Ganesh Naik in Airoli Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजापमध्ये आल्यानंतर २०१९मध्ये केवळ एका जागेवर समाधान मानावे लागलेल्या गणेश नाईक कुटुंबीयांनी आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आक्रमक पवित्रा घेतला आहे. ऐरोली मतदारसंघांतून निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी नाईक कुटुंबीयांनी केली आहे. ऐरोली हा मतदारसंघ नाईक कुटुंबाकडेच राहिला आहे. २००८ साली या मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून तत्कालीन राष्ट्रवादी नेते संजय नाईक यांनी २०१९ पर्यंत हा मतदारसंघ सांभाळला. तर, २०१९ मध्ये भाजपात गेलेल्या गणेश नाईक यांनी या ठिकाणची सत्ता काबिज केली.
ठाणे जिल्ह्यातील बेलापूर विधानसभा मतदारसंघाचं विभाजन होऊन ऐरोली आणि बेलापूर असे दोन भाग पडले. सुरुवातीला गणेश नाईक यांनी त्यांचे सुपुत्र संजय नाईक यांना या जागेवरून निवडून आणलं. परिणामी राष्ट्रवादीची या मतदारसंघात चांगली पकड होती. परंतु, शिवसेनेचे नगरसेवक जास्त असल्याने राष्ट्रवादीसाठी ही जागा कठीण जाईल अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे नाईक कुटुंबाने कमळ हाती घेतले. ऐरोली विधानसभा मतदारसंघावर प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचं वर्चस्व राहिलं आहे. परंतु, राष्ट्रवादीतील गणेश नाईक भाजपात आल्याने येथे दोन्ही पक्षांमध्ये कडवी झुंज होण्याची शक्यता आहे. ऐरोलीतून लढण्यासाठी प्रत्येक पक्षात इच्छुकांची रांग लागली आहे. भाजपामधून गणेश नाईक, मंदा म्हात्रे, शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षातून गटातून विजय चौगुले, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षातून एम. के. मढवी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून मंगेश आमले, काँग्रेसमधून अनिकेत म्हात्रे अशा नेत्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे.
भाजपाच्या जागेवरून शिवसेनाही आग्रही
गणेश नाईक यांचा हा बालेकिल्ला असला तरीही शिवसेना एकनाथ शिंदे पक्षानेही या ठिकाणी चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनही या जागेवर दावा केला जाऊ शकतो. ऐरोली विधानसभेत शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) सर्वाधिक नगरसेवक असल्याचा दावा जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांनी केला आहे.
महाविकास आघाडीत रस्सीखेच
महाविकास आघाडीतही या जागेसाठी रस्सीखेंच आहे. काँग्रेसचा मोठा मतदारवर्ग या मतदारसंघात आहे. तर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचंही येथे प्राबल्य आहे. तर, दुसरीकडे शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षानेही या ठिकाणी आग्रही भूमिका घेतली आहे. त्यामुळे हा मतदारसंघ कोणाच्या पारड्यात पडणार हे पाहावं लागेल.
मध्यमवर्गीय वस्तीत कोण मारणार बाजी?
ऐरोली विधानसभा मतदारसंघात मध्यमवर्गीय आणि झोपटपट्टी बहुल वस्ती सर्वाधिक आहे. ५७ नगरसेवकांपैकी जवळपास २० नगरसेवक झोपडपट्टी बहुल भागातून निवडून आले आहेत. तसंच, आगरी समाजाचीही वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. गावठाणातील अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. एपीएमसी मार्केटमुळे माथाडी वर्गाची मोठा मतदारवर्ग या भागात राहतो. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात खरी चुरस रंगणार आहे.
ताजी अपडेट
ऐरोली विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून भाजपाच्या संदीप नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, महाविकास आघाडीकडून शिवसेना (उद्धव ठाकरे) एम. के. मढवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.