Ajit Pawar: अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत उत्तम कामगिरी केली आहे. महायुतीने २३० हून अधिक जागांवर विजय मिळवला आहे. अजित पवारांनी ४० हून अधिक जागा जिंकल्या आहेत. अजित पवारांच्या प्रचारात त्यांचं गुलाबी जॅकेट चर्चेत राहिलं आणि लक्षवेधीही ठरलं. या गुलाबी जॅकेटची इनसाईड स्टोरी काय ते आता नरेश अरोरा यांनी सांगितलं आहे. नरेश अरोरा यांनी अजित पवारांच्या ( Ajit Pawar ) प्रचाराची जबाबदारी सांभाळली होती. अजित पवारांनी ( Ajit Pawar ) नेमकं हे जॅकेट का निवडलं? याचं कारण समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले नरेश अरोरा?

अजित पवार हे एक चांगले व्यक्ती आहेत. अजित पवारांकडे सुरुवातीला प्रशासन सांभाळण्याची जबाबदारी जास्त प्रमाणात होती. शरद पवार हे पक्षासाठी मतं आणायचे आणि अजित पवार सत्ता आल्यानंतर प्रशासकीय काम करायचे. राष्ट्रवादीत दोन भाग झाल्यानंतर त्यांना फक्त प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळून चालणार नव्हतं. त्यांना लोकांशी संवाद साधणं, लोकांमध्ये मिसळणं आवश्यक होतं त्यामुळे आम्ही त्यांना ज्या सूचना दिल्या त्या त्यांनी ऐकल्या असं नरेश अरोरा यांनी म्हटलं आहे. नरेश अरोरा यांनी अजित पवारांना पिंक थीम दिली होती. तसंच अजित पवारांच्या विजयात नरेश अरोरांचाही मोठा वाटा आहे. नरेश अरोरा यांनी आता अजित पवारांबाबत ( Ajit Pawar ) प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी काय म्हणाले नरेश अरोरा?

अजित पवार ( Ajit Pawar ) हे सकाळी सहा वाजल्यापासून काम सुरु करायचे. त्यानंतर मंत्रालयात जाऊन तिथली कामं करायचे. अजित पवारांकडे हसायला, दोन घटका बोलण्यासाठीही तसा वेळ नसायचा. लोकसभा निवडणुकीच्या नंतर त्यांनी लोकांमध्ये जायचं, त्यांच्याशी संवाद साधायचं ठरवलं. त्यावेळी कठोरपणा कुठे दाखवायचा, कुठे सौम्यपणे बोलायचं हे त्यांना माहीत आहे. मतं मागताना काही दादागिरी करता येत नाही. ज्या माणसाला स्वतःवर विश्वास असतो तेच लोक स्वतःमध्ये बदल घडवतात. अजित पवारांनी ( Ajit Pawar ) बदल घडवला आणि तो आज निकालांमध्येही दिसून येतो आहे असं नरेश अरोरा यांनी म्हटलं आहे.

गुलाबी थीमची तयारी कशी केली?

पिंक कलर, जॅकेटची सुरुवात कशी झाली? हे विचारल्यावर अरोरा म्हणाले एकदा अजित पवारांना ( Ajit Pawar ) तुम्ही समजावून सांगितलं की हे सगळं आपण का करतोय ? त्यामागचं कारण काय? हे त्यांना कळलं, पटलं तर ती गोष्ट पुन्हा पुन्हा सांगावी लागत नाही. अजित पवार ते आवर्जून करतात. पिंक जॅकेटची चांगलीच चर्चा झाली. ती बाब आम्ही अजित पवारांना का करायची आहे ते सांगितल्यावर समजली. ज्यानंतर अजित पवारांना ते पटलं. असंही नरेश अरोरा यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

पिंक जॅकेटच का? नरेश अरोरांचं उत्तर काय?

अजित पवारांनी ( Ajit Pawar ) गुलाबी जॅकेटच का निवडलं असं विचारलं असता नरेश अरोरा म्हणाले की ज्या दिवशी अजित पवारांनी अर्थसंकल्प मांडला त्यादिवशी त्यांनी पिंक जॅकेट घातलं होतं. लाडकी बहीण योजना त्यांनी त्यावेळी अर्थसंकल्पात जाहीर केली होती. त्यामुळे आम्ही ठरवलं की या योजनेची ओळख त्यांच्याबरोबर राहिली पाहिजे. पांढरा कुर्ता-पायजमा आणि काळं, ब्राऊन जॅकेट हा सर्वसाधारण पेहराव वाटतो. त्यामुळे अजित पवारांना आम्ही स्पेशल लूक दिला असं अरोरा यांनी स्पष्ट केलं. आधी चार पक्ष होते त्यानंतर सहा झाले. त्यांचे रंगही बऱ्यापैकी सारखे आहेत. मतदारांना आकर्षित करायचं होतं आणि घड्याळाशी लोकांना जोडायचं होतं. त्यात जॅकेटने मोठी मदत अजित पवारांना झाली असंही अरोरा यांनी स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar choose pink jacket in election campaign what is the inside story of this scj