Amol Mitkari : “महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ८५+८५+८५ म्हणजे २७० वाह..”, अजित पवारांच्या पक्षाने उडवली खिल्ली

महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेऊन ८५ जागा प्रत्येकी अशा २७० जागांवर सहमती झाल्याचं सांगितलं. त्याच बेरजेवरुन त्यांची खिल्ली उडवली जाते आहे.

Ajit Pawar Party MLA Mocks MVA on Total of 85+85+85
अजित पवारांच्या पक्षातील नेत्याने महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यावरुन त्यांची खिल्ली उडवली आहे. (फोटो-अमोल मिटकरी, एक्स पोस्ट)

Amol Mitkari : विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक पार पडण्यासाठी २६ ते २७ दिवसांचा कालावधीच उरला आहे. १५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात निवडणुकीची घोषणा करण्यात आली. २० नोव्हेंबरला निवडणूक आणि २३ नोव्हेंबरला निकाल अशा तारखा जाहीर करण्यात आल्या. त्यानंतर चर्चा सुरु झाली ती जागावाटप, फॉर्म्युले आणि कुणाला कुठून उमेदवारी मिळणार याची. भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या तीन पक्षाने आत्तापर्यंत १८२ जागा जाहीर केल्या आहेत. मात्र महाविकास आघाडीचं काही ठरलेलं नव्हतं. त्यानंतर आजच शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने ६५ जागा जाहीर केल्या. त्यानंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. यात संजय राऊत यांनी ८५+८५+८५ अशा २७० जागांवर एकमत झाल्याचं सांगितलं. फॉर्म्युला आणि त्याची टोटल चुकल्याने आता महाविकास आघाडीची खिल्ली उडवली जाते आहे.

महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला काय?

महाविकास आघाडीतील नाना पटोले, संजय राऊत यांनी आज मुंबईत शरद पवारांची भेट घेतली. या भेटीत जागा वाटपाबाबत शेवटची चर्चा झाल्याची माहिती संजय राऊतांनी आज पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला प्रत्येकी ८५ जागा देण्यात आल्या आहेत. म्हणजेच, २७० जागांचं जागावाटप झालेलं आहे. २८८ पैकी २७० जागांची यादीही तयार झाली असल्याची माहिती संजय राऊतांनी दिली. तसंच, उर्वरित १९ जागा इतर मित्रपक्षांना देण्यात येणार आहेत. त्यासंदर्भात उद्या सकाळापासून चर्चा सुरू होईल, असं संजय राऊत म्हणाले. यानंतर अजित पवारांच्या पक्षाने (Amol Mitkari ) महाविकास आघाडीची खिल्ली उडवली आहे.

MVA : “२७० जागांवर आमचं एकमत, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार..”, नाना पटोलेंनी काय सांगितलं?

जागावपाटपात काँग्रेस ८५, शिवसेना ८५ तर राष्ट्रवादीला ८५ जागा लढविण्याचे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. डावे पक्ष, समाजवादी पार्टी व अन्य छोट्या पक्षांना तिन्ही पक्षांनी आपापल्या कोट्यातून जागा सोडाव्यात, असा निर्णय घेण्यात आला.

अमोल मिटकरींची पोस्ट काय?

अमोल मिटकरी (Amol Mitkari ) यांनी एक पोस्ट लिहित आणि संजय राऊत यांची ही प्रतिक्रिया पोस्ट करत महाविकास आघाडीला चिडवलं आहे. ८५+८५+८५ = २७० वाह! अशी पोस्ट अमोल मिटकरींनी केली आहे आणि स्मायली पोस्ट करत मविआची खिल्ली उडवली आहे. यामागे कारण आहे ते म्हणजे ८५+८५+८५ या संख्येची बेरीज २५५ होते २७० नाही. संजय राऊत आणि नाना पटोले यांनी मात्र २७० जागांची यादी तयार आहे म्हणत पत्रकारांना आणि माध्यमांना याबाबत माहिती दिली. आता अमोल मिटकरींनी (Amol Mitkari ) या तिन्ही पक्षांची खिल्ली उडवली आहे.

अमोल मिटकरींनी (Amol Mitkari ) महाविकास आघाडीची जी खिल्ली उडवली आहे त्यानंतर आता या पोस्टवर विविध प्रतिक्रिया येत आहेत. संजय राऊत आणि नाना पटोले यांनी ८५ चा फॉर्म्युला आणि २७० ची बेरीज सांगितल्याने सत्ताधाऱ्यांना टीका करण्यासाठी कोलीतच दिलं गेलं आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ajit pawar ncp leader mocks mahavikas aaghadi formula 85 seats each and its total 270 scj

First published on: 23-10-2024 at 23:05 IST
Show comments