Ajit Pawar slams RR Patil in Tasgaon NCP Rally :”मला एकदा तरी गृहमंत्रीपद द्या असं मी कित्येकदा माझ्या नेत्यांना सांगायचो”, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार यांनी तासगावमध्ये केलं आहे. “गृहमंत्री झालो तर वेडंवाकडं काही चालूच देणार नाही, आपल्याला तसलं काही खपतच नाही”, असंही अजित पवार म्हणाले. तासगावमध्ये अजित पवार यांनी आज (२९ ऑक्टोबर) प्रचारसभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी त्यांच्याच पक्षातील दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच पाटील तासगावचा विकास करू शकले नाहीत, असा शेराही अजित पवारांनी यावेळी मारला.
अजित पवार म्हणाले, “आता मी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी खाली उतरलो. तिथे समोरच मला तुमचं (तासगाव) बसस्थानक दिसलं. तुमच्या बसस्थानकाची वाईट अवस्था आहे. कधीतरी येऊन माझं (बारामती) बसस्थानक बघा आणि तुमचं बस स्थानक बघून तुलना करा. विकास करण्यासाठी नेतृत्त्वात धमक आणि ताकद असावी लागते. नुसती भाषणं करून तुमची पोटं भरणार नाहीत. भाषणं करून इथल्या मुला-मुलींना रोजगार मिळणार नाही. तुम्हाला माहिती आहे का? महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात जास्त काळ गृहमंत्रिपद कोणाकडे होतं? आर. आर. पाटील यांच्याकडे सर्वाधिक काळ गृहमंत्रिपद होतं. मी कित्येकदा माझ्या नेत्यांना सांगायचो, एकदा मला गृहमंत्रिपद द्या, मी एकेकाला बघतोच. बघतो म्हणजे चांगला कारभार करेन. कारण, मी वेडंवाकडं काही चालूच देणार नाही. मला वेडंवाकडं काही खपतच नाही. माझा कार्यकर्ता जरी चुकला तरी मी त्याला बोलतो”.
हे ही वाचा >> Ajit Pawar on RR Patil: ‘पैज हरल्यामुळं आर. आर. पाटलांना द्यावी लागली होती आलिशान गाडी’, अजित पवारांनी सांगितला किस्सा
अजित पवारांचे आर. आर. पाटलांवर आरोप
दरम्यान, यावेळी अजित पवारांनी आर. आर. पाटलांवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, केवळ मला बदनाम करण्यासाठी ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप केले गेले. पण महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि इतर खर्च ४२ हजार कोटी एवढा होता. मग ७० हजार कोटी रुपयांचा घोटाळा कुठून होणार? पण आकडाच इतका मोठा होता की, त्यातून माझी बदनामी झाली. पुढे चौकशीसाठी एक फाईल तयार करण्यात आली होती. ती फाईल गृहखात्याकडं गेल्यानंतर आर. आर. पाटलांनी माझी खुली चौकशी करावी, म्हणून स्वाक्षरी केली. केसानं गळा कापायचे धंदे झाले. नंतर आम्ही पृथ्वीराज चव्हाण यांचा पाठिंबा काढून घेतल्यामुळं सरकार गेलं. राष्ट्रपती राजवट लागली.