Ajit Pawar on Mahayuti Seat Sharing: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडी व महायुती यांच्या जागावाटपाची जोरदार चर्चा पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी इच्छुक नाराज झाल्याचं चित्र आहे. काही ठिकाणी उमेदवार अदलाबदली करून तात्पुरता प्रश्न सोडवण्यात आला तर काही ठिकाणी थेट आपला उमेदवार मित्रपक्षात प्रवेश करून त्यांच्या चिन्हावरच उभा करण्याचा मार्ग निवडण्यात आला. आता शिवसेना (एकनाथ शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातले मिळून १७ उमेदवार भाजपातून आयात असल्याचं दिसून आलं आहे. याबाबत अजित पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी त्यावर भूमिका मांडली. तसेच, येत्या ४ तारखेपासून राज्यभर प्रचार करणार असल्याचंही अजित पवारांनी सांगितलं.
रोज तीन सभांचं नियोजन!
निवडणुकीपर्यंत महाराष्ट्रात रोज तीन प्रचारसभा घेण्याचं नियोजन असल्याचं अजित पवारांनी सांगितलं. तसेच, तोपर्यंत बारामती विधानसभा मतदारसंघातील किमान ५० टक्के गावांमध्ये जाण्याचं नियोजनही त्यांनी सांगितलं. “प्रत्येक गावात एकदा का होईना उपस्थित राहून मतदानाचं आवाहन करण्याचा माझा प्रयत्न होता. आत्तापर्यंत माझी २५ टक्के गावंच झाली आहेत. उद्या पाडवा आहे. त्यानंतर पुन्हा मी २५ टक्के गावं तरी करणार. म्हणजे माझी ५० टक्के गावं होतील. ४ तारखेपासून महाराष्ट्रभरात आमच्या प्रचारसभा होतील”, असं अजित पवार म्हणाले.
दोन एबी फॉर्मचा मुद्दा…
दरम्यान, पक्षाकडून काही मतदारसंघांमध्ये दोन एबी फॉर्म देण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित होताच अजित पवारांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं. यावेळी त्यांनी नवाब मलिक यांचाही उल्लेख केला. “नवाब मलिकांनी आधीपासून त्यांचं मत सांगितलं आहे. त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ही बाबही खरी आहे की काही ठिकाणी दोन फॉर्म दिले गेले आहेत. फॉर्म भरण्याच्या दिवशीच्या आदल्या दिवशी रात्री ९ ते २ वाजेपर्यंत आम्ही वर्षावर होतो. त्यातून माहिती घेण्याचा प्रयत्न केला की कुठे-कुठे एबी फॉर्म दोनदा दिले गेले? कुठे एबी फॉर्म न देता वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरले? काहीजणांनी फॉर्म भरले, पण पक्षाचा एबी फॉर्म न मिळाल्यामुळे त्यांचा अपक्ष फॉर्म ग्राह्य धरला गेला”, असं ते म्हणाले.
दिवाळीचे दिवस संपले की आम्ही भाऊबीजेच्या दिवशीपासून ज्यांनी माघार घ्यायची त्यांना फोन करणार म्हणजे ते ४ तारखेला फॉर्म वेळेत मागे घेतील”, अशी माहिती अजित पवारांनी दिली.
शरद पवारांच्या टीकेवर काय म्हणाले अजित पवार?
शरद पवारांकडून अजित पवारांवर प्रचारात भावनिक मुद्दे उपस्थित केल्याची टीका करण्यात आली होती. त्यावर अजित पवार म्हणाले, “शरद पवार मोठी व्यक्ती आहेत. आदरणीय व्यक्ती आहेत. त्यांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे. निवडणूक आयोगानं सर्व गोष्टी पाहिल्या. त्यावेळी जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी आमच्याकडे होते. त्यामुळे पक्षचिन्ह आम्हाला मिळालं. पक्ष वाढवण्यात माझा, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल अशा आमचाही खारीचा वाटा आहेच. पण जाऊ द्या, आदरणीय व्यक्तीनं एखादी गोष्ट बोलली आणि त्यावर आम्ही काही बोललो तर त्यातून नवीन प्रश्न निर्माण होतात”, असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, यावेळी जागावाटपाच्या चर्चेमध्ये अधिक जागा पदरात पाडून घेऊन भाजपा मोठा भाऊ होऊ पाहतेय का? अशी विचारणा केली असता त्यावरही अजित पवारांनी उत्तर दिलं. “आमच्या तिघांच्या सहमतीनं झालं तर तुम्हाला वाईट वाटायचं काय कारण आहे? आम्ही युती केली आहे. युती करताना आम्ही काय करावं हे आम्ही ठरवणार. आम्ही उमेदवारांची देवाण-घेवाण केली. जिथे आमच्याकडे चांगले उमेदवार होते पण ती जागा आम्हाला मिळाली नाही, ती त्यांना दिली. लहू कानडेंना काँग्रेसनं तिकीट नाकारलं. श्रीरामपूरची जागा मी घेऊन लहू कानडेंना ती जागा दिली. हे काही फक्त आज होत नाहीये. २०१४, २०१९ लाही हे झालं आहे”, असं ते म्हणाले.