Ajit Pawar Praises Amit Shah For Delhi Win : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष ४८ जगांवर विजय मिळवत, तब्बल अडीच दशकांनंतर दिल्लीच्या सत्तेत पुनरागमन केले आहे. ही दमदार कामगिरी करताना भाजपाने सत्ताधारी आम आदमी पक्षाचा धुव्वा उडवला असून, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनाही पराभवाची चव चाखावी लागली आहे. दरम्यान महाराष्ट्रात एनडीएचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीनेही (अजित पवार) दिल्ली विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवली होती. मात्र, यामध्ये त्यांना यश मिळवता आले नाही. त्यांचा एकही उमेदवार विजयापर्यंत पोहचू शकला नाही. यानंतर प्रक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी एक्सवर भारतीय जनता पक्षाचे अभिनंदन केले असून, त्यांच्या पक्षाला या निवडणुकीत यश का मिळाले नाही, याचे विश्लेषण केले जाणार असल्याचे म्हटले आहे.
पंतप्रधानांच्या विचारांचे डबल इंजिन सरकार…
उपमुख्यमंत्री अजित पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे दिल्ली विजयासाठी अभिनंदन करताना आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, “दिल्ली विधानसभेतील निर्णायक विजयाबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांचे मनापासून अभिनंदन. दिल्लीत स्थापन होणाऱ्या नवीन सरकारला उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा. दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘एनडीए’चा प्रमुख घटकपक्ष असलेल्या भाजपाला मिळालेल्या ४० हून अधिक जागा या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर दिल्लीकरांनी व्यक्त केलेल्या विश्वासाचे प्रतिक आहेत. केंद्र आणि दिल्ली विधानसभेतही पंतप्रधानांच्या विचारांचे डबल इंजिन सरकार आल्याने दिल्लीच्या विकासाला दुप्पट गती मिळेल. चांगले रस्ते, स्वच्छ पाणी, उत्तम शिक्षण, दर्जेदार आरोग्य सुविधांचं, देशाच्या राजधानीचं सर्वांगसुंदर शहर हे दिल्लीकरांचे स्वप्न पूर्ण होईल.”
अजित पवारांकडून अमित शाह यांचे कौतुक
एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये अजित पवार यांनी पुढे म्हटले की, “दिल्लीतील भाजपाच्या यशामागे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कष्ट व निवडणूक व्यवस्थापनाचेही मोठे योगदान आहे. दिल्ली भाजपाचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेव आणि त्यांच्या टीमने घेतलेली मेहनतही महत्वाची ठरली.”
दिल्ली विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगिरीवरही अजित पवार यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी भाष्य केले आहे. ते म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्ली विधानसभेत अपेक्षित यश मिळाले नसले तरी या निवडणुकीतून आम्हाला खूप शिकायला मिळाले आहे. ही सुरुवात आहे. मिळालेल्या अपयशाचे विश्लेषण करुन भविष्यात देशपातळीवर पक्षबांधणीसाठी अधिक मेहनत घेतली जाईल. दिल्लीसह इतर अन्य राज्यात पक्षाचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येईल.”