Ajit Pawar : संविधान दिनानिमित्त अजित पवार यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केलं तसंच संविधान वाचन कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली
काय म्हणाले अजित पवार?
Ajit Pawar अजित पवार म्हणाले बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिलं आहे. १४० कोटींचा देश त्या संविधानाचा आदर करतो. तसंच संविधानामुळे अत्यंत समाधानाने आयुष्य जगत आहेत असं असतानाही लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने फेक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला. महाविकास आघाडीने संविधान बदललं जाईल असा खोटा प्रचार केला असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. संविधान दिनानिमित्त त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
विरोधकांनी फेक नरेटिव्ह पसरवलं-अजित पवार
“विरोधकांनी लोकसभेच्या वेळी संविधान बदललं जाईल असं फेक नरेटिव्ह पसरवलं. आम्ही सगळे त्यावेळी सगळ्यांना सांगत होतो की संविधान वगैरे काहीही बदललं जाणार नाही. मात्र त्यावेळी लोकांना आमचं पटलं नाही. देशभरात संविधान दिन साजरा होतो आहे. महाराष्ट्र सरकारने प्रत्येक जिल्ह्यात संविधान भवन उभारण्याचा निर्णय घेतला. संविधान वाचनाचा कार्यक्रम नुकताच संपला. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाबाबत आम्हाला सगळ्यांना आनंद आहे.” असं अजित पवार म्हणाले.
२६/११ चा दिवस आठवला तरीही अंगावर शहारा येतो
२६/११ चा दिवस आठवला तरीही अंगावर शहारा येतो. त्यावेळी भीतीचं आणि दहशतीचं वातावरण होतं. कुणी म्हणत होतं २५ लोक आले, ५० आले. कसाबला जेव्हा जिवंत पकडण्यात आलं तेव्हा १० दहशतवादी होते आणि त्यातले नऊ ठार झाले ही माहिती आपल्याला समजली. त्या हल्ल्यात हेमंत करकरे, अशोक कामटे हे आणि अनेक सहकारी शहीद झाले. या सगळ्यांच्या स्मृतींना आम्ही अभिवादन केलं अशीही माहिती अजित पवार यांनी दिली.