राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी २३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर, ३ डिसेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. भाजपा आणि काँग्रेसकडून प्रचाराचा धुरळा उडाला आहे. अशातच एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनी काँग्रेस नेते, राहुल गांधी आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
“राहुल गांधी आणि अशोक गेहलोतांचा मतदार पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपला हिरो मानतो. तोच मतदार मोदींना लोकसभेत भाजपाला मतदान करतो. मग, आम्ही निवडणूक लढवली, तर मते विभागण्यासाठी आला, असा आरोप करण्यात येतो,” अशा शब्दांत ओवैसींनी काँग्रेसचा समाचार घेतला आहे.
हेही वाचा : मध्य प्रदेश-राजस्थान-छत्तीसगढमध्ये स्थानिक नेतृत्व भाजपच्या यशातील अडचण?
जयपूर येथे प्रचारसभेत बोलताना ओवैसी म्हणाले, “नरेंद्र मोदींचा पराभव करणं, हे तुमचं ध्येय आहे. तर, मोदींना पंतप्रधान होऊ न देणं, हे माझंही ध्येय आहे. ‘तुम्ही भाजपाला मतदान केलं का?’ हे विचारलं, तर नाही म्हणाल. ‘जयपूर मतदारसंघातून २०१९ साली मोदींना मतदान केलं का’ या प्रश्नावरही तुम्ही नाही म्हणून सांगाल.”
“मग, २०१९ साली जयपूरमध्ये भाजपाला विजय कसा काय मिळाला? याचं उत्तर मी शोधलं. राहुल गांधी आणि अशोक गेहलोतांचा मतदार मोदींना आपला हिरो मानतो. तोच मतदार भाजपाला मतदान करतो. मग, आम्ही निवडणूक लढवली, तर औवेसी मते विभागण्यासाठी आला, असा आरोप आमच्यावर केला जातो,” असं ओवैसींनी सांगितलं.
हेही वाचा : दक्षिण राजस्थानमध्ये आदिवासींची मते काँग्रेस-भाजपसाठी निर्णायक ठरणार का ?
“आम्ही पहिल्यांदाच राजस्थानमध्ये निवडणूक लढत आहोत. याआधी भाजपा कुणामुळे जिंकली? भाजपाचे सर्व खासदार निवडून कसे काय आले? याचं उत्तर काँग्रेसवाले देऊ शकत नाही,” अशी टीका ओवैसींनी केली आहे.