लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा महाराष्ट्रासह देशभरात आज पार पडतो आहे. बारामती या हायव्होल्टेज मतदारसंघातही आजच मतदान झालं आहे. अजित पवारांनी आई आशाताई पवारांसह आणि पत्नी सुनेत्रा पवारांसह येत मतदानाचा हक्क बजावला. तर सुप्रिया सुळे, शरद पवार यांनीही मतदानाचा हक्क बजावला. अजित पवारांच्या घरी जाऊन सुप्रिया सुळेंनी आशाताई पवार यांची भेटही घेतली. यानंतर एका मुलाखतीत भ्रष्टाचाराच्या आरोपांवर अजित पवारांनी भाष्य केलं आहे. तसंच शरद पवार यांच्या वयाबद्दल, प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
२००४ मधला प्रसंग अजित पवारांनी सांगितला
“२००४ मध्ये साहेबांना (शरद पवार) एक आजार झाला आणि त्यांना डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलं. त्या ऑपरेशनच्या आधी त्यांनी आम्हाला सगळ्यांना बोलवून घेतलं आणि सांगितलं निवडणूक आलेली आहे. ऑपरेशन करायचं असल्याने सेनापती तुमच्या बरोबर नसणार आहे. त्यामुळे तुम्हालाच आता काम करायचं आहे. तेव्हा आमच्या डोळ्यांत पाणी आलं. पण आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही प्रकृतीची काळजी घ्या. आम्ही त्यावेळी सगळा प्रचार केला. त्या निवडणुकीत चांगल्या जागा निवडून आणल्या. आत्ता शरद पवार यांना त्यांच्या जवळच्या लोकांनी हे सांगायला हवं होतं की तुम्ही इतक्या सभा घेऊ नका. काही वाटलं तर आम्ही तुमचं मार्गदर्शन घेतो. त्यामुळे ते आजारी झाले याबद्दल मला चिंता वाटतेच. पण त्यांच्या निकटवर्तीयांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला द्यायला हवा होता.” असं अजित पवार म्हणाले.
भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत काय म्हणाले अजित पवार?
काही लोकांचा तोल ढासळला आहे असं शरद पवारांनी अजित पवारांचं नाव न घेता म्हटलं होतं. त्याबाबत विचारलं असता अजित पवार म्हणाले, “शरद पवारांची एक सभा होती. त्या सभेत त्यांनी सांगितलं सुप्रियावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही. याचा अर्थ त्यांना हे सांगायचं होतं. मी त्यातून अर्थ असा काढला की सुप्रियावर भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत तिची प्रतिमा स्वच्छ आहे. इकडे मात्र भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेच. एक शिखर बँकेचा, दुसरा सिंचन घोटाळ्याचा. इतक्या चौकशा झाल्या, सगळ्या सरकारच्या कार्यकाळांत झाल्या. मी जर इतका भ्रष्टाचारी, नालायक आणि हरामखोर असतो, वाया गेलेला असतो आणि भ्रष्टाचाराने बरबटलेला असतो तर मला कुणी संधी दिली नसती, मला सगळ्यांनी वाळीत टाकलं असतं. पण मी आज महायुतीत आहे, महाविकास आघाडीत होतो. उद्धव ठाकरेंसह मी सरकारमध्ये होतो, इतरांबरोबरही मी कामं केली आहेत. त्यामुळे मी म्हणालो की ज्यांनी हे सांगितलं त्यांच्यावरही दाऊदशी संबंधित आरोप झालेच. भूखंडाचं श्रीखंड हा आरोप झाला, एन्रॉनचा आरोप झाला. ते आरोप राजकीय होते. तसेच माझ्यावरही आरोप झाले आहेत. सुप्रियावरही लवासाचा आरोप आहे. मला खरंतर हे बोलायचं नव्हतं पण समोरच्याने काहीतरी आरोप केला आणि मी गप्प बसलो तर जनतेला वाटतं अजित पवाराचं चुकतं आहे. त्यामुळे मी बोललो.” असं अजित पवार म्हणाले. बोल भिडूला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांनी हे वक्तव्य केलं आहे.
मी शरद पवारांना साथ दिली ती मनापासून दिली
“मी जेव्हा शरद पवारांना साथ दिली ती मनापासून दिली. मला सांगितलं खासदारकीला उभा राहा मी राहिलो, राजीनामा दे सांगितलं मी दिला. आमदारकीला उभा राहा राहिलो जे काही ते म्हणाले ते मी ऐकलं. मला गृहीत धरलं असंही मी म्हणणार नाही.” असंही अजित पवार म्हणाले.