रतिक्रिया चक्रवर्ती यांनी दिली. तेलंगणा राज्यात ३० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीत ११९ विधानसभा मतदारसंघातून २,९८९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ai tool built for election campaigns startup founder in poll fray to promote his ai tool kvg
Show comments