राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटांमधील नेते सातत्याने एकमेकांवर टीका-टिप्पणी, आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच बारामती लोकसभेच्या निडणुकीमुळे संपूर्ण पवार कुटुंब राजकीय मैदानात उतरलं असून त्यांच्या घरातल्या गोष्टी चव्हाट्यावर येऊ लागल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना अजित पवार गटाने बारामतीमधून लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. तर अजित पवारांची बहीण आणि विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या शरद पवार गटाच्या तिकीटावर बारामतीची लोकसभा निवडणूक लढत आहेत. बारामतीत होणाऱ्या नणंद विरुद्ध भावजयीमधील लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, पवार कुटुंबातला संघर्ष पाहून त्यांचे पाठीराखे दोन्ही पवारांनी एकत्र यावं यासाठी प्रार्थना करत आहेत. तर, पवार कुटुंबाचे विरोधक हे दोन्ही नेते पुढे एकत्र येतील असा दावा करत आहेत. यावर अजित पवार यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवारांबरोबर एकत्र येण्याच्या चर्चांवर अजित पवार म्हणाले, “साहेबांनी (शरद पवार) मला सर्वांना एकत्र येऊन काम करण्यास सांगितलं तर… साहेब मला भरपूर वर्षांपासून काम करताना पाहत आहेत. ते मला म्हणाले की, पुढे तुम्ही सर्वजण एकत्र मिळून काम करा… आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केलं तर कदाचित… आजही त्यांच्याबरोबर असणाऱ्या (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार) आमदारांनी तसा विचार केला आहे. मागील वेळेस सर्वांनी अशा निर्णयावर सह्यादेखील केल्या होत्या. आम्ही सत्ताधारी पक्षाबरोबर जायचं ठरवलं होतं. आता ते लोक काहीही बोलत असले तरी मागे ते लोक सत्ताधाऱ्यांबरोबर जाण्यास तयार होते.” अजित पवार मुंबई तकशी बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना झाल्यापासूनचा इतिहास तुम्ही पाहा. राष्ट्रवादी सतत सत्तेत राहिली आहे. एखाद्या निवडणुकीचा अपवाद वगळता राष्ट्रवादी नेहमी सरकारमध्ये राहिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत काम करणारे आमचे जे आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत त्यांना सत्ता असल्याशिवाय विकासकामं करता येत नाहीत. हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. तुम्हाला विकास करायचा असेल तर सत्ताधारी पक्षाबरोबर जावंच लागेल.
हे ही वाचा >> “फडणवीसच नव्हे, मविआच्या काळात आणखी तीन भाजपा नेत्यांच्या अटकेचा कट रचलेला”, एकनाथ शिंदेंचा गंभीर आरोप
यावेळी अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला की, शरद पवारांसाठी तुमचे दरवाजे उघडे आहेत का? त्यावर अजित पवार म्हणाले, “प्रत्येकाचा काही काळ असतो ना… प्रत्येकाने काही काळापर्यंत जरूर काम करावं, भरपूर काम करावं, लोकांचं भलं करावं, पुढे काही वर्षांनी नव्या लोकांनादेखील संधी द्यायला पाहिजे.” यावर अजित पवारांना विचारण्यात आलं की, तुमच्या या वक्तव्यांमुळे लोकांमध्ये असा संदेश गेलाय की, शरद पवारांनी निवृत्ती घ्यावी अशी तुमची इच्छा आहे. यावर अजित पवार म्हणाले, कोणी कधी निवृत्त व्हावं हे सांगण्याचा अधिकार माझा नाही. तुम्ही तुमच्या क्षेत्रात काम करत असता तेव्हा तुम्हाला तिथे किती वर्षे काम करायचं आहे हे ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी तुमचाच आहे.