लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी निवडणूक आयोगाने अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर केला आहे. अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ६० पैकी तब्बल ४६ जागांवर विजय मिळवत सत्ता काबीज केली आहे. भाजपाच्या या विजयासह अरुणाचल प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री पेमा खांडू हे पुन्हा एकदा पाच वर्षांसाठी राज्याचा कारभार हाती घेणार आहेत. दुसऱ्या बाजूला सिक्कीम विधानसभेचा निकाल जाहीर झाला असून तिथे मात्र भाजपाचा सुपडा साफ झाला आहे. सिक्कीममध्ये भाजपा खातंदेखील उघडू शकलेली नाही. या राज्यात सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) या सत्ताधारी पक्षाने राज्यातील ३२ पैकी ३१ जागा जिंकून सत्ता राखली आहे. तर एका जागेवर सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटचा उमेदवार विजयी झाला आहे.
दरम्यान, अरुणाचल प्रदेशमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही चांगलं यश मिळालं आहे. या राज्यात भाजपाने ४६ जागा जिंकल्या आहेत. तर त्यापाठोपाठ नॅशनल पीपल्स पार्टीने (एनपीईपी) पाच जागा जिंकल्या आहेत. पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल (पीपीए) ने दोन जागांवर विजय मिळवला असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) तीन आमदार निवडून आले आहेत. राज्यात काँग्रेसला केवळ एकच जागा जिंकता आली. त्याचबरोबर राज्यातील एकूण तीन जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट पडल्यानंतर अजित पवार यांनी मूळ पक्षावर दावा केला आणि हा पक्ष निवडणूक आयोगाने त्यांच्या ताब्यात दिला. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या पक्षाने मिळवलेलं हे पहिलंच राजकीय यश आहे. या पक्षाने नुकतीच लोकसभा निवडणूकही लढवली आहे. मात्र या निवडणुकीचे निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहेत. तत्पूर्वी अरुणाचल प्रदेशच्या विधानसभेमधील यश हे पक्षाचं मनोबल वाढवणारं आहे.
दरम्यान, या यशानंतर अजित पवार यांनी फेसबूकवर एक पोस्ट लिहून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. अजित पवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, अरुणाचल प्रदेश येथे पार पडलेल्या विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ३ उमेदवार निवडून आल्याबद्दल मी तिन्ही उमेदवारांचं मनापासून अभिनंदन करतो. हा विजय ऐतिहासिक असून या निवडणुकीत अरुणाचल प्रदेशमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेले अथक परिश्रम आज फळास आले आहेत. त्यामुळे त्यांचं देखील अभिनंदन करतो. विशेष बाब म्हणजे एकूण राज्यात एकूण मतांपैकी १०.०६ टक्के मतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदरात पडली, याचा फार आनंद आहे. अरुणाचल प्रदेशच्या मतदार राजानं आमच्या पक्षाच्या उमेदवारांवर दाखवलेला विश्वास हीच आमची ताकद असून याच ताकदीच्या जोरावर यापुढे विकासाची गंगा अरुणाचल प्रदेशमध्ये वाहेल असा शब्द देतो.
अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विकासाची पावलं पुढे पडत आहेत आणि अरुणाचल प्रदेशमधील यश हे पक्षाच्या प्रगतीचे द्योतक आहे. लोकशाहीची मूल्ये अंगीकारून आमचा पक्ष देशभर विकासाचे नवनवे आदर्श उभे करेल यात काही शंका नाही. देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.
हे ही वाचा >> Lok Sabha Exit Poll : “बोलघेवडे नेते अन् तोतया पत्रकार…”, एक्झिट पोल्सवरून प्रशांत किशोरांचा संताप, रोख कोणाकडे?
अरुणाचलमधील तिसरा मोठा पक्ष
याचुली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे टोको तातुंग हे ८ हजार २५५ मतांसह विजयी झाले आहेत. तर, लेकांग मतदारसघांत लिखा सोनी हे ७ हजार ८०४ मतांसह आणि बर्दुम्सा-दायुनमधून निख कामीन हे १० हजार ४९७ मतांसह विजयी झाले आहेत. या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकूण मतांपैकी १०.०६ टक्के मतं मिळाली आहेत. मतांच्या टक्केवारीचा विचार करता हा राज्यातील तिसरा मोठा पक्ष आहे.